अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डेटा-आधारित सुशासनासाठी आयकर आणि नोंदणी विभागाचा एकत्रित उपक्रम

Posted On: 06 SEP 2026 4:59PM by PIB Mumbai

 

मुंबई, 6.9.2026

मुंबईच्या आयकर संचालनालय (बुद्धिमत्ता आणि गुन्हे अन्वेषण) आणि मुद्रांक व नोंदणी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांतील अधिकाऱ्यांसाठी वांद्रे (पूर्व) येथील 'प्रकाशगड' येथे एका भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 200 हून अधिक अधिकारी सहभागी झाले होते. नव्या आयकर कायदा, 2025 अंतर्गत वित्तीय व्यवहारांचे विवरण पत्र आणि 'फॉर्म 165' बाबत यात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये पॅन (PAN) ची अचूक नोंद, व्यवहाराचे आणि मुद्रांकाचे मूल्य, डेटा पडताळणी तसेच नोंदींमधील चुका दुरुस्त करणे या बाबींवर विशेष भर देण्यात आला.

आयकर मुंबईचे संचालक डॉ. संतोष सी. मानकोसकर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. कर प्रशासन हे अधिकाधिक तंत्रज्ञानाधारित, माहितीकेंद्रित आणि जोखीम-मूल्यांकनावर आधारित होत असून, अचूक व विश्वासार्ह माहिती हाच आधुनिक कर प्रशासनाचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले. नोंदणी विभागाचा प्रवास केवळ महसूल संकलनापुरता मर्यादित न राहता, नागरिक-स्नेही नोंदणी पद्धती, डिजिटलायझेशन आणि आता 'डेटा-आधारित सुशासना'च्या दिशेने झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे या विभागाची भूमिका ही फक्त नोंदणी व मुद्रांक शुल्क वसुलीपुरती उरलेली नसून, तो आता देशाच्या महत्त्वाच्या आर्थिक माहितीचा एक मुख्य स्रोत आणि संरक्षक बनला आहे. “नागरिकांसाठी सुलभ नोंदणी, राज्यासाठी योग्य महसूल आणि राष्ट्रासाठी अचूक माहिती”, या संदेशावर त्यांनी भर दिला. उच्च दर्जाची वित्तीय व्यवहारांची माहिती ही ऐच्छिक कर अनुपालन वाढवू शकते, प्रभावी जोखीम विश्लेषणास मदत करते, कराचा पाया रुंदावते, पारदर्शक सुशासन मजबूत करते आणि याद्वारे राष्ट्रउभारणीत अत्यंत महत्त्वाचे योगदान देते, असे मानकोसकर यांनी सांगितले. 

तांत्रिक आणि प्रात्यक्षिक सत्रांदरम्यान, आयकरचे अप्पर संचालक पुगलिया चंदन राजेंद्र, आयकरचे अप्पर संचालक अतुल कुमार पांडे आणि आयकर संयुक्त आयुक्त क्षितिज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी SFT रिपोर्टिंग, फॉर्म 165, डेटा पडताळणी, पॅन (PAN) व व्यवहाराशी संबंधित माहितीची अचूक नोंद घेणे आणि रिपोर्टिंग दरम्यान येणाऱ्या व्यावहारिक अडचणींवर सहभागी अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचा शेवट एका संवाद सत्राने झाला; यामध्ये अधिकाऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच माहितीचे अचूक, परिपूर्ण आणि वेळेत रिपोर्टिंग सुनिश्चित करण्यासाठी आयकर विभाग आणि नोंदणी विभाग यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.

***

शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2307194) अभ्यागत कक्ष : 31
Read this releasein: English