मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
2027-2032 साठी सागरी सस्तन प्राणी संवर्धन आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने एफएसआयच्या राष्ट्रीय कार्यशाळेला मुंबईत सुरुवात
Posted On:
25 SEP 2026 5:02PM by PIB Mumbai
भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्थेने (एफ एस आय) मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित केलेल्या “सागरी सस्तन प्राणी संवर्धन: विज्ञान, मत्स्यव्यवसाय आणि सामूहिक कृती” या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचा आज प्रारंभ झाला. 2027-2032 या कालावधीसाठी सागरी सस्तन प्राणी संवर्धनाकरिता राष्ट्रीय कृती आराखडा विकसित करणे आणि भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (ईईझेड) सागरी सस्तन प्राण्यांविषयीची वैज्ञानिक माहिती अधिक दृढ करणे, हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव - पश्चिम) डॉ. रविकिरण गोवेकर, आय एफ एस यांच्या हस्ते झाले. मत्स्यव्यवसाय विभागाचे उपायुक्त डॉ. संजय पांडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी एफ एस आयचे महासंचालक डॉ. श्रीनाथ के. आर. होते. एफ एस आयचे उप-महासंचालक डॉ. महेश कुमार फरेजीया आणि डॉ. सिजो पी. वर्गीस यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर हे सागरी सस्तन प्राण्यांच्या 33 प्रजातींचे निवासस्थान आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या अनुसूची 1 अंतर्गत या सर्व प्रजातींना सर्वोच्च पातळीचे कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. तथापि, खोल समुद्रातील प्रजातींची संख्या आणि मासेमारीदरम्यान होणाऱ्या सागरी सस्तन प्राण्यांच्या अपघाती पकडीबद्दलची माहिती मर्यादित आहे.
या कार्यशाळेत मत्स्यशास्त्रज्ञ, सागरी सस्तन प्राण्यांचे तज्ञ, अंमलबजावणी संस्था, संवर्धन संघटना आणि मच्छिमार समुदायांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत. चर्चा तीन प्रमुख क्षेत्रांवर केंद्रित आहे: सागरी सस्तन प्राण्यांचे सुधारित निरीक्षण, मासेमारीच्या कामांमध्ये अपघाती पकड कमी करण्याचे उपाय आणि संवर्धन प्रयत्नांमध्ये मच्छिमार समुदायांचा अधिक सहभाग.

सागरी सस्तन प्राण्यांच्या संख्येवर देखरेख ठेवण्यासाठी पॅसिव्ह अकूस्टिक मॉनिटरिंग, एन्व्हायर्नमेंटल डीएनए (ई-डीएनए) आणि सॅटेलाइट टेलिमेट्री यांसारख्या आधुनिक पद्धतींवर चर्चा केली जाईल. डॉल्फिन, व्हेल आणि इतर सागरी सस्तन प्राण्यांची अपघाती पकड कमी करण्यासाठी सुधारित मासेमारीची साधने, बायकॅच रिडक्शन डिव्हाइसेस आणि ध्वनी प्रतिबंधक उपायांवरही या कार्यशाळेत विचार केला जाईल.
स्थानिक सागरी जीव किनाऱ्यावर अडकल्यास प्रतिसाद देणारी नेटवर्क्स आणि नागरिक विज्ञान उपक्रमांसारख्या समुदाय-आधारित उपाययोजना यादेखील चर्चेचा एक महत्त्वाचा भाग असतील. किनाऱ्यावर अडकलेल्या सागरी प्राण्यांची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी एक साधन म्हणून मुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) विकसित केलेल्या 'जलचर' ॲपबाबतही चर्चा केली जाईल.
सागरी सस्तन प्राण्यांचे संवर्धन आणि शाश्वत मत्स्यव्यवसायासाठी एक समन्वित राष्ट्रीय आराखडा विकसित करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या चर्चेसह ही कार्यशाळा 26 सप्टेंबर 2026 रोजी समाप्त होईल.
***
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
(Release ID: 2315068)
अभ्यागत कक्ष : 37