अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विवेकी व करदाता-केंद्रित अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनाला बळ देत आरोहण–2026 बॅच-II ची सांगता

Posted On: 07 SEP 2026 9:19PM by PIB Mumbai

 

मुंबई, 07 सप्टेंबर, 2026

मुंबई आणि पुणे क्षेत्रातील नवनिर्वाचित उत्पन्न कर अधिकाऱ्यांसाठी आयोजित ‘आरोहण-2026, बॅच-II’ या अभिमुखीकरण प्रशिक्षणाचा समारोप  आज कर्जत येथे झाला. कर प्रशासनातील व्यावसायिक गुणवत्ता, नेतृत्व क्षमता आणि करदाता-केंद्रित दृष्टिकोन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित 40 कामकाजाच्या दिवसांच्या या सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमाची या सोहळ्याने यशस्वी सांगता झाली.

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी कर प्रशासन व प्रशासकीय कारभाराशी संबंधित समकालीन विषयांवर सादर केलेल्या संशोधन-आधारित प्रकल्पांनी या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सादरीकरणांतून करप्रणालीतील नवीन आव्हाने आणि धोरणात्मक मुद्द्यांविषयीचा अधिकाऱ्यांचा सखोल अभ्यास दिसून आला. गिग अर्थव्यवस्थेवरील करप्रणालीकर आणि विकसित भारत @2047 – देशाच्या विकसित अर्थव्यवस्थेकडील वाटचालीत उत्पन्न कर विभागाची भूमिका, मंदी आणि महागाईचा सामना करण्यासाठी करप्रणालीचा वापर कसा केला जातो?, स्वेच्छेने करभरणा : करदात्यांना प्रोत्साहन/प्रवृत्त करणे की सक्ती करणे – करपालनासाठी काय अधिक प्रभावी ठरेल?; कर सुधारणा आणि उद्योग सुलभतेमध्ये सिंगापूर आघाडीवर का आहे व त्यातून भारतासाठी काय धडे घेता येतील?; आणि करपालनामध्ये ‘ॲन्यूअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट’चा (AIS) वाढता सहभाग; या प्रमुख विषयांचा या सादरीकरणामध्ये समावेश होता. 

समारोप  कार्यक्रमाची सुरुवात एनएडीटी-आरसी (NADT-RC), मुंबईचे मुख्य प्रधान अतिरिक्त महासंचालक नवनीत मनोहर यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी एक विवेकपूर्ण कर्मयोगी अधिकाऱ्याची प्रमुख लक्षणे अधोरेखित केली आणि ही मूलभूत मूल्ये रुजवणारे अधिकारी घडवण्यात एनएडीटी-आरसी च्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.

प्रशिक्षण कालावधीत आत्मसात केलेले ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव नवनिर्वाचित उत्पन्न कर अधिकाऱ्यांनी आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडताना प्रत्यक्ष कृतीत आणावेत, असे आवाहन मनोहर यांनी सहभागी अधिकाऱ्यांना केले. तसेच, आपली कर्तव्ये अधिक सक्षमपणे, प्रभावीपणे आणि करदाता-केंद्रित दृष्टिकोन ठेवून पार पाडण्याच्या महत्त्वावर त्यांनी विशेष भर दिला.

या सोहळ्याला सुरत येथील मुख्य आयकर आयुक्त एन. सी. स्वेन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयकर अधिकारी संवर्गात पदोन्नती मिळाल्याबद्दल आणि कार्यक्रम तसेच प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सहभागींचे अभिनंदन करताना स्वेन यांनी नमूद केले की प्रभावी कर प्रशासनासाठी केवळ तांत्रिक कौशल्य आणि व्यावसायिकता पुरेशी नाही. करदात्यांशी व्यवहार करताना सहानुभूती, संवेदनशीलता आणि नागरिक-केंद्रित दृष्टिकोन ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

नवनियुक्त अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना सचोटी, निष्पक्षता आणि उत्तरदायित्वाचे सर्वोच्च मापदंड जपावेत, असे आवाहनही स्वेन यांनी केले.

सादरीकरणांचे मूल्यांकन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या परीक्षक मंडळाने केले — या मंडळात नवी दिल्ली येथील दिल्ली-10 मधील प्रधान आयकर आयुक्त दीपक तिवारी; पणजी येथील प्रधान आयकर आयुक्त नैना एस. कपिल; आणि मुंबई येथील प्रधान आयकर आयुक्त-19 अमृता मिश्रा यांचा समावेश आहे.

एकूण 40 कामकाजाच्या दिवसांमध्ये आयोजित, 'आरोहण -2026, बॅच -2' या प्रशिक्षण कार्यक्रमात आयकर कायदा, नवीन आयकर कायदा-2025, लेखाशास्त्र, खात्यांची तपासणी, कर प्रशासन, व्यवसाय प्रक्रिया, नेतृत्व आणि व्यावसायिक कौशल्ये या विषयांचे सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्यात आले. या तुकडीमध्ये एकूण 35 अधिकाऱ्यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाची यशस्वी पूर्तता ही सक्षम, भविष्यासाठी सज्ज आणि करदाताकेंद्रीत  अधिकारी घडवण्याच्या आयकर विभागाच्या वचनबद्धतेचे प्रतिक आहे. कर प्रशासनासमोरील बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि 'विकसित भारत @2047' च्या संकल्पनेत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी हे अधिकारी सज्ज  झाले आहेत.

***

सुषमा काणे/वैभवी जोशी/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2307695) अभ्यागत कक्ष : 7
Read this releasein: English