Posted On:
23 SEP 2026 8:06PM by PIB Mumbai
मुंबई, 23 सप्टेंबर 2026
वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागांतर्गत असलेल्या 'केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळा'च्या (सीबीआयसी) 'करदाता सेवा महासंचालनालय' (डीजीटीएस) मुंबई विभागीय युनिटने, सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, ठाणे आयुक्तालय यांच्या सहकार्याने 23 सप्टेंबर 2026 रोजी "करदात्यांचे सक्षमीकरण आणि नियमांचे पालन सुलभ करणे" या विषयावर एका संपर्क कार्यक्रमाचे आयोजन केले.
जीएसटी प्रक्रिया आणि नियमांचे पालन यांबाबत जागरूकता वाढवणे तसेच कर प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात कर अधिकारी, कर क्षेत्रातील व्यावसायिक, करदाते, व्यापार तसेच उद्योग क्षेत्रांचे प्रतिनिधी आणि इतर हितधारक एकत्र आले होते.
सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, ठाणे आयुक्तालयाचे आयुक्त अखिलेश पांडे यांच्या स्वागतपर भाषणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. करदात्यांशी नियमित संपर्क आणि संवाद साधण्याचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले; तसेच, वेळेवर मार्गदर्शन आणि संवादाद्वारे प्रत्यक्ष अडचणींचे निवारण करणे आणि नियमांचे पालन अधिक सुलभ करण्यावर त्यांनी भर दिला.
डीजीटीएसच्या मुंबई विभागीय युनिटचे प्रधान अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांचे बीजभाषण झाले. त्यांनी करदात्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, तक्रार निवारण सुलभ करणे आणि करदाते आणि कर प्रशासन यांच्यातील संवाद अधिक दृढ करणे यांमध्ये 'करदाता संपर्क उपक्रमां'ची भूमिका अधोरेखित केली. तसेच, जीएसटी नोंदणी, परतावा आणि जीएसटीएटी समोरील अपील प्रक्रिया समजून घेण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.
पहिले तांत्रिक सत्र विनय भूषण अँड असोसिएट्सचे सनदी लेखापाल अंकित शाह यांनी घेतले, त्यांनी जीएसटी नोंदणी चौकट आणि परतावा प्रक्रिया समजावून सांगितली. नोंदणीची आवश्यकता, कालमर्यादा, दुरुस्त्या, रद्द करणे आणि मागे घेणे , ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ दस्तऐवजीकरण आणि कलम 54 अंतर्गत परताव्याच्या तरतुदी या मुद्द्यांवर त्यांनी माहिती दिली.

सनदी लेखापाल विनय भूषण यांनी घेतलेल्या दुसऱ्या सत्रात, जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणासमोर अपील करण्यासाठीच्या ई-फायलिंग प्रक्रियेवर प्रामुख्याने भर दिला. सहभागींना फायलिंगची कालमर्यादा, प्री -डिपॉझिट आवश्यकता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन फायलिंग प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आली.
जीएसटी अनुपालन, परताव्याशी संबंधित समस्या आणि ‘GSTAT’ अपील यांवरील संवादात्मक चर्चेने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमासह, डीजीटीएस, मुंबई विभागीय युनिटने एप्रिल 2026 पासून 49 संपर्क कार्यक्रमांचे आयोजन केले किंवा काही कार्यक्रमात सहभाग नोंदवला.यामध्ये 28 सेमिनार/वेबिनार/प्रत्यक्ष-आभासी असे मिश्र कार्यक्रम आणि 21 संवादात्मक सत्रांचा समावेश होता. कर साक्षरता, ऐच्छिक अनुपालन आणि प्रभावी करदाता सेवांना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमांचा उद्देश आहे.
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai