Posted On:
21 SEP 2026 5:43PM by PIB Mumbai
मुंबई, 21 सप्टेंबर 2026
संचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागांतर्गत महाराष्ट्र आणि गोवा येथील नियंत्रक संचार लेखा (सीसीए) कार्यालयाने 21 सप्टेंबर 2026 रोजी ऑनलाइन पद्धतीने दूरसंचार संपर्क कार्यक्रम (टीओपी) आयोजित केला होता. महाराष्ट्र आणि गोव्याचे संचार लेखा नियंत्रक डॉ. सतीश चंद्र झा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दूरसंचार परवानाधारकांमध्ये परवाना करारातील प्रमुख तरतुदींविषयी जागरूकता वाढवणे आणि दूरसंचार क्षेत्रातील भागधारकांशी, विशेषतः विद्यमान आणि नवीन परवानाधारकांशी संवाद आणि सहभाग मजबूत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम वापर शुल्काच्या संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र आणि गोवा दूरसंचार मंडळ हे देशातील दुसरे सर्वात मोठे सर्कल आहे, अशी माहिती डॉ. सतीश चंद्र झा यांनी उपस्थितांना संबोधित करताना दिली. या सर्कलने बिगर कर महसूल संकलनात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, 2025-26 या वर्षात अंदाजे 2,380 कोटी रुपयांचे एकत्रित संकलन झाले आहे, असेही ते म्हणाले.
पारदर्शकता वाढवण्यासाठी, नियामक अनुपालनाला चालना देण्यासाठी आणि हितधारकांच्या चिंता वेळेवर दूर करण्यासाठी दूरसंचार परवानाधारकांशी नियमित संवाद साधण्याच्या महत्त्वावर डॉ. झा यांनी भर दिला. विशेषतः नवीन परवानाधारकांना प्रभावी सहाय्य आणि मार्गदर्शन देण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा येथील सीसीए कार्यालयाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

या कार्यक्रमाला 30 दूरसंचार परवानाधारक उपस्थित होते. या कार्यक्रमात व्हर्च्युअल नेटवर्क ऑपरेटर (व्हीएनओ) परवानाधारकांवर विशेष भर देण्यात आला. वार्षिक मूल्यांकनासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे वेळेवर सादर करण्याबाबत सहभागींना जागरूक करण्यात आले. या कागदपत्रांमध्ये विधीवत स्वाक्षरी केलेले एनएसओ क्लेम शीट, एनएसओ करार आणि इतर संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे.
या सत्रात बँक हमीपत्र (बीजी) व्यवस्थापन, संपर्क पोर्टलवर परवानाधारकांची नोंदणी, त्रैमासिक परवाना शुल्काचा वेळेवर भरणा, त्रैमासिक कागदपत्रे सादर करणे आणि वार्षिक लेखापरीक्षित कागदपत्रे वेळेवर सादर करणे यांसारख्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.
यावेळी एक संवादात्मक सत्रही आयोजित करण्यात आले होते. यासत्रात दूरसंचार परवानाधारकांनी उपस्थित केलेल्या शंका आणि समस्यांचे निराकरण संबंधित अधिकाऱ्यांनी केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. भागधारकांशी सततचा संवाद तसेच एक पारदर्शक, कार्यक्षम आणि प्रतिसाद देणारी दूरसंचार परिसंस्था निर्माण करण्याची कार्यालयाची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली.
पीआयबी मुंबई |निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai