दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
बनावट सिमकार्ड आणि IMEI छेडछाडीपासून सावध राहण्याचे दूरसंचार विभाग, मुंबईचे आवाहन
गैरवापर केल्यास 3 वर्षांपर्यंत कारावास आणि ₹50 लाखांपर्यंत दंड
‘संचार साथी’ पोर्टल व ॲपद्वारे मोबाईल कनेक्शन आणि हँडसेटची पडताळणी करण्याचे आवाहन
Posted On:
22 SEP 2026 6:56PM by PIB Mumbai
मुंबई, 22 सप्टेंबर 2026
दूरसंचार विभाग, मुंबईने नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवणे, सिमकार्डचा गैरवापर करणे, दूरसंचार ओळख क्रमांकांमध्ये अनधिकृत बदल करणे तसेच मोबाईल हँडसेटच्या IMEI क्रमांकात छेडछाड करण्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. दूरसंचार अधिनियम, 2023 अंतर्गत अशा गैरप्रकारांसाठी 3 वर्षांपर्यंत कारावास आणि ₹50 लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये एका PoS एजंटने नागरिकांच्या ओळखपत्रांचा त्यांच्या संमतीशिवाय वापर करून 25 मोबाईल कनेक्शन्स बेकायदेशीररीत्या सक्रिय केल्याचे आढळून आले. संबंधित एजंटला ब्लॅकलिस्ट करण्यात आले असून, संशयास्पद क्रमांकांची पुनर्पडताळणी करून आवश्यकतेनुसार ते निष्क्रिय करण्यात आले आहेत.
नागरिकांनी या बाबी टाळाव्यात
- आपल्या नावावर जारी केलेले सिमकार्ड इतरांना देऊ किंवा हस्तांतरित करू नये.
- बनावट कागदपत्रे किंवा दुसऱ्याची ओळख वापरून सिमकार्ड मिळवू नये.
- छेडछाड केलेले IMEI असलेली उपकरणे किंवा बदल करता येणारे SIM Box वापरू नयेत.
- Calling Line Identity (CLI) किंवा इतर दूरसंचार ओळख क्रमांकांमध्ये अनधिकृत बदल करू नये.
- सायबर फसवणूक किंवा अन्य बेकायदेशीर कृत्यांसाठी सिमकार्ड उधार देऊ किंवा भाड्याने देऊ नये.
‘संचार साथी’द्वारे करा पडताळणी
नागरिक ‘संचार साथी’ पोर्टल आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून त्यांच्या नावावर जारी करण्यात आलेली सर्व मोबाईल कनेक्शन्स तपासू शकतात तसेच आवश्यक नसलेली किंवा त्यांच्या परवानगीशिवाय जारी करण्यात आलेली कनेक्शन्सची माहिती देऊन ती ब्लॉक करू शकतात. या प्लॅटफॉर्मवर हँडसेटच्या IMEI क्रमांकाची सत्यता पडताळण्याची सुविधाही उपलब्ध असून, त्याद्वारे मोबाईलचा ब्रँड, मॉडेल आणि उत्पादक यांसारखी माहिती तपासता येते.
दूरसंचार विभाग, मुंबईने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या सिमकार्ड आणि IMEI क्रमांकाकडे डिजिटल ओळखीचे महत्त्वाचे घटक म्हणून पाहावे, त्यांची नियमितपणे पडताळणी करावी, ते सुरक्षित ठेवावेत आणि दूरसंचार सेवांचा वापर केवळ कायदेशीर चौकटीतच करावा. नागरिकांनी आपल्या ओळखपत्रांचा गैरवापर होणार नाही याबाबत सतर्क राहावे तसेच कोणतेही संशयास्पद किंवा अनधिकृत मोबाईल कनेक्शन आढळल्यास त्याची तात्काळ दूरसंचार सेवा प्रदात्याकडे किंवा संबंधित कायदा अंमलबजावणी यंत्रणेकडे माहिती द्यावी.
‘संचार साथी’ पोर्टल येथे उपलब्ध आहे - www.sancharsaathi.gov.in
पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके / प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2313610)
अभ्यागत कक्ष : 24