नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल येथे मुंबई बंदर प्राधिकरणाकडून सेशेल्सच्या संसदीय शिष्टमंडळाचे स्वागत

Posted On: 07 SEP 2026 7:17PM by PIB Mumbai

मुंबई, 7 सप्टेंबर, 2026

द्विपक्षीय संसदीय देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत सेशेल्सच्या संसदीय शिष्टमंडळाने मुंबईच्या अधिकृत दौऱ्याचा एक भाग म्हणून आज मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस येथे मुंबई बंदर प्राधिकरणाला भेट दिली.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष अझारेल अर्नेस्टा यांनी केले. मुंबई बंदर प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आदेश तितरमारे (आयएएस) आणि बंदराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देणाऱ्या शिष्टमंडळाचे स्वागत केले.

या वेळी शिष्टमंडळाला मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसच्या सुविधा आणि कामकाजाविषयी, विशेषतः प्रवाशांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी मुंबई  बंदराच्या  क्रूझ पायाभूत सुविधांचा आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर क्रूझ पर्यटन, प्रवाशांची वाहतूक तसेच सागरी जोडणीला प्रोत्साहन देण्यात  बंदराच्या  भूमिकेचा आढावा मांडला.

संवादादरम्यान आदेश तितरमारे यांनी प्रस्तावित मुंबई मरिना प्रकल्पाविषयी आणि मुंबईत सागरी पर्यटन, सेलिंग, यॉट पायाभूत सुविधा, बंदराशी संबंधित सेवा तसेच नागरिकांसाठीच्या वॉटरफ्रंट विकासाला चालना देण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल शिष्टमंडळाला माहिती दिली.

मुंबई बंदर प्राधिकरणाने हाती घेतलेल्या शाश्वतता उपाययोजना आणि पर्यावरणीय उपक्रमांमध्येही शिष्टमंडळाने विशेष रस दाखवला. अधिकाऱ्यांनी बंदराचे स्वच्छ कामकाज, जबाबदार बंदर विकास आणि सुधारित प्रवासी पायाभूत सुविधांसाठीच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस ही मुंबई बंदर प्राधिकरणाने विकसित केलेली एक महत्त्वाची प्रवासी पायाभूत सुविधा आहे. हे टर्मिनस आधुनिक क्रूझ कामकाजाला पाठबळ देते आणि क्रूझ पर्यटन, बंदर सेवा तसेच प्रवासी सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी बंदराने केलेल्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे.

या भेटीमुळे मुंबईच्या आधुनिक सागरी पायाभूत सुविधांचे प्रदर्शन करण्याची आणि प्रवासी व क्रूझ सुविधांच्या विकासातील भारताचा अनुभव आंतरराष्ट्रीय संसदीय शिष्टमंडळासोबत सामायिक करण्याची संधी मिळाली.

शिष्टमंडळाने मुंबई  बंदर  प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि टर्मिनसमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा तसेच हाती घेतलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. आदेश तितरमारे यांच्या हस्ते भेट देणाऱ्या शिष्टमंडळातील सदस्यांना स्मृतीचिन्हे आणि शाल प्रदान करण्यात आल्या.

भारताचे सागरी संबंध मजबूत करण्यासाठी आणि क्रूझ पर्यटन व सागरी उपक्रमांचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून मुंबईला पुढे आणण्यासाठी मुंबई  बंदर  प्राधिकरण वचनबद्ध आहे. भारताच्या वाढत्या सागरी आणि पर्यटन क्षेत्रांना पाठबळ देतानाच, आधुनिक, शाश्वत आणि प्रवाशांसाठी अनुकूल पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दिशेने हे बंदर सातत्याने कार्य करत आहे.

***

सुषमा काणे/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2307671) अभ्यागत कक्ष : 15
Read this releasein: English