माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गोव्यातल्या कंटेंट निर्मात्यांना 'जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
30 सप्टेंबर 2026 पर्यंत मागवण्यात आल्या प्रवेशिका
Posted On:
10 SEP 2026 7:28PM by PIB Mumbai
पणजी, 10 सप्टेंबर 2026
पणजीच्या आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रातर्फे आज 'जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज 2026' या देशव्यापी उपक्रमाची माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे छोटे व्हिडीओ म्हणजेच लघुपटांच्या माध्यमातून भारताचा समृद्ध वारसा, संस्कृती, परंपरा आणि पर्यटन प्रदर्शित करण्यासाठी कंटेंट निर्माते, व्हिडिओग्राफर आणि कथाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना, आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्र पणजीचे उपमहासंचालक संदीप श्रीवास्तव यांनी गोव्यातील कंटेंट निर्मात्यांना या चॅलेंजमध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आणि गोव्याची अद्वितीय ओळख आणि सांस्कृतिक समृद्धी देशभरातल्या प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करण्याचे आवाहन केले.
दूरदर्शन केंद्र पणजीचे सहाय्यक संचालक ( कार्यक्रम )सावियो नोरोन्हा आणि आकाशवाणी पणजीचे सहाय्यक संचालक ( कार्यक्रम )संजय पुनाळेकर यांनीही माध्यमांशी संवाद साधून स्थानिक कंटेंट निर्मात्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींवर प्रकाश टाकला.
या चॅलेंजअंतर्गत, सहभागींना गोव्याचा वारसा, परंपरा, पर्यटन स्थळे, स्थानिक संस्कृती आणि कथा दर्शवणारा 1 ते 3 मिनिटांचा मूळ व्हिडिओ तयार करण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. या उपक्रमात जिल्हा स्तरावर 50,000 रुपये, राज्य स्तरावर 2 लाख रुपये आणि राष्ट्रीय स्तरावर 5 लाख रुपये अशा विविध स्तरांवर सन्मान आणि रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.
ही स्पर्धा 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत इच्छुक सहभागी 'वेव्हज' (WAVES) मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे नोंदणी करू शकतील, "माय वेव्हज" (My Waves) विभागात जाऊन संबंधित प्रोग्राम मॉड्यूलद्वारे आपला व्हिडिओ स्पर्धेसाठी पाठवू शकतील.
आयोजकांनी गोव्यातल्या कंटेंट निर्मात्यांना गोव्याचा अस्सल आत्मा टिपून हा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक आणि पर्यटन वारसा उर्वरित भारतासोबत सामायिक करण्याचे आवाहन केले आहे. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 आहे.

पीआयबी मुंबई | निलीमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308879)
अभ्यागत कक्ष : 11