रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रात पहिला पोलादी पूल पूर्ण


जटिल पोलादी संरचना निर्मितीत भारताच्या वाढत्या क्षमतेचे दर्शन

Posted On: 28 SEP 2026 4:30PM by PIB Mumbai

मुंबई, 28 सप्‍टेंबर 2026

 

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील दिवे-अंजूर गावात राष्ट्रीय महामार्ग-3 (नाशिक महामार्ग) वर 1,405 मेट्रिक टन वजनाचा, 100 मीटर लांबीचा पोलादी पूल उभारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण झालेला हा पहिलाच पोलादी पूल आहे.

या पुलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची रचना उभारणीच्या ठिकाणापासून सुमारे 1,300 किमी दूर असलेल्या तामीळनाडूतल्या त्रिची इथल्या कारखान्यात तयार करण्यात आली. त्यानंतर ट्रेलरवरून महाराष्ट्रात प्रत्यक्ष उभारणीपूर्वी त्याची जुळणी करण्यात आली. तंत्रज्ञानदृष्ट्या देशातील सर्वात प्रगत रेल्वे प्रकल्पांपैकी एक मानल्या जात असलेल्या या प्रकल्पासाठी जटिल पायाभूत सुविधा घटकांची निर्मिती, वाहतूक आणि वितरण यांबाबत भारतीय उद्योगांची वाढती क्षमता या कामगिरीतून दिसून येते.

या पुलाच्या निर्मितीमध्ये विहित आराखडे, रेखाचित्रे आणि तांत्रिक विनिर्देशांनुसार अचूक कटिंग, ड्रिलिंग, वेल्डिंग आणि रंगकाम करण्यात आले. निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या पोलादाच्या प्रत्येक बॅचची अल्ट्रासोनिक चाचणी करण्यात आली. या कामात सहभागी असलेले वेल्डर आणि पर्यवेक्षक यांना आंतरराष्ट्रीय वेल्डिंग तज्ज्ञांकडून प्रमाणित करण्यात आले होते. हा प्रकल्प भारताची वाढती स्वदेशी तंत्रज्ञान क्षमता आणि सामग्री निर्माण क्षमता अधोरेखित करतो. तसेच देशातील उच्चगती रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासात मेक इन इंडियाचे प्रतिबिंब यातून दिसून येते.

साइटवर, 100 मीटर लांबीच्या या पुलाची जमिनीपासून सुमारे 17.5 मीटर उंचीवर तात्पुरत्या ट्रेसल्सवर (पुलाला आधार देणारी रचना) जोडणी करण्यात आली. यासाठी 22 स्किड अरेंजमेंट्स आणि 54,076 टॉर-शिअर टाईप हाय स्ट्रेंथ बोल्ट्स' (TTHSB) यांचा वापर करण्यात आला. पुलाचा  टिकाऊपणा वाढविण्यासाठी आणि कंपनांचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी C5 संरक्षणात्मक रंगकाम प्रणाली आणि इलास्टोमेरिक बेअरिंग्ज बसविण्यात आली आहेत.

रचना पूर्ण झालेला पूल प्रत्येकी 150 मेट्रिक टन क्षमतेच्या दोन हॉलो जॅक आणि प्री-टेन्शन्ड मॅकॅलॉय बारचा समावेश असलेल्या स्वयंचलित यंत्रणेचा वापर करून ओढून नेऊन स्थापित करण्यात आला. महामार्गावरील प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी, अत्यंत काटेकोर नियोजन आणि अचूक कार्यवाहीद्वारे,राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळेत ट्रॅफिक ब्लॉक दरम्यान ही प्रक्रिया  पार पाडण्यात आली. 

महामार्ग, द्रुतगती मार्ग, मोठ्या नद्या आणि रेल्वे मार्ग अशी  लांब अंतरे ओलांडण्यासाठी, पोलादी पूल विशेषतः उपयुक्त ठरतात. या पुलाची लांबी 100 मीटर, उंची 14 मीटर आणि रुंदी 14 मीटर असून मुख्य पुलाचे वजन 1,405 मेट्रिक टन इतके आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी नियोजित 28 पोलादी पुलांपैकी 16 पुलांचे काम पूर्ण झाले आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316039) अभ्यागत कक्ष : 35
Read this releasein: English