Posted On:
21 SEP 2026 10:10PM by PIB Mumbai
नागपूर,21 सप्टेंबर 2026
रिझर्व्ह बँकेतर्फे नागपूर इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात 650 महिला पोलीस प्रशिक्षणार्थी आणि 50 प्राध्यापकांसाठी क्षेत्रीय स्तरावरचा ‘सुपर आउटरीच’ वित्तीय साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रशिक्षण घेत असलेल्या महिला पोलीस प्रशिक्षणार्थींमध्ये महत्त्वाच्या वित्तीय बाबींविषयी जागरूकता निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक सोनाली सेन गुप्ता होत्या. त्यांच्यासोबत नागपूर आरबीआयचे प्रादेशिक संचालक सचिन शेंडे उपस्थित होते. तसेच पोलीस अधीक्षक आणि पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य रिना जनबंधू, आरबीआयच्या उपमहाव्यवस्थापक अंजना श्यामनाथ, आरबायचे उपमहाव्यवस्थापक सचिन शर्मा आणि पीटीसीचे उपप्राचार्य प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते.

आपल्या प्रमुख भाषणात सोनाली सेन गुप्ता यांनी प्रशिक्षणार्थींच्या बांधिलकीचे आणि समाजासाठी त्या देत असलेल्या अर्थपूर्ण योगदानाचे कौतुक केले. वित्तीय साक्षरतेच्या दूत म्हणून प्रशिक्षणार्थी बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. समाजातल्या विविध घटकांमध्ये वित्तीय संकल्पनांविषयी अधिक जागरूकता आणि समज निर्माण करण्यासाठी प्रशिक्षणार्थी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वित्तीय साक्षरता ही केवळ पोलीस प्रशिक्षणार्थींसाठी वैयक्तिक संपत्तीशी संबंधित नसून, त्यांना सचोटी, लवचिकता आणि दूरदृष्टीने सेवा बजावण्यास सक्षम करणारी अत्यावश्यक व्यावसायिक क्षमता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सेवेत असताना तसेच सेवेत नसतानाही माहितीपूर्ण, जबाबदार आणि परिणामकारक निर्णय घेण्यासाठी योग्य वित्तीय सवयी, सखोल ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित करणे ही मूलभूत साधने असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सचिन शेंडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात महिला सक्षमीकरण हे सर्वसमावेशक आणि शाश्वत राष्ट्रीय विकासाचा आधारस्तंभ असल्याचे नमूद केले. वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल वित्तीय परिसंस्थेच्या पार्श्वभूमीवर डिजिटल फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले. यासाठी अधिक जागरूकता, सतर्कता आणि डिजिटल वित्तीय व्यवहारांमध्ये सुरक्षित वापराची गरज त्यांनी अधोरेखित केली.
महिला प्रशिक्षणार्थींना समजायला सोप्या पद्धतीने आवश्यक वित्तीय ज्ञान देण्यासाठी मराठी ‘नुक्कड नाटक’ अर्थात पथनाट्य सादर करण्यात आले.
_20260921193319_548fb5.jpeg)
नागपूर आरबीआय आणि नागपूर पीटीसी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महिला पोलीस प्रशिक्षणार्थींसाठी सलग तिसऱ्या तुकडीकरिता आयोजित करण्यात आलेल्या या वित्तीय साक्षरता कार्यक्रमातली सत्रे संवादात्मक, माहितीपूर्ण आणि परिणामकारक ठरली. संस्थात्मक स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या विशेष ‘सुपर आउटरीच’ उपक्रमाचा एक भाग म्हणून नागपूर आरबीआयतर्फे दरवर्षी महिला पोलीस प्रशिक्षणार्थींसाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या प्रशिक्षणार्थींची लवकरच महाराष्ट्र राज्यातल्या विविध भागांत नियुक्ती होणार आहे.
या सत्रांमध्ये प्रशिक्षणार्थींना आरबीआय रिटेल डायरेक्ट, RBIOS, DICGC कव्हर, बँकिंग व्यवहारांमधली सायबर सुरक्षा आणि चलनी नोटांची सुरक्षा वैशिष्ट्ये याविषयी माहिती देण्यात आली.
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai