इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
तब्बल 14 वर्षांनंतर भारतात झालेल्या आशिया प्रशांत इंटरनेट समुदायाच्या संमेलनात निक्सीचा एपीएनआयसी सोबत भागीदारी करार
एपीएनआयसी 62 ने इंटरनेट विकास, तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण आणि राऊटिंग सुरक्षा या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ केले असताना, भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या
Posted On:
08 SEP 2026 8:04PM by PIB Mumbai
मुंबई, 8 सप्टेंबर 2026
आशिया-प्रशांत क्षेत्रातील इंटरनेट समुदायाची महत्वाची परिषद, एपीएनआयसी -62 चे आयोजन, मुंबईत 8 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान करण्यात आले आहे. राष्ट्रीय इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया - निक्सीने, इंटरनेट सेवा प्रदाते संघटना – आयएसपीएआयच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन केले असून, भारतात तब्बल 14 वर्षांनंतर ही परिषद होत आहे.
एपीएनआयसी - 62 दरम्यान झालेली महत्वाची घडामोड म्हणजे, निक्सी आणि आशिया-प्रशांत माहिती केंद्र यांच्यात झालेला सामंजस्य भागीदारी करार. या करारामुळे, इंटरनेट विकास, तंत्रज्ञान क्षमता बांधणी आणि विविध समुदायांपर्यंत पोहोचणे, या संदर्भात दोन्ही संघटनांमधील सहकार्य अधिक मजबूत होणार आहे.

या परिषदेला, वरिष्ठ सरकारी अधिकारी तसेच इंटरनेट क्षेत्रातील मान्यवर नेते उपस्थित होते. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुशील पाल, निक्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देवेश त्यागी, तसेच एपीएनआयसी च्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष केनी हुआंग यांचा समावेश आहे.
“भारताच्या डिजिटल प्रवासाला, भक्कम आणि विश्वासार्ह अशा इंटरनेट पायाभूत सुविधांची गरज आहे. त्या दृष्टीने, एपीएनआयसी 62 या परिषदेचे यजमानपद ही आमच्या इंटरनेट समुदायासाठी, सर्व ठिकाणच्या तज्ञ लोकांशी थेट संपर्क साधण्याची उत्तम संधी आहे. एपीएनआयसी आणि निक्सी यांच्यातील सहकार्य, भारताच्या तंत्रज्ञानविषयक क्षमतांना अधिक बळ देईल आणि इंटरनेटच्या सातत्यपूर्ण विकासालाही पुढे नेईल,” असा विश्वास, सुशील पाल यांनी यावेळी व्यक्त केला.
“एपीएनआयसी 62 ही भारतासाठी आशिया-प्रशांत क्षेत्राच्या व्यापक इंटरनेट समुदायाशी संवाद साधण्याची एक महत्त्वपूर्ण संधी आहे. IPv6, RPKI आणि तांत्रिक प्रशिक्षण यांसारख्या क्षेत्रांतील व्यावहारिक उपक्रमांमुळे, एपीएनआयसी सोबतच्या सामंजस्य कराराचे महत्त्व अधिक अधोरेखित होईल. स्थानिक पातळीवर अधिक सक्षम असे तांत्रिक कौशल्य विकसित करणे आणि भारतीय इंटरनेट समुदायाला प्रादेशिक तांत्रिक विकासात अधिक सक्रियपणे सहभागी होण्यास सक्षम करणे, यावर आमचा भर आहे,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देवेश त्यागी यांनी सांगितले.
“IPv6 च्या स्वीकाराच्या बाबतीत भारताने यापूर्वीच जागतिक स्तरावर आघाडीवर असल्याचे सिद्ध केले आहे. निक्सी सोबतची ही भागीदारी, राउटिंग सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी आणि भारताच्या एकूण इंटरनेट व्यवस्थेच्या सुरक्षेत योगदान देण्यासाठी महत्त्वाचे पुढचे पाऊल आहे. या सहकार्याच्या माध्यमातून एपीएनआयसी आणि निक्सी नेटवर्क ऑपरेटर्ससोबत काम करून राउटिंग सुरक्षा तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल प्रोत्साहन देतील. स्थानिक पातळीवर तज्ज्ञ विकसित करण्यास आणि भारत आणि या संपूर्ण प्रदेशातील तांत्रिक क्षमता बळकट करण्यास मदत करणाऱ्या प्रशिक्षण आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीतून हे काम केले जाईल,”असे एपीएनआयसीचे महासंचालक जिया रोंग लो यांनी सांगितले.

