नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विशेष ‘बार्ज रोल ऑफ’ प्रक्रियेचा अवलंब करून मुंबई बंदरावर जास्त वजनाच्या सामानांची यशस्वी हाताळणी


अबू धाबीला जाणा-या 718, 502 आणि 232 मेट्रिक टन वजनाच्या  तीन प्रचंड आकाराचे सामानाची  मुंबई बंदरात यशस्वी हाताळणी

Posted On: 25 SEP 2026 5:05PM by PIB Mumbai


मुंबई बंदर प्राधिकरणाने 24 सप्टेंबर 2026 रोजी विशेष बार्ज रोल-ऑफ (क्रेनऐवजी अनेक चाकांच्या ट्रेलर्सच्या सहाय्याने माल थेट चाकांवरून किनाऱ्यावर उतरवण्याच्या पद्धतीने ) प्रक्रियेचा अवलंब करून तीन अत्यंत वजनदार आणि प्रचंड  आकाराची मालवाहू  पॅकेजेसची यशस्वी हाताळणी केली.  मुंबई बंदर प्राधिकरणाच्या या कामगिरीतून अत्यंत मोठ्या वजनाची जटिल स्वरुपाची माल हाताळणी, विशिष्ट प्रकारच्या मालाचे विशिष्ट स्वरुपातील व्यवस्थापन तसेच भारतात उत्पादित औद्योगिक उपकरणांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुलभतेने वाहतूक करण्यासंदर्भातील मुंबई बंदराची क्षमता अधोरेखित झाली आहे.

याअंतर्गत गुजरातमधल्या दाहेज इथून बार्जद्वारे (लहान मालवाहू नौका) संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनीकडे निर्यात करण्यासाठी 718 मेट्रिक टन, 502 मेट्रिक टन आणि 232 मेट्रिक टन वजनाचे हे तीन पॅकेजेस मुंबई बंदरावर आणण्यात आले होते. आता पुढील जहाजाची उपलब्धता होईपर्यंत हा माल मुंबई बंदरावरच साठवून ठेवला जाणार आहे.

या मालामध्ये 718 मेट्रिक टन वजनाचे वायू शीतक यंत्र (PG Cooler - Process Gas Cooler), 502 मेट्रिक टन वजनाचे द्रव तसेच बाष्पीय घटक वर-खाली वाहून नेणाऱ्या वाहिन्या (Riser & Downcomer) आणि 232 मेट्रिक टन वजनाचे बाष्प संकलक (Steam Drum) या उत्पादनांचा समावेश होता. या पॅकेजेसचा अवाढव्य आकार आणि वजन यामुळे जहाजावरील नेहमीच्या क्रेन किंवा किनाऱ्यावरील क्रेनसारख्या पारंपरिक पद्धतींद्वारे हा माल उतरवणे शक्य नव्हते.

त्यामुळे मुंबई बंदर प्राधिकरणाने हा माल सुरक्षितपणे उतरवण्यासाठी या विशेष बार्ज रोल-ऑफ पद्धतीचा अवलंब केला. या पद्धतीअंतर्गत माल घेऊन आलेली मालवाहू नौका (बार्ज) बंदराच्या किनाऱ्याला काटकोनात उभी करण्यात आली आणि नौकांचे सपाट पृष्ठभाग किनाऱ्यालगत एका रेषेत आणले गेले. त्यानंतर हायड्रोलिक पुलर अर्थात द्रव घटकावर चालणारी ओढण्याची यंत्रे असलेले ट्रेलर्स मालवाहू नौकेवर नेऊन या पॅकेजेसच्या खाली योग्य स्थितीत उभे करण्यात आले. मग हायड्रोलिक प्रणालीचा वापर करून ट्रेलर्सद्वारे ही पॅकेजेस उचलून अत्यंत काळजीपूर्वक चाकांवरून सरकवत किनाऱ्यावर आणली गेली.

मुंबई बंदराच्या लॉक गेट अर्थात जलकवाडाच्या आत जहाज बांधणीची जागा (Berth) उपलब्ध होती, आणि हीच बाब या संपूर्ण प्रक्रियेत अत्यंत फायदेशीर ठरले. जलकवाडातील स्थीर पाण्यामुळे या अत्यंत वजनदार मालाची वाहतूक सुरू असताना मालवाहू नौका आणि किनारा या दोघांमध्ये आवश्यक असलेले संतुलन राखणे शक्य झाले.

मोठ्या औद्योगिक उपकरणांच्या वाहतुकीसाठी किनारपट्टीवरून होणारी जलवाहतूक, त्यासाठीच्या बंदरावरील पायाभूत सुविधा, साठवणूक सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सागरी जोडणी या सगळ्यात समन्वय असणाचे महत्त्व या घडामोडीतून अधोरेखीत झाले आहे. आकार आणि वजनामुळे  ज्या उपकरणांची पारंपरिक पद्धतीने वाहतूक करणे कठीण होते, अशा उपकरणांच्या वाहतुकीसाठी रसद पुरवठा व्यवस्थापनाअंतर्गत   किनारपट्टीवरून होणाऱ्या जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध असल्याचेही यातून दिसून आले आहे.

या यशस्वी कामगिरीतून देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील औद्योगिक केंद्रांना जागतिक बाजारपेठांशी जोडणारे,  सागरी आणि रसद पुरवठा व्यवस्थापनाचे एक प्रमुख प्रवेशद्वार म्हणून मुंबई बंदराची भूमिका देखील पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. देशांतर्गत उत्पादन, प्रकल्प रसद पुरवठा व्यवस्थापन आणि निर्यातीला पाठबळ देण्याच्या प्रक्रियेत कार्यक्षम बंदरे आणि किनारपट्टीवरील जलवाहतुकीचे महत्त्वही यातून अधोरेखित झाले आहे.

मुंबई बंदर प्राधिकरण कार्यक्षम तसेच विश्वासार्ह माल हाताळणी विषयीच्या उपायोयोजना उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच देशाचा सागरी व्यापार आणि उत्पादन आधारित निर्यातीला पाठबळ देण्यासाठी मुंबई बंदराची भूमिका अधिक भक्कम करण्यात योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे.

***

सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315066) अभ्यागत कक्ष : 46
Read this releasein: English