पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
ओएनजीसी कडून आयआयटी मुंबई येथे एमसी²⁺ इग्नाइटच्या 'मुंबई सिटी कनेक्ट'चे आयोजन; ऊर्जा नवोन्मेष परिसंस्था मजबूत करण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी
Posted On:
08 SEP 2026 10:00PM by PIB Mumbai
मुंबई, 8 सप्टेंबर 2026
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ लिमिटेड (ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड-ओएनजीसी), एमसी²⁺ फाउंडेशनच्या सहकार्याने, आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मुंबई येथे भारताचा प्रमुख ऊर्जा नवोन्मेष ॲक्सिलेटर असलेल्या एमसी²⁺ इग्नाइटच्या (MC²⁺ Ignite) 'मुंबई सिटी कनेक्ट'चे आयोजन केले.
या कार्यक्रमाने ऊर्जा क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, संशोधन संस्था, स्टार्ट-अप्स आणि व्यापक नवोन्मेष परिसंस्थेतील नेत्यांना एकत्र आणले. भारतातील ऊर्जा क्षेत्रातील नवोन्मेषाला गती देण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान, उद्योगासमोरील आव्हाने आणि नव्या संधींचा या कार्यक्रमात शोध घेण्यात आला.

एमसी²⁺ इग्नाइट मुंबई सिटी कनेक्ट दरम्यान 8 सप्टेंबर 2026 रोजी, एमसी²⁺ फाउंडेशन , आयआयटी मुंबई आणि साईन, आयआयटी मुंबई यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे नेतृत्व ओएनजीसीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अरुण कुमार सिंह आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (आयसीटी), मुंबईचे कुलगुरू प्राध्यापक. अनिरुद्ध बी. पंडित यांनी केले. 8 सप्टेंबर 2026 रोजी एमसी²⁺ फाउंडेशन , आयआयटी मुंबई आणि सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्राइजशिप यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी होणे हा या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा टप्पा होता.

उद्योग, शैक्षणिक क्षेत्र आणि स्टार्ट-अप्स यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणे तसेच नवसंशोधकांना संशोधन आणि विकास सुविधा, प्रयोगशाळा, शैक्षणिक आणि औद्योगिक मार्गदर्शन, निधी, बाजारपेठेतील प्रवेश आणि प्रत्यक्ष कार्यान्वयनाच्या वातावरणात प्रायोगिक प्रकल्प राबविण्याच्या संधी उपलब्ध करून देणे, हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे.
एमसी²⁺ परिसंस्थेतील भागीदार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून ओएनजीसी, तसेच आयआयटी मुंबई आणि साईन यांच्यासोबत एआय-आधारित भूगर्भीय माहिती विश्लेषण आणि इतर सहा ऊर्जा नवोन्मेष संकल्पनांवर सहकार्य करेल. या सहकार्यामुळे उद्योगासमोरील समस्यांचे निराकरण आणि उदयोन्मुख तांत्रिक उपाययोजना यांची प्रभावी सांगड घातली जाईल. या सहकार्यामुळे आशादायी तंत्रज्ञानाला संशोधन व विकासापासून प्रमाणीकरण, प्रायोगिक चाचणी (पायलट), अंमलबजावणी आणि व्यावसायिक स्तरापर्यंत प्रगती करण्यास सक्षम करणे अपेक्षित आहे. या कार्यक्रमाला प्रा. शिरीष केदारे, संचालक, आयआयटी मुंबई; ओम प्रकाश सिन्हा, संचालक (शोध), ओएनजीसी; भास्कर चौधरी नेत्तेम, नियुक्त ओएसडी (उत्पादन), ओएनजीसी; रत्नेश कुमार, ईडी तथा मुख्य कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, ओएनजीसी; धनंजय राय, एमसी²⁺चे प्रतिनिधी; शाजी व्हर्गिस, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्राइजशिप (साईन), आयआयटी मुंबई; प्रा. निशांत शर्मा, साईन; तसेच प्रा. योगेंद्र शास्त्री, सेंटर ऑफ एक्सलन्स इन ऑइल, गॅस अँड एनर्जी, आयआयटी मुंबई, हे मान्यवर उपस्थित होते.
‘मुंबई सिटी कनेक्ट’ हा एमसी²⁺ इग्नाइट च्या देशव्यापी जनसंपर्क उपक्रमाचा एक भाग आहे. निधी, तांत्रिक तज्ज्ञता, संशोधन पायाभूत सुविधा, प्रायोगिक प्रकल्पांच्या संधी आणि उद्योग सहभागाच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करणाऱ्या स्टार्ट-अप्सना पाठबळ देण्यासाठी हा उपक्रम तयार करण्यात आला आहे.
हा ॲक्सिलरेटर 30 पर्यंत उच्च-क्षमता असलेल्या प्रारंभिक टप्प्यातील स्टार्ट-अप्सना पाठबळ देईल. निवड झालेल्या स्टार्ट-अप्सना ₹50 लाखांपर्यंतचे कन्व्हर्टिबल फंडिंग आणि ₹1.5 कोटींपर्यंतचा टप्पानिहाय निधी मिळू शकतो. त्यामुळे प्रत्येक स्टार्ट-अपला कमाल ₹2 कोटींपर्यंतचे संभाव्य आर्थिक सहाय्य उपलब्ध होईल.
हा कार्यक्रम सात प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो: एआय-आधारित भूगर्भीय माहिती विश्लेषण पुढील पिढीतील ड्रिलिंग आणि विहीर पूर्णता तंत्रज्ञान, हायड्रोजन आणि गतिशीलता, जैवऊर्जा, विशेषतः कॉम्प्रेस्ड बायोगॅस,रिफायनरी प्रक्रिया सक्षमीकरण आणि उत्प्रेरण, डिजिटल मालमत्ता व्यवस्थापन, ऊर्जा क्षेत्राशी संबंधित इतर नवोन्मेष.
कार्यक्रमादरम्यान आयोजित पॅनेल चर्चेत आणि स्टार्ट-अप शोकेसमध्ये सागर डिफेन्स, स्ट्रिंग बायो, वेलआरएक्स , एंजेलबॉट एआय आणि व्हीडीटी पाइपलाइन सोल्यूशन्स या स्टार्ट-अप्सच्या संस्थापकांनी आणि प्रतिनिधींनी भाग घेतला. यावेळी स्टार्ट-अपचा प्रवास तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे विस्तारक्षम औद्योगिक उपायांमध्ये रूपांतर करण्याच्या संधींवर प्रकाश टाकण्यात आला.
मुंबईतील हा कार्यक्रम 3 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित पुणे सिटी कनेक्टनंतर झाला असून, एमसी²⁺ इग्नाइट ॲक्सिलरेटरच्या देशव्यापी बहु-शहर जनसंपर्क उपक्रमाचा तो एक भाग आहे.

एमसी²⁺ फाउंडेशन भारताच्या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञानाचा विकास, व्हॅलिडेशन, अंमलबजावणी आणि व्यापारीकरण सुलभ करण्याच्या उद्देशाने प्रमुख ऊर्जा कंपन्या, शैक्षणिक आणि संशोधन संस्था, स्टार्ट-अप्स आणि नवसंशोधकांना एकत्र आणते. उद्घाटनाच्या एमसी²⁺ इग्नाइट (MC²⁺ Ignite) तुकडीसाठीची (Cohort) अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2026 पर्यंत खुली आहे.
पीआयबी मुंबई |माधुरी पांगे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308087)
अभ्यागत कक्ष : 6