Posted On:
28 SEP 2026 4:48PM by PIB Mumbai
नागपूर, 28 सप्टेंबर 2026
वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड (डब्ल्यूसीएल), स्वच्छता ही सेवा 2026 आणि विशेष अभियान 6 अंतर्गत स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन आणि लोकसहभाग यांविषयीचे विविध उपक्रम आपल्या सर्व 10 क्षेत्रांमध्ये राबवत आहे. स्वच्छता ही सेवा मोहीम, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2026 या कालावधीत 'स्वच्छतेत सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत' या राष्ट्रीय संकल्पनेअंतर्गत राबवली जात आहे.
मोहिमेचा भाग म्हणून सर्व क्षेत्र कार्यालये आणि मुख्यालयांमध्ये स्वच्छता प्रतिज्ञा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात 10,000 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. सेल्फी मोहिमा, जनजागृती कार्यक्रम, पथनाट्ये, वादविवाद, वक्तृत्वकला आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून शाळा, गावे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा संदेश पोहोचवला जात आहे. 'स्वच्छ पाठशाला: युवा फॉर स्वच्छता' या उपक्रमात सुमारे 650 विद्यार्थी सहभागी झाले तर 'कबाड से जुगाड' आणि 'कबाड से कला' या उपक्रमांमध्ये सुमारे 500 जणांनी भाग घेतला आहे.
विविध क्षेत्रांमध्ये कबड्डी, रांगोळी स्पर्धा आणि स्वच्छ बाजार उपक्रमांच्या माध्यमातून लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. यामध्ये चंद्रपूर येथे 'वेस्ट टू वेल्थ' अर्थात कचऱ्यातून संपत्तीनिर्मिती कार्यक्रम आणि ई-कचरा संकलन मोहीम, पाठखेडा येथे कबड्डी व स्वच्छता उपक्रम, मजरी आणि नागपूर येथे 'कबाड से जुगाड' अर्थात टाकाऊतून टिकाऊ वस्तूंची प्रदर्शने, बल्लारपूर येथे विद्यार्थ्यांसाठी 'वेस्ट-टू-आर्ट' (कचऱ्यातून कलाकृती) रांगोळी स्पर्धा; तसेच वणी क्षेत्रात स्वच्छतेविषयक उपक्रमांवरील लघुपटाचे सादरीकरण यांसारख्या प्रमुख उपक्रमांचा समावेश आहे.
विशेष अभियान 6 अंतर्गत ई-कचरा व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. भंगाराची विल्हेवाट, कार्यस्थळ स्वच्छता, अभिलेख व्यवस्थापन, कार्यालयीन जागेचा कार्यक्षम वापर आणि डिजिटलायझेशन यांसोबतच ई-कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि जबाबदारीपूर्वक विल्हेवाट लावणे यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत. या मोहिमेअंतर्गत पहिले 'ई-वेस्ट किओस्क' चंद्रपूर क्षेत्रात उभारण्यात आले आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला आणि सुरक्षेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ या उपक्रमांतर्गत, आतापर्यंत 690 हून अधिक सफाई मित्र, कंत्राटी कामगार आणि मदतनीसांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. विविध भागांमध्ये सुरक्षा किट, बूट आणि टी-शर्टचे वितरणही केले जात आहे.
‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत, पाठखेडा परिसरात वृक्षारोपण मोहीम सुरू झाली आहे. दरम्यान, डब्ल्यूसीएलमधील 10 स्वच्छता लक्ष्य केंद्रांमध्ये (सीटीयू) स्वच्छता, वृक्षारोपण आणि भिंती सुशोभीकरण सुरू आहे. मोहिमेच्या अंतिम टप्प्यात, विविध भागांमधील मंदिरे, रुग्णालये, बाजारपेठा आणि सामुदायिक जागांसह 20 हून अधिक सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम आयोजित केली जाईल.
ही मोहीम समारोपाच्या दिशेने वाटचाल करत असताना, डब्ल्यूसीएल 1 ऑक्टोबर 2026 रोजी “एक दिन, एक घंटा, एक साथ” श्रमदानाचे आयोजन करणार आहे. सर्व क्षेत्रांमधील कर्मचारी आणि स्थानिक समुदाय प्रमुख सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता उपक्रमांमध्ये एकत्र सहभागी होतील.
स्वच्छ भारत दिनानिमित्त 2 ऑक्टोबर रोजी, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सफाई मित्रांचा सत्कार करून या मोहिमेचा समारोप होईल. डब्ल्यूसीएलच्या क्षेत्रांमध्ये आणि आसपासच्या ग्रामपंचायतींमध्ये “स्वच्छतेसाठी जनभागीदारी” अंतर्गत विशेष ग्रामसभांचेही आयोजन केले जाईल. या ग्रामसभांद्वारे ग्रामीण समुदायांमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम, 2026 आणि कचऱ्याचे उगमस्थळी वर्गीकरण याबद्दल जागरूकता निर्माण केली जाईल.
'स्वच्छता ही सेवा 2026' आणि 'विशेष मोहीम 6' यांच्या माध्यमातून डब्ल्यूसीएल आपल्या कोळसा खाणक्षेत्रांमध्ये स्वच्छ कार्यस्थळे, जबाबदार कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, सामुदायिक सहभाग आणि स्वच्छतेची संस्कृती मजबूत करत, स्वच्छतेला एक शाश्वत, सहभागी चळवळ म्हणून पुढे नेत आहे.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai