शिक्षण मंत्रालय
आयआयएम नागपूर माध्यम परिषद 2026 मध्ये माध्यमांची जबाबदारी, नेतृत्वातील नैतिक गुण आणि राष्ट्रउभारणी यावर भर
Posted On:
07 SEP 2026 2:28PM by PIB Mumbai
नागपूर, 7.9.2026
आयआयएम नागपूर येथे आयोजित दोन दिवसीय आयआयएम नागपूर माध्यम परिषद 2026 ची रविवारी सांगता झाली. या परिषदेत धोरणकर्ते, माध्यम क्षेत्रातील नेते, उद्योग प्रतिनिधी, पद्म पुरस्कार विजेते, शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिक आणि विद्यार्थी सहभागी झाले. माध्यमे, नेतृत्व, जनसंवाद आणि बदलती जागतिक व्यवस्था यांसारख्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
माध्यमे, नेतृत्व आणि नवी जागतिक व्यवस्था” या संकल्पनेवर आधारित असलेल्या या परिषदेने, राष्ट्रउभारणीमध्ये माध्यमांची जबाबदारी नेतृत्वाची नैतिकता , तंत्रज्ञान आणि युवावर्ग यांच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी एक राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

5 सप्टेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेच्या उद्घाटन सत्राला सुरुवात झाली. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच आयआयएम नागपूरचे संचालक प्रा. भीमराय मेट्री आणि आयआयएम नागपूरचे ब्रँड आणि माध्यम अध्यक्ष प्रा. यतीश जोशी हेही त्या दिवशी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना, गडकरी यांनी लोकशाही संस्था बळकट करण्यात आणि सुजाण जनसहभागाला प्रोत्साहन देण्यात माध्यमांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.“लोकशाहीच्या प्रगती आणि विकासासाठी स्वतंत्र, निःपक्षपाती आणि न्याय्य माध्यमे अत्यंत महत्त्वाची आहेत,” असे ते यावेळी म्हणाले.
एकविसाव्या शतकात विश्वासार्हता, सद्भावना आणि प्रामाणिकपणा ही अमूल्य संपत्ती असल्याचे सांगत, त्यांनी माध्यम व्यावसायिकांना जनहितार्थ बाबी प्रभावीपणे मांडताना दृढनिश्चय, वचनबद्धता आणि व्यावसायिक नीतिमत्ता जपण्याचे आवाहन केले.
भारताची तरुण लोकसंख्या राष्ट्राच्या विकासाला आणि जागतिक स्थानाला आकार देण्यात निर्णायक भूमिका बजावेल, असे प्रा. मेट्री आपल्या भाषणात म्हणाले. युवावर्गाला ज्ञान, चिकित्सक विचार, नैतिक निर्णयक्षमता आणि नेतृत्व क्षमतांनी सुसज्ज करण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांवर आहे, यावर त्यांनी भर दिला.
उद्योजकतेविषयी विचार करण्यास आणि राष्ट्रीय आर्थिक विकासात योगदान देण्यास प्रभाकरन यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. आपल्या उद्योजकतेच्या प्रवासाची आणि गडचिरोलीच्या विकासाच्या क्षमतेची आठवण करून देताना ते म्हणाले, “मला गडचिरोलीच्या मातीत संधी दिसल्या आणि आज त्याचे उत्साहवर्धक परिणाम मिळत आहेत, तसेच त्यामुळे पोलाद निर्मितीच्या जगात एक नवीन अध्याय लिहिला जात आहे.”
पहिल्या दिवशी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य संपादक विजय जोशी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात माध्यम संस्थांचे व्यवस्थापन या विषयावर, आणि बिझनेस स्टँडर्डचे संपादकीय संचालक ए. के. भट्टाचार्य यांनी नेतृत्व, आर्थिक सुधारणा आणि उदयोन्मुख जागतिक व्यवस्था या महत्त्वाच्या विषयांवर प्रमुख सत्रे घेतली.
पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. धनंजय सागदेव आणि श्री सुभाष शर्मा या पद्म सन्मानित विजेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका विशेष संमेलनात नेतृत्व, लोकसेवा, आरोग्यसेवा संवाद, तळागाळातील सहभाग आणि नैसर्गिक शेती या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री, ॲड. आशिष शेलार यांच्या समारोपीय भाषणाने या संमेलनाची सांगता झाली. त्यांनी माध्यम, नेतृत्व आणि उदयोन्मुख जागतिक व्यवस्था यांना जोडणारा समान धागा म्हणून नीतिमत्ता या विषयावर भर दिला.

देशातील तरुणांची ऊर्जा आणि क्षमता एका भक्कम नैतिक पायावर आधारित असली पाहिजे,असा इशारा भारताची लोकसंख्याशास्त्रीय आणि बौद्धिक बलस्थाने अधोरेखित करताना, ॲड. शेलार यांनी दिला.“भारतातील तरुण पिढीवर प्रभाव टाकण्याच्या आणि त्यांची ऊर्जा भरकटवण्याच्या प्रयत्नांविषयी आपण जागरूक राहिले पाहिजे. आपली तरुणाई माहितीपूर्ण, सतर्क आणि एका भक्कम नैतिक पायावर आधारित असली पाहिजे,” असे ते म्हणाले.
भारताला जगातील अग्रगण्य राष्ट्रांपैकी एक बनवण्याच्या प्रवासात संस्कृती, प्रसारमाध्यमे, तंत्रज्ञान आणि नेतृत्व यांच्या परस्परसंबंधित भूमिकांवर त्यांनी भर दिला. “केवळ लक्ष वेधण्यासाठी नव्हे, तर सामंजस्य निर्माण करण्यासाठी संवाद साधा. बोलण्यापूर्वी, मुद्दा समजून घ्या. माहिती देण्यापूर्वी, तथ्यांची पडताळणी करा. तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी, त्याच्या मानवी उद्देशाबद्दल विचार करा,” असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
तत्पूर्वी, प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार विजेते आणि सांस्कृतिक कार्यकर्ते अमित वाईकर यांनी “सीमेपलीकडे: भारत जगाशी कसा संवाद साधतो” या विषयावर बीजभाषण केले. त्यांनी तरुण भारतीयांना देशाचे प्रभावशाली जागतिक संवादक म्हणून संबोधले.
सहकार्य, ज्ञान आणि लोकभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ तयार करण्याच्या आणि महाराष्ट्र व देशाच्या विकासात योगदान देण्याच्या आयआयएम नागपूरच्या वचनबद्धतेचा प्रा. मेट्री यांनी पुनरुच्चार केला.
जलद तांत्रिक परिवर्तन आणि बदलत्या जागतिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमे आणि नेतृत्वाच्या जबाबदाऱ्यांवर चिंतन करण्यासाठी ही दोन दिवसीय परिषद एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरली. या परिषदेच्या विविध सत्रांमध्ये, वक्त्यांनी विश्वासार्हता, नैतिक विवेकबुद्धी, जबाबदार संवाद आणि राष्ट्र उभारणीमध्ये भारताच्या युवकांचा विधायक सहभाग यांच्या महत्त्वावर जोर दिला.
***
नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2307434)
अभ्यागत कक्ष : 13