कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी 'विशेष स्वच्छता मोहीम 6.0 साठी वेब पोर्टलचे उद्घाटन केले; स्वच्छतेच्या मोहिमेला संपूर्ण सरकार आणि संपूर्ण राष्ट्र यांची चळवळ असल्याचे प्रतिपादन

Posted On: 16 SEP 2026 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026

विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच भू-विज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन, अणुऊर्जा व अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज विशेष मोहीम 6 साठी वेब पोर्टलचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 2014 मध्ये सुरू झालेली स्वच्छता मोहीम आता केवळ स्वच्छतेचा एक साधा उपक्रम न राहता संपूर्ण सरकार आणि संपूर्ण राष्ट्र यांची चळवळ बनली आहे. भंगार विल्हेवाट, वर्तणुकीतील बदल, सरकारी कामकाजातील कार्यक्षमता सुधारणे आणि कचऱ्यातून आर्थिक मूल्य निर्मिती यांद्वारे या मोहिमेतून आतापर्यंत 5,000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

उद्घाटन कार्यक्रमात संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, ही मोहीम सरकारच्या नागरिक-केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. जेव्हा एखादे राष्ट्रीय आवाहन नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या मूलभूत मुद्द्यांना हाताळते, तेव्हा ती कशी जनचळवळ बनू शकते, याचे उदाहरण या मोहिमेने घालून दिले आहे.

योग्य पद्धतीने स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनातूनही भरीव आर्थिक मूल्य निर्माण होऊ शकते, हे या मोहिमेने सिद्ध केले आहे. गेल्या पाच वर्षांत भंगार विल्हेवाटीतून 5,000 कोटी रुपये कमावले गेले आहेत, तर 1,000 लाख चौरस फूट कार्यालयीन जागा मोकळी करण्यात आली आहे. तसेच, 24 लाखांहून अधिक ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे उपक्रम राबवण्यात आले आणि रेकॉर्ड व्यवस्थापन सुधारण्यासाठी सुमारे 2 कोटी फाइल्सची विल्हेवाट लावण्यात आली. ही कामगिरी स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन सरकारी संसाधनांचा कार्यक्षम वापर, प्रलंबित कामांमध्ये घट, सार्वजनिक जागांचा उत्तम वापर आणि कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर या दिशेने मोहिमेचा विस्तार दर्शवते.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, 2 ऑक्टोबर (गांधी जयंती) ते 31 ऑक्टोबर (सरदार पटेल जयंती) हा मोहिमेचा विशेष कालावधी म्हणजे केवळ एका महिन्यापुरती स्वच्छता कामे करण्याचा काळ मानला जाऊ नये. त्याऐवजी, ही मोहीम वर्षभर स्वच्छता, कार्यक्षमता आणि तत्परता राखण्याच्या संकल्पाची आणि वचनबद्धतेची वार्षिक उजळणी ठरते. त्यांनी नमूद केले की, मोहिमेच्या मागील आवृत्त्यांमधून मिळालेल्या अनुभवामुळे विशेष मोहीम 6 साठी एक भक्कम पाया तयार झाला आहे आणि यामुळे ही मोहीम अधिक एकाग्रतेने व प्रभावीपणे पुढे नेणे शक्य होईल.

 

शैलेश पाटील/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर 


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2311158) अभ्यागत कक्ष : 6
Read this releasein: English , हिन्दी