आयुष मंत्रालय
पारंपरिक वैद्यकीय ज्ञान,अनुवांशिक संसाधने आणि बौद्धिक स्वामित्व संपदा विषयांवरील तिसऱ्या बिमस्टेक परिषदेचा गोव्यात प्रारंभ
बिमस्टेक समन्वयक समुहाची दुसरी बैठकही संपन्न, संरक्षण, दस्तऐवजीकरण आणि न्याय्य लाभ भागीदारीवर भर
Posted On:
16 SEP 2026 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026
पारंपरिक वैद्यकीय ज्ञान, अनुवांशिक संसाधने आणि बौद्धिक मालमत्ता अधिकारांवरील तिसऱ्या बिमस्टेक परिषदेला आज गोव्यात प्रारंभ झाला. केंद्रीय आयुष मंत्रालयाने या परिषदेचे आयोजन केले आहे. गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था ही या कार्यक्रमाची समन्वयक संस्था आहे.
पारंपरिक वैद्यकीय ज्ञान, अनुवांशिक संसाधने आणि बौद्धिक स्वामित्व संपदा या विषयांवरील बिमस्टेक समन्वयक समुहाच्या दुसऱ्या बैठकीसोबत, समांतरपणेच या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले जात आहे. या परिषदेत बिमस्टेक सदस्य देशांतील तज्ञ, अधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव मोनालिसा दास या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पारंपरिक औषधांवरील बिमस्टेक कृती दलाची महत्वाची भूमिका त्यांनी अधोरेखीत केली. संशोधन, शिक्षण, क्षमता बांधणी, मानकीकरण, फार्माकोपियल विकास, नियामक सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण या क्षेत्रांतील सहकार्याला हा कार्यगट गती देऊ शकतो, असे त्या म्हणाल्या. एप्रिल 2025 मध्ये बँकॉक इथे आयोजित सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या प्रस्तावित बिमस्टेक पारंपरिक औषधे उत्कृष्टता केंद्राचाही त्यांनी उल्लेख केला.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक प्राध्यापक वैद्य पी. के. प्रजापती यांनी उद्घाटनीय भाषण केले. बिमस्टेक क्षेत्र हे पारंपरिक वैद्यकीय पद्धती, जैविक संसाधने आणि समुदाय ज्ञानाच्या समृद्ध तसेच विविध वारशाचे केंद्र आहे असे ते म्हणाले. कायदेशीर संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासोबतच पारंपरिक ज्ञानाच्या संरक्षणाला बळ देईल, तसेच पूर्व माहितीच्या आधारे दिलेली संमती, परस्पर संमतीच्या अटी आणि न्याय्य लाभ भागीदारीच्या माध्यमातून समुदाय हितांचे रक्षण करेल, असा सहकार्यात्मक आराखडा विकसित करणे या परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
‘बिम्स्टेक’ मधील विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष तसेच आरोग्य आणि मनुष्यबळ विकास विभागाचे संचालक कादिरकामु कंदसामी योगनादान यांनी सांगितले की, प्रादेशिक सहकार्याचे अंतिम उद्दिष्ट लोकांचे कल्याण साधणे, आरोग्य व्यवस्था बळकट करणे आणि भावी पिढ्यांसाठी पारंपरिक वैद्यकशास्त्राचा समृद्ध वारसा जतन करणे हे आहे.
या परिषदेच्या तांत्रिक सत्रांमध्ये पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण, बौद्धिक संपदा अधिकार, अनुवांशिक साधने, प्रवेश आणि लाभांची विभागणी, पूर्व-माहितीसह संमती, समुदाय अधिकार, तसेच जागतिक बौद्धिक संपदा संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याशी संबंधित उपक्रम यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
‘बिम्स्टेक’ सदस्य देशांच्या — बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड — प्रतिनिधींनी आपापल्या देशांमधील धोरणे, कायदेशीर चौकटी आणि अनुभव यांची माहिती दिली.
या परिषदेत पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय यावरही चर्चा झाली; यामध्ये नियंत्रित-प्रवेश दस्तऐवजीकरण, प्रायर-आर्ट अर्थात अस्तित्वात असलेल्या ज्ञानाचे संरक्षण आणि या अनुभवाचे संभाव्य प्रादेशिक महत्त्व या बाबींचा समावेश होता.
कृत्रिम बुद्धिमत्ता, पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण, बौद्धिक संपदा आणि नैतिक बाबी यांवरही चर्चा केली जात आहे.
बिम्स्टेक नोडल गटाची दुसरी बैठक प्रादेशिक सहकार्य, क्षमता बांधणी, तज्ञांचे जाळे, दस्तऐवजीकरणाचे निकष, डेटा व्यवस्थापन आणि सहकार्यासाठीच्या संभाव्य यंत्रणा यांवर विचारमंथन करेल. बिम्स्टेक क्षेत्रात पारंपरिक वैद्यकशास्त्राच्या ज्ञानाचे जतन आणि जबाबदार वापर यासाठी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, परिषदेतील चर्चेवर आधारित महत्त्वाच्या शिफारशींचा मसुदाही तयार केला जाईल.
गोवा येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. सुजाता कदम यांनी सांगितले की, प्रत्येक बिम्स्टेक सदस्य देशाकडे पिढ्यानपिढ्या विकसित झालेला पारंपरिक ज्ञानाचा समृद्ध वारसा आहे. परिषदेत योगदान दिल्याबद्दल त्यांनी सर्व सहभागी प्रतिनिधी, तज्ञ आणि संस्थांचे आभार मानले.
या परिषदेचा समारोप 17 सप्टेंबर 2026 रोजी होईल.



सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311083)
अभ्यागत कक्ष : 6