युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027 उपक्रम सुरु, पंतप्रधानांना भेटण्याच्या संधीसाठी प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे माय भारत गोवातर्फे युवा पिढीला आवाहन
Posted On:
09 SEP 2026 5:20PM by PIB Mumbai
पणजी, 9 सप्टेंबर 2026
केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने मेरा युवा भारत (माय भारत) मंचाच्या माध्यमातून विकसित भारत युवा नेतृत्व संवाद (व्हीबीवायएलडी) 2027 हा उपक्रम सुरू केला आहे. विकसित भारतासाठीच्या आपल्या संकल्पना आणि दृष्टीकोन सादर करण्यासाठी युवा पिढीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या देशव्यापी युवा संवाद कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून 17 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत विकसित भारत प्रश्नमंजुषा सुरू करण्यात आली आहे. माय भारत गोवा मंचाने राज्यातल्या युवक युवतींना या प्रश्नमंजुषेमधे तसेच देशव्यापी उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
व्हीबीवायएलडी 2027 च्या विविध स्तरांवर युवा पिढीला आपले ज्ञान, संकल्पना, नेतृत्व कौशल्य आणि नावीन्यपूर्ण विचार मांडण्याची संधी मिळेल.
यातील पहिला टप्पा म्हणजे माय भारत पोर्टलवरील ऑनलाइन विकसित भारत प्रश्नमंजुषा. यातून पुढच्या फेरीसाठी पात्र ठरलेल्या स्पर्धकांना 5 ते 19 ऑक्टोबर 2026 या कालावधीत होणाऱ्या विकसित भारत निबंध स्पर्धेत सहभागी होता येईल. यामध्ये निवडक स्पर्धकांना विकसित भारत संकल्पनेवर 500 शब्दांचा निबंध सादर करावा लागेल.
तिसरा टप्पा जिल्हा स्तरावरील असेल. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून निवडलेले 50 सर्वोत्कृष्ट निबंध स्पर्धक प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करतील. स्पर्धेचा तिसरा टप्पा 10 ते 16 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. यातून निवडले गेलेले स्पर्धक चौथ्या टप्प्यामध्ये राज्यस्तरीय / केंद्रशासित प्रदेश स्तरावर परीक्षकांसमोर आपल्या संकल्पना सादर करतील. 17 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2026 या कालावधीत स्पर्धेची राष्ट्रीय स्तरावरील फेरी होईल.
या स्पर्धेची अंतिम फेरी 10 ते 12 जानेवारी 2027 या कालावधीत नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना, तसेच विभागीय स्तरावर अंतिम फेरीतल्या स्पर्धकांना आपल्या संकल्पना पंतप्रधानांसमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे.
विकसित भारत प्रश्नमंजुषेत सक्रिय सहभाग घेऊन या उपक्रमाचा भाग होण्याचे आवाहन माय भारत गोवा मंचाने राज्यातील युवा पिढीला केले आहे. विकासाचे केवळ लाभार्थी होण्यापेक्षा विकासात सक्रिय योगदान देऊन विकसित भारताच्या प्रवासाचे भागीदार बनण्यासाठी युवा पिढीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
युवा अधिक माहितीसाठी अधिकृत माय भारत पोर्टलला भेट देऊ शकतात. या पोर्टलवरुन ते विकसित भारत प्रश्नमंजुषा आणि व्हीबीवायएलडी 2027 च्या पुढच्या टप्प्यांमध्ये सहभागी होऊ शकतात.
पीआयबी मुंबई |निलीमा चितळे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308357)
अभ्यागत कक्ष : 10