रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्लोबल फिनटेक फेस्ट मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाअंतर्गत फास्टॅग बँक बदल सुविधेसाठी वनटॅग उपक्रमाचा प्रारंभ


वनटॅगमुळे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलन फास्टॅग वापरकर्त्यांना वाहनावरील सध्याचा टॅग न बदलता बँक बदलून घेता येणार

Posted On: 11 SEP 2026 4:12PM by PIB Mumbai


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत सुरु असलेल्या  ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2026 अर्थात वित्त तंत्रज्ञान महोत्सवात राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाअंतर्गत (NETC) फास्टॅगकरता बँक बदल सुविधेची (Portability) सोय असलेल्या वनटॅग उपक्रमाचा प्रारंभ केला. या उपक्रमामुळे परस्पर कार्यान्वयातील सुलभता वाढणार असून,  राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाअंतर्गतच्या फास्टॅग वापरकर्त्यांना अधिक पर्याय आणि सुलभता लाभणार आहे.

वनटॅगमुळे वापरकर्त्यांना त्यांच्या वाहनावर लावलेला सध्याचा फास्टॅग न बदलता, तोच टॅग ठेवून टॅग पुरवठा करणारी बँक बदलता येणार आहे. यामुळे नवीन टॅग घेण्याची गरज उरणार नाही. वनटॅग हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) सहकार्य लाभलेल्या  इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या संस्थांचा संयुक्त उपक्रम आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित नंबर-प्लेट ओळख प्रणालीचा वापर करून, गाड्यांना कुठेही न थांबवता आणि कोणत्याही विलंबाशिवाय, विनाअडथळा प्रवास करता यावा यासाठी,  कोणतेही अडथळे नसलेली टोल व्यवस्था उभारणे हे आपले यापुढचे ध्येय असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. तंत्रज्ञानावर आधारित टोल आकारणीमुळे कार्यक्षमतेत अधिक सुधारणा घडून येईल, प्रतीक्षेच्या कालावधीत घट होईल आणि राष्ट्रीय महामार्ग प्रवास करण्याच्या अनुभवातही सुधारणा होईल असे त्यांनी सांगितले.

सध्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाअंतर्गत फास्टॅगचा पुरवठा करणारी बँक बदलू इच्छिणाऱ्या ग्राहकांना त्यांचा सध्याचा टॅग बंद करावा लागतो आणि नवीन टॅग मिळवण्यासाठी पुन्हा नवीन नोंदणी प्रक्रियेतून जावे लागते. मात्र आता वनटॅग मुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार बँक बदलण्याची सुविधा मिळणार असून,  वाहनावर आधीच लावलेला फास्टॅग कायम राहणार आहे. बँक बदलण्याची प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर, सध्याचा टॅग आयडी आणि वाहन नोंदणी क्रमांक यात बदल होणार नाही. परिणामी वापरकर्त्यांना वेगळ्या बँकेसोबतही तोच टॅग वापरत राहणे शक्य होणार आहे.

ही सेवा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या राजमार्गयात्रा या मोबाईल  अ‍ॅप वर उपलब्ध असेल. या अ‍ॅप वर वापरकर्त्यांना पोर्टेबिलिटी प्रक्रियेविषयी मार्गदर्शन मिळू शकेल त्याचप्रमाणे पात्रता निकष, सुरक्षित पडताळणी, ग्राहकांची संमती , प्राधान्यक्रम असलेली जारीकर्ता बँक निवडणे आणि त्यानंतरची ऑनबोर्डिंग प्रक्रिया यांचाही  समावेश असेल. बँक बदल सुविधा व्यवस्थेअंतर्गत विद्यमान जारीकर्ता बँक ग्राहकांची पडताळणी करेल आणि जुन्या वॉलेटशी संबंधित बाबी, परतावे,  प्रलंबित व्यवहार तसेच इतर संबंधित बाबी हाताळेल. तर, ग्राहकाने निवडलेली जारीकर्ता बँक, बँक बदल सुविधेची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर ऑनबोर्डिंगची प्रक्रिया पूर्ण करून पुढील सेवा उपलब्ध करून देईल.

या उपक्रमामुळे टॅगच्या परत परत कराव्या लागणाऱ्या निर्मितीच्या प्रक्रियेत घट होईल,राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलन फास्टॅगच्या एकूण कालावधी व्यवस्थापनात सुधारणा होईल. परिणामी कार्यान्वयन, वाहतूक आणि पुनर्निर्मितीच्या खर्चात देखील कपात होईल. वनटॅगमुळे जारीकर्ता बँक बदलण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित होण्यास मदत होईल. तसेच, ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होतील आणि अधिक परस्पर-सुसंगत आणि कार्यक्षम राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलन फास्टॅग परिसंस्था निर्माण करण्यातही हातभार लागेल.

भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स महामंडळ याकरता आवश्यक तंत्रज्ञान पुरवेल, बँक बदल सुविधा  उपलब्ध करुन देईल आणि NETC व्यवस्थेत जारीकर्त्याचे तपशील अपडेट करेल त्याचवेळी पथकर नाके आणि संबंधित संस्था विद्यमान चौकटीनुसार व्यवहार प्रक्रिया पुढे सुरु ठेवतील.

98 टक्क्यांहून अधिक वापराचे प्रमाण आणि सुमारे 13  कोटी NETC फास्टॅग जारी करण्यात आले असून, त्यापैकी अंदाजे 6 कोटी फास्टॅग सक्रिय आहेत. त्यामुळे फास्टॅगने देशातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन  प्रणालीमध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणले आहे. वनटॅग च्या आगमनामुळे आता डिजिटल पथकर संकलन प्रणालीच्या आराखड्याला बळकटी येईल आणि NETC फास्टॅग वापरणाऱ्यांना अधिक लवचिकता मिळेल त्याचवेळी विद्यमान प्रत्यक्ष टॅग तसेच कायम ठेवत राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना अधिक सोय उपलब्ध होईल.

***

निलिमा चितळे/तुषार पवार/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2309245) अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein: English