नौवहन मंत्रालय
वाहतूक आणि रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने रस्त्यांच्या आधुनिकीकरणाचे काम घेतले हाती
Posted On:
21 SEP 2026 6:46PM by PIB Mumbai
मुंबई, 21 सप्टेंबर 2026
वाढती वर्दळ लक्षात घेत, तसेच प्रवासी आणि बंदराशी संबंधित वाहतुक अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी, मुंबई बंदर प्राधिकरणाने (एमबीपीए) रस्ते पायाभूत सुविधांना बळकट आणि अद्ययावत करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
मुंबई बंदर परिसरातील रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर समुद्रात भराव घालून तयार केलेल्या जमिनीवर विकसित केले गेले आहे. सध्या या रस्त्यांवर मूळ नियोजित क्षमतेपेक्षा लक्षणीय अधिक वाहतूक होत आहे. अटल सेतूच्या कार्यान्वयनामुळे बंदराच्या रस्त्यांवरील वाहतुकीत आणखी वाढ झाली आहे. सध्या या रस्त्यांवरून प्रवासी वाहने आणि बंदरातील मालवाहतुकीत गुंतलेल्या अवजड वाहनांव्यतिरिक्त दररोज सुमारे 9,200 व्यावसायिक वाहने ये-जा करतात.
दीर्घकालीन आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य सुधारणा करण्यासाठी प्राधिकरणाने या रस्त्यांच्या जाळ्याच्या पद्धतशीर आधुनिकीकरणासाठी आयआयटी मुंबईची डिझाइन आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून नियुक्ती केली आहे.आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार तसेच सध्याच्या आणि भविष्यातील वाहतुकीच्या गरजांनुसार रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबवला जात आहे.
पहिल्या टप्प्याअंतर्गत, शिवडी जंक्शन ते माहुल पर्यंतच्या सुमारे 2.6 किमी लांबीच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. या कामाचे कंत्राट 1 नोव्हेंबर 2026 पर्यंत दिले जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत, एनटीओबी ते शिवडी पर्यंतच्या उर्वरित प्रमुख रस्त्याच्या भागाचे उन्नतीकरण प्रस्तावित असून हे कंत्राट 1 फेब्रुवारी 2027 पर्यंत दिले जाण्याची शक्यता आहे.
खारू खाडीवरील रस्ता बंद असल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाय म्हणून एमबीपीएने खारू खाडीवर पोलादी पूल बांधण्यासाठी आराखडा आणि प्रकल्प व्यवस्थापनाची जबाबदारी आयआयटी मुंबईकडे सोपवली आहे. हे काम प्राधान्याने हाती घेण्यात येत असून पुढील पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
शहर आणि बंदराशी संबंधित वाढती वाहतूक, अटल सेतू सुरू झाल्यानंतर बदललेली प्रादेशिक संपर्क व्यवस्था आणि अवजड व्यावसायिक वाहनांची सततची वाहतूक या सर्वांच्या एकत्रित परिणामांना तोंड देण्याच्या उद्देशाने रस्ते सुधारणा उपाययोजना करण्यात येत आहेत.
तात्काळ वाहतूक व्यवस्थापन उपाययोजना आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाद्वारे, मुंबई बंदर प्राधिकरण रस्ते सुरक्षा, प्रवासाचा दर्जा आणि वाहतुकीची सुलभता वाढवण्यासाठी कार्यरत आहे, त्याचबरोबर बंदरातील रस्त्यांचे जाळे मुंबईच्या वाढत्या वाहतूक आणि लॉजिस्टिक्सच्या गरजांशी सुसंगत राहील याचीही खात्री करत आहे.
पीआयबी मुंबई |निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2313146)
अभ्यागत कक्ष : 28