कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डब्ल्यूसीएलने विशेष मोहीम 6.0 साठी उच्च उद्दिष्टे निश्चित केली


स्वच्छता, शाश्वत विकास, कार्यक्षम साधनसामुग्री व्यवस्थापन आणि सुशासन यावर लक्ष केंद्रित

Posted On: 18 SEP 2026 12:28PM by PIB Mumbai

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, (डब्ल्यूसीएल) ने अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत शरद पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक मनुष्यबळ विकास, बिक्रम घोष यांच्या नेतृत्वाखाली 17 सप्टेंबर 2026 रोजी स्वच्छता ही सेवा 2026 आणि विशेष मोहीम 6.0 सुरू केली. यावेळी, स्वच्छता जागरूकता, सार्वजनिक सहभाग, स्वच्छ कार्यस्थळे आणि प्रभावी कचरा व्यवस्थापन यावर भर देत, स्वच्छतेला दैनंदिन कार्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनवण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली. डब्ल्यूसीएलचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि सफाई मित्र या कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी झाले.

विशेष मोहिम 5.0 च्या यशस्वी कामगिरीच्या आधारावर, डब्ल्यूसीएलने विशेष मोहीम 6.0 साठी वाढीव उद्दिष्टे निश्चित केली आहेत. विशेष मोहीम 5.0 दरम्यान, डब्ल्यूसीएलने आपली कार्यालये, आस्थापना आणि कार्यक्षेत्रांमधील 277 ठिकाणी स्वच्छता आणि कार्यस्थळ सुधारणा उपक्रम यशस्वीपणे राबवले. या मोहिमेत निरुपयोगी साहित्याची विल्हेवाट आणि पद्धतशीर अभिलेख व्यवस्थापनातही लक्षणीय प्रगती दिसून आली.

विशेष मोहीम 6.0 अंतर्गत, डब्ल्यूसीएलने सुमारे 6.50 लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या 300 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीने 539.65 मेट्रिक टन भंगाराची विल्हेवाट लावण्याचे लक्ष्यही ठेवले आहे, ज्यातून अंदाजे ₹2.27 कोटी महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

अभिलेख व्यवस्थापन हे देखील या मोहिमेचे एक प्रमुख केंद्रबिंदू राहील. डब्ल्यूसीएलने 500 कागदी फायली आणि 7,500 ई-फायलींचे पुनरावलोकन, तसेच 500 कागदी फायलींची अनावश्यकतेची छाननी करणे आणि 7,500 ई-फायली बंद करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या उपक्रमांमुळे प्रलंबित प्रकरणांचा वेळेवर निपटारा, पद्धतशीर अभिलेख व्यवस्थापन आणि कार्यालयीन कामकाजात अधिक कार्यक्षमता आणण्यास मदत होईल.

स्वच्छता ही सेवा 2026 अंतर्गत, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकविरोधात जनजागृती, कचरा वर्गीकरण, कचऱ्यातून संपत्ती, सार्वजनिक सहभाग आणि नागरी जबाबदारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. विशेष मोहीम 6.0 मध्ये ई-कचरा व्यवस्थापन, आधुनिक स्वच्छता पद्धती, उपलब्ध जागेचा इष्टतम वापर, डिजिटलीकरण, पर्यावरणपूरक पद्धती, निरुपयोगी साहित्याची योग्य विल्हेवाट आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा यावर विशेष भर दिला जाईल.

या मोहिमा डब्ल्यूसीएलचे मुख्यालय, विभाग, खाणी आणि आस्थापनांमध्ये कर्मचारी आणि हितधारकांच्या सक्रिय सहभागातून राबवल्या जातील. स्वच्छता, साधनसामुग्रीचा कार्यक्षम वापर आणि प्रशासकीय कार्यक्षमता या गोष्टींना डब्ल्यूसीएलच्या संस्थात्मक कार्यसंस्कृतीमध्ये रुजलेल्या शाश्वत पद्धतींमध्ये रूपांतरित करणे, हे या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे.

***

NitinFulluke / RajeshShirbhate / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2311905) अभ्यागत कक्ष : 55
Read this releasein: English