माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'विकसित भारत' ची उभारणी करण्यासाठी जबाबदार नागरिक वर्तन ही महत्त्वाची बाब: आशा शेट्टी, आरआरएम, कोकण रेल्वे


सीबीसी गोवाच्या वतीने मडगाव रेल्वे स्थानकावर आयोजित ‘मेरी जिम्मेदारी, मेरा विकसित भारत’ या पाच दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन

Posted On: 08 SEP 2026 8:47PM by PIB Mumbai

पणजी/गोवा,8 सप्टेंबर 2026
                                                                                                         

विकसित भारताचे स्वप्न केवळ नागरिकांच्या सामूहिक जबाबदारीतूनच साकारणे शक्य असल्याचे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक आशा शेट्टी यांनी स्पष्ट केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या 'केंद्रीय संचार ब्युरो' (सीबीसी), गोवा आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) यांनी मडगाव रेल्वे स्थानकावर संयुक्तरित्या आयोजित केलेल्या 'मेरी जिम्मेदारी, मेरा विकसित भारत' या पाच दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. हे प्रदर्शन 8 ते 12 सप्टेंबर या कालावधीत जनतेसाठी खुले असणार आहे.

सार्वजनिक वाहतुकीचे प्रमुख पारगमन केंद्र असलेल्या मडगाव रेल्वे स्थानकावर भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रवासी, अभ्यागत आणि सामान्य नागरिक यांसारख्या विविध स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. सार्वजनिक ठिकाणी व्यक्तींच्या साध्या पण जबाबदार कृती 'विकसित भारत'च्या व्यापक ध्येयामध्ये कशा प्रकारे योगदान देऊ शकतात, ही गोष्ट प्रदर्शनात आकर्षक दृश्य मांडणी आणि मल्टिमिडीया मजकुराच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे.

विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नसून त्यामध्ये नागरिकांचीही तितकीच महत्त्वाची भूमिका असल्याचे आशा शेट्टी यांनी  उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. सार्वजनिक ठिकाणांचा जबाबदार वापर, स्वच्छता, नागरिक म्हणून पाळायची शिस्त आणि सार्वजनिक मालमत्तेचा आदर यांसारख्या दैनंदिन कृतीतून नागरिकांना राष्ट्रउभारणीत योगदान देणे शक्य असल्याचे त्या म्हणाल्या.

रेल्वे स्थानके ही सामायिक सार्वजनिक ठिकाणे असल्याने तिथे स्वच्छता, सुरक्षितता राखण्यासाठी तसेच तेथील वातावरण आल्हाददायक रहावे यासाठी प्रवाशांनी आणि नागरिकांनी जबाबदारीने वागणे अत्यंत आवश्यक असल्याचे गोव्याच्या 'पत्र सूचना कार्यालया'चे संचालक नाना मेश्राम यांनी सांगितले. त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली तसेच प्रभावी संवादाद्वारे लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व विशद केले. जबाबदार नागरिकत्वाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात संवाद-उपक्रम किती महत्त्वाचे आहेत  याचाही ऊहापोह केला.

प्रदर्शनाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या विविध स्पर्धांची पारितोषिकेही उद्घाटन कार्यक्रमात वितरित करण्यात आली.

या कार्यक्रमास मडगाव येथील रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त यश मिश्रा, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक इनायत हुसेन, मडगाव रेल्वे स्थानकाचे वरिष्ठ स्थानक व्यवस्थापक थोबियास सी. के. आणि सीबीसी गोवाचे प्रसिद्धी अधिकारी रियास बाबू यांच्यासह गोव्यातील सीबीसी, पीआयबी कार्यालय आणि कोकण रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

मडगाव रेल्वे स्थानकावर भरविण्यात आलेले हे प्रदर्शन 8 ते 12 सप्टेंबर 2026 या कालावधीत जनतेसाठी खुले असेल. या प्रदर्शनात मांडलेल्या मल्टिमिडीया दृश्यांतून वैयक्तिक जबाबदारीला दैनंदिन नागरिक कृतीची जोड मिळाल्यास अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि विकसित भारत घडवण्यास कसा हातभार लावता येईल, हे अभ्यागतांना समजून घेण्याची संधी मिळणार आहे.  जनजागृती आणि वर्तणुकीत बदल घडवून आणणारा उपक्रम ही हे अभियान राबवण्यामागील संकल्पना असून त्याद्वारे नागरिकांना समाज आणि राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. जबाबदार नागरिकत्त्वाचा संदेश सुलभरित्या पोहोचवण्यासाठी या प्रदर्शनात मल्टिमिडीया सादरीकरणे, दृश्य प्रदर्शने आणि संवादी घटकांचा वापर करण्यात आला आहे.


पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2308051) अभ्यागत कक्ष : 14
Read this releasein: English