सांस्कृतिक मंत्रालय
खारघर येथे समर्पित कला सुविधा क्षेत्र उभारण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडून सामंजस्य करारावर स्वाक्षरी
सिडकोच्या (CIDCO) माध्यमातून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार
Posted On:
11 SEP 2026 11:51AM by PIB Mumbai
नवी मुंबईतील पायाभूत सांस्कृतिक सुविधा अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, खारघर येथील सेंट्रल पार्क, सेक्टर 24 मध्ये एका समर्पित कला क्षेत्राच्या विकासासाठी सिडकोच्या माध्यमातून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सिडको सुमारे 4 हेक्टर जमीन उपलब्ध करून देणार आहे.
प्रस्तावित कला क्षेत्रामध्ये कला दालने , सांस्कृतिक संस्था, कलाकार स्टुडिओ व निवासस्थाने, कला संग्रह सुविधा आणि कला शिक्षणासाठीच्या जागांसह सर्जनशील अर्थव्यवस्थेला पाठबळ देणाऱ्या पूरक पायाभूत सुविधांचा समावेश असेल. कलाकार, सांस्कृतिक संस्था, कलेचे विद्यार्थी आणि नागरिकांसाठी भारतीय कला व संस्कृतीचा प्रसार करणारे आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणारे एक जिवंत व्यासपीठ म्हणून याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
हे कला क्षेत्र सर्जनशील अर्थव्यवस्थेमध्ये लक्षणीय योगदान देईल आणि कला व डिझाइन क्षेत्रातील तरुण व्यावसायिकांसाठी संधी निर्माण करेल अशी अपेक्षा आहे. यामुळे कलाकार, सांस्कृतिक संस्था आणि सामान्य जनता यांच्यातील परस्परसंवाद वाढण्यास मदत होईल, ज्याद्वारे नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील विस्तृत सांस्कृतिक परिसंस्था अधिक मजबूत होईल.
या सोहळ्याला विवेक अग्रवाल, आय.ए.एस., सचिव, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार; राजेश अग्रवाल, आय.ए.एस., मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन; किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र शासन; अश्विन मुदगल, आय.ए.एस., उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सिडको; मती निधी चौधरी, आय.ए.एस., संचालक, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई; शांतनु गोयल, आय.ए.एस.,सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल (IAS) म्हणाले, "हा सामंजस्य करार महाराष्ट्रातील सांस्कृतिक परिसंस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेलद्वारे, दृश्य आणि ललित कलांची जोपासना करणारे तसेच संस्कृती क्षेत्रातील दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारे एक समर्पित कला क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रमुख कला संस्था, दालने आणि सांस्कृतिक संस्थांना एकत्र आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे."
एनजीएमए मुंबईच्या संचालक निधी चौधरी म्हणाल्या, "हा ऐतिहासिक सामंजस्य करार महाराष्ट्रातील कलाकार समुदायासाठी एक परिवर्तनात्मक पाऊल आहे, ज्याला केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन या दोघांचेही मजबूत संस्थात्मक पाठबळ मिळाले आहे. महाराष्ट्रात अफाट कलात्मक प्रतिभा आहे, आणि एनजीएमए मध्ये 2030 पर्यंत पूर्ण बुकिंग असणे हे कलाकार आणि भागधारकांकडून मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाचे द्योतक आहे. ही भागीदारी कला समुदायासाठी नवीन संधी अधिक बळकट करेल."
हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने विकसित केला जाईल, ज्यातील पहिला टप्पा सांस्कृतिक मंत्रालयामार्फत हाती घेतला जाईल. सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यापासून तीन वर्षांच्या आत कला क्षेत्र कार्यरत करण्याचे उद्दिष्ट आहे.
***
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2309191)
अभ्यागत कक्ष : 15