गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री अमित शाह सोमवारी, 14 सप्टेंबर रोजी मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाच्या उद्घाटन सत्राला संबोधित करतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने गृह मंत्रालयाचा राजभाषा विभाग 2021 पासून दरवर्षी अखिल भारतीय राजभाषा संमेलनांचे आयोजन करत आहे
या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात केन्द्रीय गृह मंत्री वर्ष 2025-26च्या ‘राजभाषा गौरव’ आणि ‘राजभाषा कीर्ती’ पुरस्कारांचे वितरण करतील
राजभाषेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींना या पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार
Posted On:
13 SEP 2026 2:48PM by PIB Mumbai
दिनांक : 13 सप्टेंबर 2026
केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री श्री अमित शाह सोमवारी, 14 सप्टेंबर रोजी मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाच्या उद्घाटन सत्राला संबोधित करतील. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच अनेक खासदार, विविध क्षेत्रांतील मान्यवर अतिथी, विद्वान, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांचे व मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. हा सोहळा महाराष्ट्राची समृद्ध भाषिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरा तसेच हिंदीचे त्याच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध अधोरेखित करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा आणि केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालयाचा राजभाषा विभाग 2021 पासून दरवर्षी अखिल भारतीय राजभाषा संमेलनांचे आयोजन करत आहे. वाराणसीपासून सुरू झालेला हा प्रवास सुरत, पुणे, नवी दिल्ली आणि गांधीनगरमार्गे या वर्षी महाराष्ट्राच्या भूमीत नवी मुंबईत पोहोचला आहे.
या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात गृहमंत्री अमित शाह वर्ष 2025-26च्या ‘राजभाषा गौरव’ आणि ‘राजभाषा कीर्ती’ पुरस्कारांचे वितरण करतील. राजभाषेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींना या पुरस्कारांनी सन्मानित केले जाईल.
उद्घाटन सत्रात तसेच इतर सत्रांमध्ये अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे आणि प्रकाशनांचे लोकार्पण केले जाईल. यामध्ये राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ वर केंद्रित राजभाषा विभागाच्या ‘राजभाषा भारती’ या मासिकाची विशेष स्मरणिका, ‘भारतीय ज्ञानतंत्र : स्रोत आणि स्वरूप’, ‘शिव अनादी आहेत, अनंत आहेत’ आणि तुरुंगातील कैद्यांनी रचलेल्या साहित्याचा संग्रह ‘अंधाराकडून प्रकाशाकडे’ (अँधेरों से उजालों तक) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ही प्रकाशने भारतीय संस्कृती, ज्ञान परंपरा, साहित्य आणि सर्जनशील अभिव्यक्तीचे विविध पैलू समोर आणतात. इतर अनेक संघटना आणि संस्थांच्या पुस्तकांचे व नियतकालिकांचेही लोकार्पण केले जाईल.
या वर्षीच्या संमेलनाचे एक विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ वर आधारित विशेष विचार-सत्र असेल. या विशेष सत्रात प्रसिद्ध पार्श्वगायक हरिहरन, वरिष्ठ पत्रकार व लेखक नीलेश मिश्रा आणि ‘वंदे मातरम’ चे अभ्यासक अखिलेश मिश्रा चर्चेत सहभागी होतील. याशिवाय, ‘वंदे मातरम’ चे संशोधक मिलिंद प्रभाकर सबनीस दुसऱ्या एका सत्रात या राष्ट्रगीताच्या ऐतिहासिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक पैलूंवर प्रकाश टाकतील. या कार्यक्रमात जॉयदीप चट्टोपाध्याय यांचीही विशेष उपस्थिती असेल. ते ‘वंदे मातरम’ चे रचयिता बंकीम चंद्र चट्टोपाध्याय यांच्या 5व्या पिढीतील वंशज आहेत. त्यांची उपस्थिती या आयोजनाला विशेष ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व प्रदान करेल. या सत्रांच्या माध्यमातून ‘वंदे मातरम’ ने भारतीय जनमानसात राष्ट्रीय जाणिवांना कशा प्रकारे स्वर दिला आणि स्वातंत्र्यलढ्यापासून आजपर्यंत त्याची प्रासंगिकता कशी टिकून आहे, यावर विचारमंथन केले जाईल.
संमेलनात नगर राजभाषा अंमलबजावणी समित्यांच्या (नराकास) भूमिकेवरही एका विशेष सत्राचे आयोजन केले जाईल. ‘नराकास’ ही राजभाषा हिंदीची अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोहोचवणारी एक सुदृढ आणि सक्षम यंत्रणा आहे. या सत्रात नराकासचे कार्य, उपलब्धी आणि राजभाषा अंमलबजावणीतील तिच्या भूमिकेवर चर्चा होईल तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नराकासचा सन्मानही केला जाईल.
15 सप्टेंबर रोजी आयोजनाच्या दुसऱ्या दिवशी एका विशेष सत्रात प्रसिद्ध गीतकार आणि लेखक मनोज मुंतशीर उपस्थित राहतील. देशभक्ती आणि देशप्रेमाच्या भावनेने ओतप्रोत गीतांसाठी विशेष लोकप्रिय असलेले मुंतशीर या प्रसंगी आपले विचार मांडतील. हे सत्र संमेलनाची सांस्कृतिक आणि भावनिक गरिमा अधिक समृद्ध करेल. यानंतर महाराष्ट्र शासनातर्फे एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि कलात्मक परंपरेचे विविध रंग पाहायला मिळतील.
संमेलन स्थळी एका विशेष प्रदर्शनाचेही आयोजन केले जात आहे, ज्यामध्ये विविध संस्था, संघटना, बँका आणि मंत्रालयांद्वारे स्टॉल्स लावले जातील. महाराष्ट्र शासनाचे दोन विशेष स्टॉल्स, राजभाषा विभाग आणि प्रकाशन विभागाच्या स्टॉल्ससह एकूण 32 स्टॉल्स प्रदर्शन स्थळी लावले जातील. या स्टॉल्सच्या माध्यमातून विविध संस्थांच्या हिंदी आणि भारतीय भाषांशी संबंधित कार्य, प्रकाशने, उपक्रम आणि यशोगाथा प्रदर्शित केल्या जातील.
या दोन दिवसीय संमेलनात राजभाषा, जनभाषा आणि संपर्कभाषा म्हणून हिंदीचा विकास, भारतीय भाषांशी तिचा समन्वय, तंत्रज्ञान आणि भाषा, भाषांतर, साहित्य तसेच हिंदीच्या व्यापक प्रसाराशी जोडलेल्या विविध विषयांवर मंथन केले जाईल.
संविधानाच्या कलम 343 मध्ये संघराज्याची राजभाषा हिंदी आणि लिपी देवनागरी निश्चित करण्यात आली आहे, तसेच कलम 351 मध्ये हिंदीचा प्रसार, विकास आणि समृद्धीची जबाबदारी संघराज्यावर सोपवण्यात आली आहे. राजभाषा विभाग या घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी निरंतर कार्यरत आहे. याच मालिकेत आयोजित केले जाणारे हे 6वे अखिल भारतीय राजभाषा संमेलन हिंदीसोबतच सर्व भारतीय भाषांमधील समन्वय, संवाद आणि भागीदारी अधिक मजबूत करण्याची संधी प्रदान करेल.
***
हर्षल अकुडे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2309723)
अभ्यागत कक्ष : 17