कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या विविध संस्थांकडून स्वच्छता आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन

Posted On: 26 SEP 2026 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2026

 

'स्वच्छता ही सेवा' उपक्रमांतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) आपल्या विविध संस्थांमध्ये गणेश विसर्जनानंतर स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई आणि कचऱ्याचे जबाबदारीने व्यवस्थापन यांवर भर देणारे जनजागृती व स्वच्छता अभियान राबवले. गणेश विसर्जनानंतर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पर्यावरण संवर्धन, सुरक्षित पद्धतींचा वापर आणि लोकसहभागाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या अभियानांतर्गत एका स्थानिक गणेश मंडळात गणेश विसर्जनानंतर स्वच्छतेबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये नागरिकांना शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि हानिकारक रासायनिक रंग असलेल्या मूर्तींचे पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये विसर्जन न करण्याचा सल्ला देण्यात आला. नागरिकांनी विसर्जनासाठी निश्चित केलेल्या कृत्रिम जागांचाच वापर करावा आणि नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्ती किंवा पूजासाहित्याचे विसर्जन टाळावे, यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. याशिवाय फुले, पूजासाहित्य, प्लास्टिक, थर्मोकोल आणि इतर सजावटीच्या कचऱ्याचे संकलन व त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यावर विशेष भर देण्यात आला.

या कार्यक्रमात विसर्जन स्थळांवरील स्वच्छता राखणे, कचरा न पसरवणे आणि जलस्रोतांजवळ सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे या बाबींचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. स्थानिक गणेश मंडळाच्या आसपासच्या परिसराची साफसफाई करण्यात आली, तसेच कचऱ्याचे सुरक्षित व जबाबदारीने व्यवस्थापन व्हावे यासाठी गोळा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आले. जलस्रोतांचे रक्षण करण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी सामूहिक जबाबदारी व लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे, हे या उपक्रमातून स्पष्ट झाले.

   

या अभियानाचा भाग म्हणून, झारखंडमधील ICAR-NISA (रांची) आणि महाराष्ट्रातील ICAR-CIRCOT (मुंबई) येथे फुले व इतर पूजासाहित्य यासारखे विघटनशील घटक एकत्र करून त्यांचे वर्गीकरण करण्यात आले. हा कुजणारा कचरा सेंद्रिय खत तयार करण्यासाठी खत निर्मिती केंद्रांमध्ये पाठवण्यात आला. या उपक्रमामुळे गणेश विसर्जनादरम्यान निर्माण झालेल्या जैविक कचऱ्याची साफसफाई व वर्गीकरण तर झालेच, शिवाय कंपोस्टिंगद्वारे त्याचे एका उपयुक्त संसाधनात रूपांतरही करण्यात आले.

या सर्व उपक्रमांमुळे स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि कचऱ्याचे जबाबदार व्यवस्थापन याविषयी जनजागृती होण्यास मदत झाली; तसेच गणेश विसर्जनादरम्यान आणि त्यानंतरही स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणास पूरक अशा पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळाले.

 

* * *

राधिका अघोर/वैभवी जोशी/दर्शना राणे


(Release ID: 2315371) अभ्यागत कक्ष : 10