या भागीदारींतर्गत, निक्सी आणि एपीएनआयसी हे IPv6 व RPKI चा अवलंब, 'ट्रेन-द-ट्रेनर' (प्रशिक्षक प्रशिक्षण) कार्यक्रम, RPKI प्रशिक्षण आणि तांत्रिक प्रयोगशाळा पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सहकार्य करतील. तसेच, या संस्था 'RPKI रिपॉझिटरी मिरर'च्या तैनातीमध्ये देखील सहकार्य करतील; यामुळे राउटिंग सुरक्षेशी संबंधित माहिती मिळवणे अधिक सुलभ होईल आणि अधिक कार्यक्षम नेटवर्क कामकाजास मदत होईल.
या भागीदारीमुळे भारतातील इंटरनेट समुदायात तांत्रिक ज्ञानाचा अधिक विस्तार होईल. प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षणाद्वारे, स्थानिक पातळीवर कौशल्य विकसित करणे आणि इंटरनेटच्या बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नेटवर्क ऑपरेटर्स व तांत्रिक व्यावसायिकांची क्षमता बळकट करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
एपीएनआयसी 62 या परिषदेच्या निमित्ताने आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील धोरणकर्ते, सरकारी प्रतिनिधी, इंटरनेट पायाभूत सुविधांचे तज्ज्ञ, नेटवर्क ऑपरेटर, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि इतर संबंधित घटक एका व्यासपीठावर येतील. तीन दिवस चालणारी ही परिषद इंटरनेटला आकार देणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देते , यामध्ये कनेक्टिव्हिटी , कृत्रिम बुद्धिमत्ता , डिजिटल पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, IPv6, राउटिंग सुरक्षा, इंटरनेट प्रशासन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.
ही परिषद प्रादेशिक इंटरनेट समुदायामध्ये भारताचे वाढते महत्त्व देखील अधोरेखित करते. विशाल आणि वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल परिसंस्थेमुळे, इंटरनेटच्या पायाभूत सुविधा, इंटरनेटची उपलब्धता आणि सुरक्षा यांच्या भविष्याबाबत होणाऱ्या चर्चांमध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
एपीएनआयसी 62 मध्ये इंटरनेट कामकाज, नेटवर्क सुरक्षा, पायाभूत सुविधा, धोरणे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषयांवर तांत्रिक सत्रे, ट्यूटोरियल्स, पॅनेल चर्चा आणि समुदाय-प्रणित चर्चांचा समावेश आहे.
निक्सी साठी, एपीएनआयसी 62 चे आयोजन ही प्रादेशिक इंटरनेट समुदायासोबत भारताचा सहभाग अधिक दृढ करण्याची आणि तांत्रिक ज्ञानाची देवघेव वाढवण्याची एक संधी आहे. ही परिषद आणि निक्सी-एपीएनआयसी यांच्यातील भागीदारी; मुक्त, सुरक्षित, स्थिर आणि सक्षम इंटरनेटच्या उभारणीत सातत्यपूर्ण सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करते.
NIXI बद्दल
'नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया' (NIXI) ही भारत सरकारच्या 'इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया'च्या अंतर्गत स्थापन झालेली ना-नफा तत्त्वावर चालणारी एक संस्था आहे. देशांतर्गत इंटरनेट ट्रॅफिकची कार्यक्षम देवाणघेवाण , .IN आणि .भारत (.Bharat) या 'कंट्री-कोड टॉप-लेव्हल डोमेन्स'चे व्यवस्थापन आणि देशभरात इंटरनेट सेवांचा अवलंब वाढवण्यास प्रोत्साहन देऊन भारताची इंटरनेट पायाभूत सुविधा बळकट करण्यात NIXI महत्त्वाची भूमिका बजावते.
पीआयबी मुंबई |माधुरी पांगे/राधिका अघोर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308008)
अभ्यागत कक्ष : 11