खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एमईएआय आणि आयबीएम यांनी एआय-सक्षम खाणपट्टा प्रणाली संदर्भातील कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 07 SEP 2026 3:31PM by PIB Mumbai


मायनिंग इंजिनिअर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एमईएआय) नागपूर शाखेने आणि इंडियन ब्युरो ऑफ माइन्स (आयबीएम) यांनी संयुक्तपणे 5 सप्टेंबर 2026 रोजी नागपूरमधील हॉटेल तुली इंटरनॅशनल येथे “कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम खाणपट्टा प्रणाली (एमटीएस) द्वारे डेटाचे कार्यक्षम प्रशासनात रूपांतर करण्याचा दृष्टिकोन” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.

या कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खाणकाम डेटाचे अनुकूल , पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासन तसेच नियामक चौकटीत रूपांतर करण्याच्या शक्यतांचा आढावा घेण्यात आला.

आयबीएमचे नियंत्रक महासंचालक पंकज कुलश्रेष्ठ यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले. कुलश्रेष्ठ यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात, आयबीएमच्या खाणपट्टा प्रणाली (एमटीएस) खनिज सवलतींच्या संपूर्ण जीवनचक्राचे डिजिटायझेशन आणि ऑटोमेशन करण्यासाठीचा एक प्रमुख उपक्रम असल्याचे सांगितले. या प्रणालीमुळे देशभरातील खाणींमधील खाणकामाशी संबंधित डेटाचे एकत्रीकरण शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले.

“सध्या, एमटीएसमध्ये 14 मॉड्यूल्स आहेत, ज्यात खाणीचा स्थानिक डेटा, कामकाज, उत्पादन, महसूल, रॉयल्टी आणि इतर बाबींचा समावेश आहे. आयबीएमकडे प्रचंड डेटा आहे, ज्याचा कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा ॲनालिटिक्स, जीआयएस आणि आयओटीच्या माध्यमातून उपयोग करून खाण क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन आणि तपासणीसाठी स्वयंचलित सूचना देण्यास सक्षम असलेली कार्यक्षम प्रणाली विकसित केली जाऊ शकते,” असे ते म्हणाले.

आयबीएम पारंपरिक तपासणी यंत्रणांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि खाण उद्योगावरील अनुपालनाचा भार हलका करण्यासाठी काम करत आहे, असे कुलश्रेष्ठ म्हणाले. एमटीएस परिसंस्था अधिक सक्षम करून, कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध खाणी तसेच खनिज क्षेत्राशी संबंधित डेटा सेट्सचे एकत्रिकरण करून स्मार्ट गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म विकसित करण्याची भारतीय खाण ब्युरोची संकल्पना आहे.

त्यांनी एआय साधनांचे प्रशिक्षण देण्यासाठी इंडियन ब्युरो ऑफ माइन्सची नागपूरच्या व्हीएनआयटी सोबत असलेल्या सहकार्याचाही उल्लेख केला आणि ब्युरो खाण आणि खनिज क्षेत्रासाठी राष्ट्रीय स्तरावरील 'स्मार्ट गव्हर्नन्स अँड मॉनिटरिंग सिस्टम' विकसित करू शकेल, असा विश्वास व्यक्त केला.

आपल्या स्वागतपर भाषणात आयबीएमचे मुख्य खाण नियंत्रक डॉ. वाय. जी. काळे यांनी, एआय-आधारित साधने ही आधुनिक प्रशासनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत, यावर भर दिला.  पायाभूत सुविधा, ऊर्जा संक्रमण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने खाण क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता, या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. एआयचा जबाबदारीने वापर केल्यास पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढू शकते, स्वयंचलित तपासणी आणि नियमांचे पालन सुलभ होऊ शकते तसेच खनिज संपत्तीचा इष्टतम वापर शक्य होतो, असे ते म्हणाले.

एमईएआयचे (MEAI) राष्ट्रीय अध्यक्ष डी. बी. सुंदरा रमण यांनी पारदर्शक आणि कार्यक्षम खाण नियमनासाठी आयबीएमने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी एमटीएस (MTS) डेटाचे रिअल-टाइम ॲप्लिकेशन्स आणि भौगोलिक व वेळेची माहिती जोडणाऱ्या प्रेडिक्टिव्ह मॉडेल्समध्ये रूपांतर करण्याच्या गरजेवर भर दिला, ज्यामुळे तपासणीचे नियोजन सुधारणे आणि धोक्यांवर आधारित नियमन करणे शक्य होईल.

एनआयसी (NIC), नागपूरचे तांत्रिक संचालक आर. डी. बोरोले यांनी आयबीएमचे क्षेत्रातील ज्ञान आणि एनआयसीची तांत्रिक क्षमता यांचा मेळ घालत एमटीएस प्रणालीला 'एमटीएस 2.O' कडे नेण्यासाठी आयबीएमसोबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

तांत्रिक सत्रांदरम्यान, आयबीएमचे खाण नियंत्रक पुष्पेंदर गौर यांनी एआय/एमएल-आधारित 'इंटेलिजेंट मायनिंग गव्हर्नन्स'ची रूपरेषा सादर केली. तसेच एमटीएस डेटा आणि जीआयएस मॉड्यूल्समधील सुधारणांसह, अपडेटेड रिटर्न्स, स्टार रेटिंग आणि सिस्टीमच्या इतर वैशिष्ट्यांवर सादरीकरणे करण्यात आली.

उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, एमईएआयचे सदस्य, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या एका संवाद सत्रात एआय-आधारित खाण प्रशासन आणि एमटीएसच्या भविष्यातील विकासावर सविस्तर चर्चा झाली.

कार्यशाळेचा समारोप डॉ. वाय. जी. काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोप सत्राने झाला. यावेळी एमईएआयचे सरचिटणीस नरसय्या, आयबीएमचे डीसीओएम आणि एमईएआय नागपूर चॅप्टरचे सचिव जी. राम आणि इतर सहभागी उपस्थित होते. आयबीएमचे डीसीओएम आशिष मिश्रा यांनी आभार मानले.

***

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/ वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2307475) अभ्यागत कक्ष : 12
Read this releasein: English