श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निवृत्तीवेतन संबंधित दावे एक महिना आधी सादर करण्याचे ईपीएफओ गोवा चे नियोक्त्यांना आवाहन


निवृत्तीच्याच दिवशी पेन्शन पेमेंट ऑर्डर मिळेल याची सुनिश्चिती करण्याचा 'प्रयास' उपक्रमाचा उद्देश

Posted On: 10 SEP 2026 3:48PM by PIB Mumbai

पणजी, 10 सप्टेंबर 2026

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) गोवा स्थित  प्रादेशिक कार्यालय 'प्रयास' उपक्रम  राबवत आहे. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच 'पेन्शन पेमेंट ऑर्डर ' (PPO) हातात मिळेल हे सुनिश्चित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या उपक्रमांतर्गत, कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळण्यात कोणताही विलंब होऊ नये म्हणून निवृत्तीवेतनाशी संबंधित दावे आगाऊ प्रक्रियेद्वारे पडताळले जातात. नोकरीतून निवृत्तीकडे  संक्रमण सुरळीत व्हावे आणि निवृत्तीवेतनधारकांना ईपीएफओ कार्यालयाला वारंवार भेट द्यावी लागू नये  हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

ईपीएफओ गोवा यांनी राज्यातील सर्व नियोक्त्यांना या उपक्रमात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी विनंती केली आहे की, निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण भरलेले आणि अद्ययावत केवायसी तपशीलांचा समावेश असलेले पेन्शन दावे निवृत्तीच्या तारखेच्या किमान एक महिना आधी सादर केले जावेत. पूर्ण पेन्शन दावे वेळेत सादर केल्यास, ईपीएफओला या प्रकरणांवर आगाऊ कार्यवाही करणे आणि निवृत्तीच्या दिवशीच पीपीओ जारी करणे शक्य होईल.

प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-I (गोवा), सचिन शेट्टी यांनी सर्व आस्थापनांना 'प्रयास' उपक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन दाव्यांवर वेळेवर कार्यवाही सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी, नियोक्ते आणि सदस्य ईपीएफओ, प्रादेशिक कार्यालय, भविष्य निधी भवन, 24 , पाटो प्लाझा, पणजी येथे  संपर्क साधू शकतात किंवा 0832-2438903 / 2438905  या क्रमांकांवर दूरध्वनी करू शकतात. 

 

पीआयबी मुंबई | निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2308710) अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein: English