संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यातील 25 समुद्रकिनारे किनारपट्टी स्वच्छता अभियानासाठी एकत्र; 3,800 हून अधिक स्वयंसेवकांनी 2.76 टन सागरी कचरा केला गोळा


भारतीय तटरक्षक दलाच्या नेतृत्वाखाली पृथ्वी विज्ञान मंत्रालय, एनसीपीओआर, एनआयओ, गोवा सरकार, स्वयंसेवी संस्था आणि सामुदायिक संघटनांच्या सहकार्याने उपक्रम; गोव्याचे समुद्रकिनारे आणि समुद्र स्वच्छ ठेवण्याच्या सामूहिक जबाबदारीवर भर

Posted On: 19 SEP 2026 4:50PM by PIB Mumbai

 

गोव्याच्या किनारपट्टीवरील समुद्रकिनारे आणि सागरी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांना चालना देत भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी), पृथ्वी विज्ञान मंत्रालय (एमओईएस), गोवा सरकार, लायन्स इंटरनॅशनल, व्हायब्रंट गोवा फाउंडेशन आणि इतर संबंधित घटकांच्या सहकार्याने आज राज्यातील 25 समुद्रकिनाऱ्यांवर आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन (आयसीसी) 2026 आयोजित केला.

सकाळी 6.30 ते 9.30 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात ग्रामपंचायती, महानगरपालिका, सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, सामुदायिक संघटना आणि स्थानिक स्वयंसेवकांसह 3,878 हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले. सहभागी स्वयंसेवकांनी गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवरून सुमारे 2,760 किलो प्लास्टिक आणि इतर सागरी कचरा गोळा केला.

“स्वच्छ सागर, सुरक्षित तट – यही पहचान हमारी” या संकल्पनेवर आणि स्वच्छ सागर सुरक्षित सागर (एसएसएसएस) 5.0 अंतर्गत हे अभियान आयोजित करण्यात आले. सागरी पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचे आणि किनारपट्टीवरील प्रदूषण कमी करण्याचे महत्त्व या अभियानातून अधोरेखित करण्यात आले.

मुख्य कार्यक्रम मिरामार समुद्रकिनारी आयोजित करण्यात आला. गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी या किनारपट्टी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे जिल्हा कमांडर-11, गोवा, डीआयजी मनोज भाटिया, टीएम, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिवांचे सल्लागार पवनजीत सिंह संधू, एनसीपीओआरचे वैज्ञानिक-एफ डॉ. अल्वारिन्हो लुईस आणि एनआयओचे संचालक प्रा. एस. के. सिंह यांच्यासह तटरक्षक दलाचे अधिकारी आणि सहभागी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

गोवा राज्यातील मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींनीही आपापल्या मतदारसंघातील समुद्रकिनाऱ्यांवर या अभियानात सहभाग घेतला. वाहतूक, उद्योग, पंचायत राज, शिष्टाचार आणि विधिमंडळ कामकाज मंत्री मौविन गोडिन्हो, कला व संस्कृती, आदिवासी कल्याण तसेच क्रीडा व युवक व्यवहार मंत्री रमेश तवडकर, बेनाउलिमचे आमदार व्हेन्झी व्हिएगास, कॉर्तालिमचे आमदार अँटोनियो वास आणि मोरमुगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्यासह इतर मान्यवर आणि संबंधित घटकांनी या अभियानात सहभाग घेतला.

राज्यातील स्थानिक समुदाय, सरकारी यंत्रणा, स्वयंसेवक आणि विविध संघटनांच्या सहभागामुळे गोव्याच्या किनारपट्टीच्या संरक्षणासाठी सामूहिक कृतीचे महत्त्व अधोरेखित झाले. गोव्याच्या पर्यावरण, पर्यटन आणि किनारपट्टीवरील उपजीविकेसाठी ही किनारपट्टी अत्यंत महत्त्वाची आहे.

या उपक्रमातून स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छता ही सेवा अभियानाच्या उद्दिष्टांनाही बळकटी मिळाली. नागरिकांनी जबाबदार पद्धतींचा अवलंब करावा आणि कचरा समुद्रापर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी या अभियानातून प्रोत्साहन देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन 2026 च्या माध्यमातून भारतीय तटरक्षक दलाने गोव्याच्या किनारपट्टी आणि सागरी परिसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. त्याचबरोबर समुद्राच्या जबाबदार आणि शाश्वत वापराबाबत जनजागृती वाढविण्यावरही भर देण्यात आला.

***

माधुरी पांगे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

Follow us on social media: @PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(Release ID: 2312594) अभ्यागत कक्ष : 47
Read this releasein: English