अर्थ मंत्रालय
गोवा विद्यापीठात 'राज्य वित्त आणि किनारी संरक्षण' या विषयावर परिसंवाद संपन्न
“गोव्याची राज्य वित्तीय स्थिती” आणि “गोव्याच्या किनारी परिसंस्थेचे संरक्षण” या विषयांवर चर्चेचा भर
Posted On:
25 SEP 2026 9:01PM by PIB Mumbai
आज गोव्यातील बांबोळीम येथे, महालेखापाल कार्यालय, गोवा, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (आयसीएसएसआर) आणि गोवा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था आणि शैक्षणिक समुदाय यांच्यात सार्वजनिक लेखापरीक्षणाच्या निष्कर्षांवर संवाद साधणे, हा या परिसंवादाचा उद्देश होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गोव्याच्या महालेखापाल इती शुक्ला (आयए आणि एएस), गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजेंद्र एस. गड, आयसीएसएसआरचे सदस्य सचिव प्रा. धनंजय सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञांच्या उपस्थितीत झाले. “गोव्याची राज्य वित्तीय स्थिती” आणि “गोव्याच्या किनारी परिसंस्थेचे संरक्षण” या दोन विषयांवर चर्चा केंद्रित होती.
गोव्याचे उपमहालेखापाल भाषा मोहम्मद बी. यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा सादर केला आणि 'कॅग'च्या राज्य वित्तीय लेखापरीक्षण अहवालांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी गोव्याच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील किनारपट्टी भागांशी आणि संवर्धन प्रयत्नांशी संबंधित लेखापरीक्षण निरीक्षणांवर तसेच सरकारने हाती घेतलेल्या प्रमुख उपाययोजना आणि उपक्रमांवरही प्रकाश टाकला.
इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेचे प्रा. एस. चंद्रशेखर यांनी यावर जोर दिला की, कॅग अहवाल आणि सार्वजनिकरीत्या उपलब्ध ऑडिट डेटा ही शैक्षणिक संशोधन आणि धोरण विश्लेषणासाठीची मौल्यवान संसाधने आहेत.
गोव्याच्या किनारी पर्यावरणावर बोलताना ‘सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन’ , गोवा येथील वैज्ञानिक सुजितकुमार डोंगरे यांनी गोव्याच्या किनारी भागांची पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन खारफुटी, कासवांच्या घरट्यांची ठिकाणे आणि जल नियंत्रण दरवाजे यांच्या शाश्वत संवर्धनाची गरज अधोरेखित केली.
सार्वजनिक वित्त, प्रशासन आणि लेखापरीक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या इतर क्षेत्रांशी संबंधित विषयांवर तरुण आणि उदयोन्मुख संशोधकांना संशोधन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी परिसंवादादरम्यान 'कॅग-आयसीएसएसआर शोधनिबंध स्पर्धे'ची घोषणाही करण्यात आली.
विद्यार्थी आणि तरुण संशोधकांनी या कार्यक्रमात सक्रियपणे सहभाग घेतला आणि गोव्याचे सार्वजनिक वित्त, लेखापरीक्षणाचे निष्कर्ष, पर्यावरण संवर्धन, तसेच सार्वजनिक प्रशासन मजबूत करण्यात नागरिक आणि संशोधकांची भूमिका यांसारख्या विषयांवर वक्त्यांशी संवाद साधला.
या परिसंवादाने लेखापरीक्षण संस्था, शैक्षणिक समुदाय आणि विद्यार्थी यांना अर्थपूर्ण संवादासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. तसेच यामुळे सार्वजनिक लेखापरीक्षणाच्या निष्कर्षांविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली आणि तरुण अभ्यासकांना सार्वजनिक वित्त, प्रशासन आणि पर्यावरणीय शाश्वतता यांसारख्या विषयांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळाले.
आयसीएसएसआरचे उपसंचालक डॉ. नितीन कुमार यांनी केलेल्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या परिसंवादात 150 हून अधिक विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासक सहभागी झाले होते.

***
सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2315191)
अभ्यागत कक्ष : 20