रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोकण रेल्वे 2026 च्या गणेशोत्सवासाठी प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी पूर्ण तयारीत

Posted On: 11 SEP 2026 11:47AM by PIB Mumbai

मुंबई; 11 सप्टेंबर 2026

कोकण रेल्वेने 2026 च्या गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची येण्याजाण्यासाठी आणि सोयीसाठी सर्वसमावेशक व्यवस्था केली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, कोकण रेल्वे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने विशेष गाड्या चालवणार आहे. या गाड्या उधना जंक्शन, विश्वामित्री, वलसाड, वडोदरा जंक्शन, नागपूर जंक्शन, मुंबई सेंट्रल, मुंबई सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, दिवा, पनवेल आणि चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन व ठोकुर या स्थानकांदरम्यान धावतील.

वैद्यकीय व्यवस्था

  • राज्य आरोग्य विभागाच्या समन्वयाने 12/09/2026 पासून माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर प्रथमोपचार केंद्रे उभारण्यात आली आहेत, जिथे निम आरोग्य कर्मचारी तैनात असतील.
  • कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी चिपळूण आणि रत्नागिरी आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतील.
  • प्रमुख स्थानकांवर मोफत आरोग्य तपासणी, आरोग्य जनजागृती आणि रक्तदान शिबिरे, तसेच रक्तशर्करा आणि रक्तदाब तपासणीसाठी वैद्यकीय बूथ उपलब्ध असतील.
  • आणीबाणीच्या प्रसंगी सरकारी रुग्णालये आणि सूचीबद्ध रुग्णालयांकडून रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली जाईल.

प्रवासी सुविधा

  • प्रवाशांच्या गरजांनुसार जेवण आणि अल्पोपहार पुरेसा उपलब्ध राहावी यासाठी, सर्व खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना गाड्यांच्या आगमनाच्या आणि सुटण्याच्या वेळी सुरू राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • बुकिंग कार्यालयांमध्ये रांगेसाठी विशेष व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
  • माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड आणि सावंतवाडी रोड येथे प्री-प्रिंटेड यूटीएस तिकिटांची व्यवस्था केली जात आहे आणि यूटीएस तिकिटे जारी करण्यासाठी पीआरएस खिडक्यांचाही वापर केला जाईल.
  • रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ स्थानकांवर एम-यूटीएस सहाय्यक सुविधा उपलब्ध आहेत. प्रवाशांना मदत करण्यासाठी समर्पित पर्यवेक्षकांसह माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी येथे रेल्वे यात्री सहायता केंद्रे चोवीस तास स्थापन करण्यात आली आहेत.
  • प्रवाशांच्या तुफान गर्दीच्या वेळी माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे 'होल्डिंग एरिया' (प्रवाशांची गर्दी विखुरणारी क्षेत्रे) निश्चित केली जातील.
  • सर्व स्थानकांवर नियमित घोषणांसोबतच विशेष गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष घोषणा केल्या जातील.
  • पुढील प्रवासासाठी स्थानकांवर बसेस उपलब्ध करून देण्यासाठी KRCL आणि MSRTC समन्वय साधतील, ज्यामुळे प्रवास विनाअडथळा आणि सुकर होईल.
  • प्रवास सुकर व्हावा आणि अधिकृत प्रवाशांची गैरसोय टाळता यावी यासाठी स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जातील. स्थानके स्वच्छ ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न केले जात असून प्रवाशांसाठी प्रसन्न वातावरण राखण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.Safety &

सुरक्षा उपाययोजना

  • प्रवाशांची वाहतूक विनाअडथळा व्हावी आणि प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून CCTV द्वारे 24 तास बारकाईने लक्ष ठेवले जाईल. प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल (RPF) स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने काम करेल.
  • प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी केलेल्या उपायांव्यतिरिक्त, स्थानकांवर गणेशोत्सवाचा उत्साही आनंदोत्सव साजरा केला जाईल. स्थानकांवर पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू, ताजी फळे, ताजी फुले, काजू मोदक आणि ब्रँड प्रमोशनचे आकर्षक स्टॉल्स असतील.

याशिवाय माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर स्थानिक कला, संगीत कार्यक्रम, भजन, जाखडी, बाहुल्यांचे खेळ (कटपुतली), कॅरिओके आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोफत मंच उपलब्ध करून दिले जातील. आपली सांस्कृतिक कला दाखवू इच्छिणारी कोणतीही व्यक्ती स्टेशन मास्तरांकडे संपर्क साधून किंवा भेट देऊन या सुविधेचा लाभ घेऊ शकते.

विशेष गणेशोत्सव सेल्फी पॉईंट्स, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि खास रोषणाई यामुळे प्रवाशांच्या प्रवासादरम्यान उत्साही आणि आनंदी वातावरण निर्माण होईल. ड्रोनद्वारे फुलांचे स्वागत, तुतारी वादन, तसेच फुगे आणि क्रेयॉन्स देऊन मुलांचे विशेष स्वागत यांसारख्या खास उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. स्वयंसेवी संस्था आणि खासगी संस्थांच्या मदतीने प्रवाशांसाठी वैद्यकीय शिबिरे आणि मोफत पाण्याच्या बाटल्यांची सोयही केली जाईल.

सण-उत्सवाचा हा प्रवास प्रत्येकासाठी सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी सर्व प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे. संपूर्ण उत्सवादरम्यान सुरक्षित रेल्वे वाहतूक, अखंड प्रवासी सुविधा आणि विनाअडथळा प्रवास अनुभव सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न अधिक बळकट करण्यात आले आहेत. सुरक्षित, सुखकर आणि कार्यक्षम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कोकण रेल्वे वचनबद्ध असून सर्व प्रवाशांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आनंदी प्रवासासाठी शुभेच्छा देत आहे.

 

 

***

नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2309287) अभ्यागत कक्ष : 14
Read this releasein: English