आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एम्स नागपूर येथे राष्ट्रीय रुग्ण सुरक्षा परिषद 2026 यशस्वीपणे संपन्न

Posted On: 14 SEP 2026 12:53PM by PIB Mumbai

नागपूर, 14 सप्टेंबर 2026

देशभरातील रुग्ण सुरक्षा आणि आरोग्यसेवेची गुणवत्ता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने वैज्ञानिक विचारविनिमय, तज्ज्ञांच्या चर्चा आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींच्या आदानप्रदानाने दोन दिवस चाललेली राष्ट्रीय रुग्ण सुरक्षा परिषद 2026 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था -एआयआयएमएस नागपूर येथे यशस्वीपणे संपन्न झाली.

एम्स नागपूरने राष्ट्रीय रुग्ण सुरक्षा सचिवालय (एनपीएसएस), आरोग्य सेवा महासंचालनालय (डीजीएचएस), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू), भारत सरकार यांच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन केले. या परिषदेत  एम्स आणि देशातील इतर प्रमुख संस्थांचे संचालक व कार्यकारी संचालक, वैद्यकीय तज्ज्ञ, परिचारिका व्यावसायिक, रुग्णालय प्रशासक, संशोधक तसेच रुग्ण सुरक्षा क्षेत्रातील भागधारक देशभरातून सहभागी झाले.

उद्घाटन समारंभाला भारतीय वैद्यकीय संसद सदस्य मंचाचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सदस्य डॉ. अनिल सुखदेवराव बोंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्यसभेचे माजी सदस्य अजय संचेती अतिथी म्हणून, तर अतिरिक्त डीजीएचएस डॉ. सुजाता चौधरी विशेष उपस्थित होत्या.

उद्घाटन सत्राची सुरुवात  एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक प्रा. (डॉ.) प्रशांत पी. जोशी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी उपस्थित मान्यवर, प्रतिनिधी आणि सहभागींचे स्वागत करून दोन दिवसीय परिषदेचे महत्त्व स्पष्ट केले. रुग्ण सुरक्षा अधिक बळकट करणे, आरोग्यसेवेच्या गुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा घडवून आणणे तसेच अधिक सुरक्षित, पुराव्यावर आधारित आणि रुग्ण केंद्रित आरोग्यसेवा प्रदान करण्याची संस्कृती विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

`असंसर्गजन्य रोगांसाठी सुरक्षित आरोग्यसेवा` या विषयावर आणि `जीवनभर सुरक्षित आरोग्यसेवा!` या घोषवाक्याखाली आयोजित या परिषदेत, विशेषतः असंसर्गजन्य रोगांचा वाढता भार लक्षात घेता, रुग्ण सुरक्षा ही आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग बनविण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

वैज्ञानिक कार्यक्रमात नवजात बालके आणि मुलांसाठी सुरक्षित आरोग्यसेवा, सक्षम आपत्कालीन आरोग्यसेवा, रुग्ण सुरक्षा नेतृत्व, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधन आणि नवोन्मेष, शस्त्रक्रिया सुरक्षा, औषध सुरक्षा, रुग्ण सुरक्षा विषयक घटनांमधून शिकणे, सुरक्षित आणि शाश्वत आरोग्यसेवा सुविधा तसेच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आरोग्यसेवेत भागीदार म्हणून सहभाग यांसारख्या विषयांवर स्वतंत्र सत्रे आयोजित करण्यात आली.

या परिषदेत देशभरातील वरिष्ठ आरोग्यसेवा क्षेत्रातील नेतृत्वकर्ते आणि निमंत्रित मान्यवर सहभागी झाले. यामध्ये 6  एम्सचे संचालक तसेच इतर नामवंत तज्ज्ञ आणि संस्थांचे प्रमुख यांचा समावेश होता. चर्चांमध्ये पुराव्यावर आधारित वैद्यकीय कार्यपद्धती, औषध आणि शस्त्रक्रिया सुरक्षा, संसर्ग प्रतिबंध, घटनांचे अहवाल आणि त्यातून शिकण्याच्या प्रणाली, आरोग्यसेवेच्या गुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होणारे उपाय तसेच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अधिक प्रभावी सहभाग यावर भर देण्यात आला.

या परिषदेमुळे सुरक्षित आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी विविध संस्थांना आपले अनुभव आणि व्यापक स्तरावर राबवता येणाऱ्या सर्वोत्तम कार्यपद्धती सामायिक करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले. वैज्ञानिक सत्रांमधील चर्चा आणि विचारविनिमयातून समोर आलेल्या शिफारशींमुळे विविध आरोग्यसेवा संस्थांमधील रुग्ण सुरक्षा विषयक कार्यपद्धती अधिक बळकट होण्यास मदत होईल. तसेच भारतातील रुग्ण सुरक्षेसाठीच्या राष्ट्रीय धोरणे आणि रणनीती अधिक अद्ययावत करण्यासही त्यांचा उपयोग होण्याची अपेक्षा आहे.

समारोप समारंभात नवोन्मेष, संस्थात्मक अनुभवातून झालेले शिक्षण आणि अधिक सुरक्षित व उच्च दर्जाची आरोग्यसेवा विकसित करण्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी संस्थांनी सादर केलेल्या उत्कृष्ट वैज्ञानिक शोधलेख, पोस्टर सादरीकरणे, नाविन्यपूर्ण सर्वोत्तम कार्यपद्धती आणि अनुकरणीय रुग्ण सुरक्षा उपक्रमांची दखल घेत अनेक पुरस्कार आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली.

पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके/ नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2309997) अभ्यागत कक्ष : 16
Read this releasein: English