श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इपीएफओ सुधारणा जनजागृतीसाठी मुंबईतील चारकोप येथील इपीएफओच्या क्षेत्रिय कार्यालयाचा तारापूरच्या भारतीय अणुउर्जा महामंडळ कार्यालयात माहितीपर कार्यक्रम

Posted On: 26 SEP 2026 3:16PM by PIB Mumbai

मुंबई, 26 सप्‍टेंबर 2026

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (इपीएफओ) मुंबईतील चारकोप येथील क्षेत्रिय कार्यालयाने ठाणे विभागीय कार्यालयाअंतर्गत पालघर जिल्ह्यातील तारापूरच्या भारतीय अणुउर्जा महामंडळाच्या (एनपीसीआयएल) कार्यालयात कर्मचारी व कर्मचारी नियोक्ता यांना केंद्र सरकाच्या नवीन उपक्रमांबाबत माहिती देण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमाला तारापूरचे प्रकल्प संचालक अजय कुमार भोळे आणि अतिरिक्त केंद्रिय भविष्यनिर्वाह निधी आयुक्त अनिमेश मिश्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अतिरिक्त केंद्रिय पीएफ आयुक्त अनिमेश मिश्रा यांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना चार नव्या उपक्रमांची माहिती दिली आणि या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन कर्मचारी व कर्मचारी नियोक्त्यांना केले.  

पीएम-व्हीबीआरवाय – अतिरिक्त रोजगार निर्माण करणारे कर्मचारी नियोक्ते व प्रथमच रोजगार मिळालेले पात्र कर्मचारी यांना या योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देऊन औपचारिक रोजगार निर्मितीला चालना दिली जाते. रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे तसेच संघटित कामगारशक्ती मजबूत करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.

कर्मचारी नावनोंदणी मोहीम 2026 – विहीत शर्तींचे पालन करुन आधी नांवनोंदणी न केलेल्या कर्मचाऱ्यांची नांवनोंदणी करण्याची संधी पात्र आस्थापनांना या मोहीमेमुळे मिळेल. सामाजिक सुरक्षा व्याप्ती विस्तारण्याला व पात्र कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाला ही योजना प्रोत्साहन देते.

विश्वास योजना 2026 – पात्र कायदेशीर खटले विहीत मदत यंत्रणेच्या माध्यमातून सोडवण्याची सुविधा या योजनेमध्ये आहे. पात्र विवादांच्या जलद निराकरणाला व स्वयंप्रेरणेने नियम पालन करण्याला ही योजना चालना देते.

कमाल वेतन मर्यादेत सुधारणा – इपीएफओ वेतन मर्यादा वाढवून प्रति महिना ₹ 25,000 करण्यात आली आहे. यामुळे सामाजिक सुरक्षा कवच अनिवार्य असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांची व्याप्ती वाढेल.  

क्षेत्रिय पीएफ 1 आयुक्त निखिलचंद्र अनिल झोडे, क्षेत्रिय पीएफ 2 आयुक्त आयुष गौतम आणि तारापूर प्रकल्पातील मानव संसाधन (एचआर) विभागप्रमुख अमृतेश श्रीवास्तव हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. एचआर विभागाचे उप महाव्यवस्थापक राजेश कुमार पात्रा, एचआर विभागाचे व्यवस्थापक गौरव दीक्षित, एनपीसीआयएलचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच एनपीसीएलचे तारापूर येथील कंत्राटदारदेखील यावेळी उपस्थित होते.

क्षेत्रिय पीएफ 1 आयुक्त निखिलचंद्रा अनिल झोडे यांनी हे उपक्रम औपचारिकीकरण, रोजगारनिर्मिती व व्यापक सामाजिक सुरक्षा कवच याद्वारे विकसित भारताचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात कशाप्रकारे योगदान देऊ शकतात याविषयी माहिती दिली. अंमलबजावणी अधिकारी भावेश निकुम्भ यांनी हे उपक्रम व त्याचे फायदे समजावून सांगणारे तपशीलवार सादरीकरण केले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना इपीएफओच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तरे दिली. इपीएफओने एनपीसीआयएल कार्यालयाला भेट देऊन नवीन उपक्रमांची कर्मचाऱ्यांना माहिती दिली, उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि इपीएफओची सेवा थेट एनपीसीआयएलच्या कार्यालयात उपलब्ध करुन दिली यासाठी प्रकल्प संचालक ए. के. भोळे यांनी इपीएफओचे आभार मानले. कर्मचारी व नियोक्त्यांशी संपर्क, सुलभ तक्रार निवारण व सामाजिक सुरक्षा कवचाच्या लाभाची व्याप्ती वाढवण्याविषयीची इपीएफओची प्रतिबद्धता या कार्यक्रमाने पुन्हा अधोरेखित झाली.   

 

* * *

पीआयबी मुंबई | यश राणे/सुरेखा जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315283) अभ्यागत कक्ष : 11
Read this releasein: English