शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘व्हीएनआयटी’ नागपूरचा 15 सप्टेंबर 2026 रोजी 24 वा दीक्षांत समारंभ


नीती आयोगाचे सदस्य आणि सेबीच्या  सोशल स्टॉक एक्सचेंज सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. आर. बालसुब्रह्मण्यम राहणार उपस्थित

Posted On: 11 SEP 2026 4:50PM by PIB Mumbai

 

नागपूरच्या  विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान (व्हीएनआयटी) 24 वा पदवीदान समारंभ मंगळवारी, 15 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित केला आहे.  महान द्रष्टे  आणि भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या 'अभियंता दिनाचे'  औचित्य साधून या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. आर. बालसुब्रह्मण्यम (डॉ. बालू) हे व्हीएनआयटी नागपूरच्या या 24 व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या पदवीदान समारंभाला बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष  माडभूषी मदन गोपाल , व्हीएनआयटी नागपूरचे संचालक प्रा. प्रेम लाल पटेल आणि अधिष्ठाता (शैक्षणिक) प्रा. विलास कळमकर यांच्यासह प्राध्यापकगण, पदवीधर विद्यार्थी, रिसर्च स्कॉलर्स, पालक आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील.

24 व्या पदवीदान समारंभात व्हीएनआयटी नागपूरतर्फे विविध अभ्यासक्रमांतील एकूण 1,547 पदवी  प्रदान केल्या जातील. यामध्ये 59 जणांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच. डी.) पदवी, विविध अभियांत्रिकी शाखांमधील 595 जणांना  मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (एम.टेक.) पदवी , विविध विज्ञान शाखांमधील 64 जणांना मास्टर ऑफ सायन्स (एम.एस.) पदवी, विविध अभियांत्रिकी शाखांमधील 761 जणांना  बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) पदवी आणि 68 जणांना  बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (बी.आर्क) पदवी देण्‍यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीची दखल घेऊन व्हीएनआयटी गुणवंत विद्यार्थ्यांना आणि रिसर्च स्कॉलर्सना पदके आणि  पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे.

अभियंता दिनी आयोजित केला जाणारा व्हीएनआयटी नागपूरचा वार्षिक पदवीदान समारंभ हा शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन क्षेत्रातील यश आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा व्यावसायिक आणि  सामाजिक भूमिकेतील प्रवेशाचा गौरव करणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. महान अभियंता आणि विद्वान सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या नावाने ओळखली जाणारी ही संस्था देशातील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान आणि संशोधनाच्या प्रगतीमध्ये सातत्याने योगदान देत आहे.

***

सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2309296) अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein: English