नागरी उड्डाण मंत्रालय
येत्या 17 सप्टेंबरपासून दाबोळीम विमानतळावर यात्री सेवा अभियानान या 25 दिवसांच्या उपक्रमाचा प्रारंभ होणार
या मोहिमेअंतर्गत विमानतळांवरील प्रवाशांसाठीची सहाय्य सुविधा, स्वच्छता, वावर सुलभता आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार
Posted On:
16 SEP 2026 4:21PM by PIB Mumbai
पणजी, 16 सप्टेंबर 2026
गोव्यातील दाबोळीम इथले गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ 17 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत देशभरातील विमातळांवर राबवल्या जात असलेल्या 25 दिवसांच्या यात्री सेवा अभियानात सहभागी होणार आहे. विमान प्रवास अधिक प्रवासीस्नेही, कार्यक्षम आणि समस्यामुक्त करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवले जात आहे.
हे अभियान भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने राबवले जात आहे. प्रवाशांना वेळेवर मदत देणे, योग्य मार्गदर्शन पुरवणे तसेच प्रवाशांना सेवा सुविधांच्या माध्यमातून आल्हाददायी अनुभव मिळेल याची सुनिश्चित करून, प्रवासाचा एकूण अनुभव अधिक समृद्ध करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत प्रवासी सुविधा, स्वच्छता, वावर सुलभता, योग्यरित्या माहिती पोहचवणे, तक्रार निवारण आणि तात्काळ सहाय्य पुरवणे अशा बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे.
या मोहिमेचा एक भाग म्हणून ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, दिव्यांग व्यक्ती आणि अतिरिक्त सहाय्याची गरज असलेल्या प्रवाशांना विशेषत्वाने सुविधा पुरवण्यावर भर दिला जाणार आहे. त्या दृष्टीनेच पुढाकार घेऊन प्रवाशांना मदत करण्यासाठी, प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच अत्यावश्यक सुविधा सहजतेने उपलब्ध राहतील याची सुनिश्चिती करण्यासाठी विमानतळावरील कर्मचारी आणि सेवा प्रदात्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून प्रवाशांना विमानतळावर उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि सेवांबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न केला जाईल. यासोबतच प्रवाशांकडून मिळणाऱ्या अभिप्रायाच्या आधारे अधिक सुधारणांसाठी वाव असलेल्या बाबी निश्चित केल्या जातील आणि त्यादृष्टीने उपाययोजनांची आखणी केली जाईल.
येत्या 17 सप्टेंबर रोजी या अभियानाचा प्रारंभ होईल. त्यानिमित्ताने वंदे मातरम् चे गायन, पहिल्यांदा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सहाय्य कार्यक्रम, प्रवाशांच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि सर्व्हिस विथ स्माईल अर्थात हसतमुख भावनेतून सेवा या उपक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या मोहिमेच्या दरम्यान जागतिक पर्यटन दिन आणि गांधी जयंती देखील साजरी केली जाणार आहे. यासोबतच अभियानाच्या अखेरच्या दिवशी समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.
या अभियानाच्या 25 दिवसांच्या कालावधीतील नियोजित केलेल्या उपक्रमांअंतर्गत स्वच्छ आणि स्वागतकक्ष स्वरुप परिसराची उभारणी, सुधारित वाहन तळ सुविधा आणि कोणत्याही समस्येशिवाय आगमनाची सुविधा, पुरेशी आसन व्यवस्था, सेवांच्या गुणवत्तांचे परीक्षण आणि वावराच्या दृष्टीने समस्या असलेल्या व्यक्ती, दिव्यांगजन, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांसाठी सुगम यात्रा ही विशेष सेवा अशा सेवा सुविधांचा समावेश आहे.
यासोबतच या मोहिमेअंतर्गत मार्गांवरील दिशादर्शक, सामानाची सुरक्षित हाताळणी, सुरक्षा तपासणी, पाणी आणि अत्यावश्यक सुविधांची उपलब्धता, प्रवासातील डिजिटल सुलभता, कुटुंबस्नेही विमानतळ सुविधा तसेच तक्रार निवारणावरही भर दिला जाणार आहे. प्रवाशांच्या समृद्ध अनुभवात भर टाकण्याच्या उद्देशाने स्थानिक कलाकृतींचेही प्रदर्शनही मांडले जाणार आहे.
प्रवाशांना सुलभ आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी विमानतळ प्रशासनाकडून विमानांच्या उड्डाणाची वेळेवर माहिती देणे, वैद्यकीय तसेच आपत्कालीन सज्जता राखणे आणि भागधारकांसोबत समन्वय राखण्यावर भर दिला जाणार आहे.
या देशव्यापी मोहिमेच्या कालावधीदरम्यान केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू हे उद्घाटनाचा दिवस, जागतिक पर्यटन दिन, गांधी जयंती आणि अंतिम दिवस अशा चार प्रसंगी निवडक विमानतळांना भेट देण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान ते प्रवासी सुविधांची पाहणी करतील तसेच प्रवासी आणि पर्यटकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षांबाबतचा अभिप्रायही संकलित करतील.
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2310880)
अभ्यागत कक्ष : 17