माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय संचार ब्युरो आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने संयुक्तपणे साजरा केला हिंदी दिवस आणि पोषण महिना


स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि तज्ञांच्या मार्गदर्शनातून हिंदी भाषेचे जतन आणि पोषणविषयक जागरूकतेचे महत्त्व केले अधोरेखित

Posted On: 15 SEP 2026 9:50PM by PIB Mumbai

नागपूर, 15 सप्टेंबर 2026 

वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील गालिब सभागृहात  आज - 15 सप्टेंबर 2026 रोजी हिंदी दिवस आणि पोषण महिना या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रीय संचार ब्युरोच्या नागपूर इथल्या कार्यालयाने तसेच वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या राजभाषा विभागाने संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदी टंकलेखन, निबंध लेखन, रांगोळी आणि भित्तीचित्र स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम झाला.  यासोबतच केंद्रीय संचार ब्युरोच्या संगीत आणि नाटक विभागाच्या कलापथकाने  पोषण विषयक जागरूकतेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला.

वरिष्ठ संपादक आनंद निर्माण हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवादही साधला. हिंदी ही नाती जोडणाऱ्या आईसारखी असून, हिंदी भाषेचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. अनेक भाषांमधील शब्द आत्मसात करणाऱ्या हिंदी भाषेचे सर्वसमावेशक स्वरूपही त्यांनी आपल्या संवादातून उलगडले. नागपूर आणि वर्ध्याने हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारात दिलेले योगदानही त्यांनी अधोरेखित केले. मराठी भाषिक नागरिकांनीही हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारात दिलेले योगदान तसेच  1975 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या जागतिक हिंदी परिषदेसोबतचे नागपूरचे असलेले नाते याबद्दलचे आपले विचारही त्यांनी मांडले.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक कुमुद शर्मा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. भाषा या आपल्या सांस्कृतिक प्रतीके आणि परंपरांच्या माध्यमातूनच जिवंत राहतात अशी मांडणी त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केली. युवा पिढीने बदलत्या काळासोबत हिंदी भाषेचा विस्तार होऊ दिला पाहीजे आणि त्याला जोडूनच या भाषेच्या मूळ स्वरूपाचेही रक्षण केले पाहिजे या जबाबदारीची जाणीव त्यांनी करून दिली. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे हिंदी अधिकारी राजेश यादव हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी विविध वक्त्यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. हिंदी भाषेच्या विकासातील आणि हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यातील पत्रकारिता तसेच प्रसार माध्यमांचे योगदान यावर त्यांनी आपले विचार मांडले.

यावेळी हिंदी टंकलेखन, निबंध लेखन, रांगोळी आणि भित्तीचित्र निर्मिती स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थी आणि कर्मचारी अशा दोन श्रेणींमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय संचार ब्युरोच्या नागपूर इथल्या कार्यालयाचे प्रसिद्धी सहाय्यक शुभम गुदाधे यांनी स्वागतपर भाषण आणि प्रास्ताविक केले, तर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे यांनी सूत्रसंचालनाची तर कुलसचिव कादर नवाज खान यांनी जबाबदारी सांभाळली. केंद्रीय संचार ब्युरोच्या संगीत आणि नाटक विभागाच्या कलाकारांनी पोषण तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2310699) अभ्यागत कक्ष : 14
Read this releasein: English