माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय संचार ब्युरो नागपूरतर्फे 'हिंदी दिवस-पोषण माह' कार्यक्रमाच्या औचित्याने  रांगोळी आणि पोस्टर मेकिंग स्पर्धांचे आयोजन


हिंदी भाषा, पोषण आणि आरोग्यदायी जीवनशैली यांवरील संदेशांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी आपली सर्जनशीलता केली सादर

Posted On: 11 SEP 2026 7:35PM by PIB Mumbai

 

केंद्र  सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नागपूर मधील केंद्रीय संचार ब्यूरो  आणि वर्धा येथील 'महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा 'राजभाषा विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने, 15  सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या  'हिंदी दिवस – पोषण माह' कार्यक्रमाच्या पूर्व-उपक्रमांचा एक भाग म्हणून आज रांगोळी आणि पोस्टर-निर्मिती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सर्जनशील अभिव्यक्तीद्वारे हिंदी भाषा, पोषण आणि निरोगी जीवनशैली या विषयांवर  अर्थपूर्ण संदेश देण्याची संधी मिळाली.

रांगोळी स्पर्धेचे आयोजन अटलबिहारी वाजपेयी भवन येथे करण्यात आले होते, तर पोस्टर बनवण्याची स्पर्धा तुलसी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. सहभागींनी पौष्टिक आहार, निरोगी जीवनशैली आणि निरामयतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी रंग, चित्रे आणि हिंदी भाषेतील संदेशांचा वापर केला. या कलाकृतींमध्ये संतुलित पोषण, आरोग्य दायी आहार आणि निरोगी समाज निर्माण करण्यासाठी जाणीव यासारखे विषय प्रतिबिंबित झाले.

या स्पर्धा, मुख्य 'हिंदी दिवस-पोषण माह' कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या केंद्रीय संचार ब्यूरोद्वारे आयोजित करण्यात आलेल्या पूर्व-उपक्रम मालिकेचा एक भाग आहेत. तत्पूर्वीहिंदी भाषेतील सहभाग आणि सर्जनशील सहभागाला  प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने  9 सप्टेंबर रोजी, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी टंकलेखन आणि निबंध लेखन स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या.

मुख्य कार्यक्रम 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00  वाजता 'तुलसी भवन' येथील 'गालिब सभागृहात' आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार आनंद निर्वाण हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील, तर वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. या उपक्रमांतर्गत आयोजित विविध स्पर्धांमधील विजेते आणि सहभागींना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान केली जातील.

या कार्यक्रमात केंद्रीय संचार ब्यूरोचे  पथक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे. तसेच, हिंदी भाषेचे महत्त्व, राष्ट्रीय एकता व सांस्कृतिक अभिव्यक्तीमधील तिची भूमिका, यांसह  ‘पोषण आणि  आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व’ यांवर प्रकाश टाकणाऱ्या चर्चा आणि  सादरीकरणांचाही या कार्यक्रमात समावेश असेल.

***

निलिमा चितळे/सविता म्हसकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2309336) अभ्यागत कक्ष : 27
Read this releasein: English