शिक्षण मंत्रालय
आयआयएम नागपूरमध्ये 'हिंदी महिना 2026' चे उद्घाटन
'मेघदूत' या वार्षिक हिंदी प्रकाशनाची घोषणा
Posted On:
04 SEP 2026 9:25PM by PIB Mumbai
नागपूर, 4 सप्टेंबर 2026
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरने (आयआयएम नागपूर) 1 सप्टेंबर रोजी 'हिंदी महिना 2026' चे उद्घाटन केले. याद्वारे साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या मालिकेच्या माध्यमातून हिंदी भाषेच्या महिनाभर चालणाऱ्या उत्सवाची सुरुवात झाली.
प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि वक्ते डॉ. वेदप्रकाश मिश्रा उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हिंदी भाषेने बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका आणि देशभरातील लोकांना जोडणारी भाषा म्हणून तिचे आजही असलेले महत्त्व, यावर त्यांनी प्रकाश टाकला.

स्वातंत्र्य लढ्याच्या काळात हिंदी ही केवळ संवादाची भाषा नव्हती, तर भौगोलिक आणि भाषिक सीमांच्या पलीकडे जाऊन लोकांना जोडणारे एक प्रभावी माध्यम म्हणूनही ती उदयास आली, असे डॉ. मिश्रा म्हणाले.
"स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काश्मीर ते कन्याकुमारी आणि अटक ते कटक असा भाषिक दुवा साधायला हिंदी भाषेने सहाय्य केले," ते म्हणाले.
हिंदी महिन्याच्या उद्घाटन सोहळ्याला आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मेत्री, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा. देवशीष रथ, ब्रँड आणि मीडिया अध्यक्ष प्रा. यतीश जोशी, प्राध्यापक सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि वेद लिटरेचर क्लबशी संबंधित विद्यार्थी उपस्थित होते.
हिंदी भाषेचे स्वरूप स्पष्ट करताना डॉ. मिश्रा यांनी सांगितले की, ही भाषा सोपी आणि लवचिक असून तिच्यात काव्यमयतेचा प्रभावी गुणधर्म आहे. त्यांनी नमूद केले की, हिंदी भाषेने आपल्या विकासप्रक्रियेत कधीही संकुचित भूमिका घेतली नाही, उलट अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमधील शब्द स्वीकारून ते आत्मसात केले.
हिंदी भाषेच्या जागतिक अस्तित्वाचा उल्लेख करताना डॉ. मिश्रा यांनी सांगितले की, भारतीय मानववंशशास्त्रीय सर्वेक्षण विभागाच्या 2023 च्या आकडेवारीनुसार, हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. भारताचे बहुभाषिक स्वरूप हेच भारताचे सामर्थ्य आहे आणि ते साजरे केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
तत्पूर्वी, प्रा. यतीश जोशी यांनी आयआयएम नागपूरमध्ये 'हिंदी महिना'निमित्त नियोजित उपक्रमांची रूपरेषा मांडली आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने केलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली.
प्रा. देवाशिष रथ यांनी आयआयएम नागपूरमध्ये हिंदी भाषेचा वाढता वापर आणि स्वीकारार्हता याविषयी भाष्य केले. शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजात हिंदीतून संवाद साधण्याच्या आणि सहभागाच्या अधिक संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने संस्थेने केलेल्या प्रगतीवर त्यांनी प्रकाश टाकला.
प्रा. भीमराय मेत्री यांनी हिंदी भाषेची सुलभता आणि सुगमतेबद्दल भाष्य केले. त्यांनी या गोष्टीवर भर दिला की, हिंदी ही संवादासाठी एक सोपी आणि नैसर्गिक भाषा आहे आणि तिच्या याच सुलभतेमुळे समाजाच्या विविध स्तरातील लोकांपर्यंत ती सहजपणे पोहोचू शकते.

आयआयएम नागपूरने 'मेघदूत' या आपल्या वार्षिक हिंदी प्रकाशनाची घोषणा केली
उद्घाटन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, आयआयएम नागपूरच्या 'मेघदूत' या वार्षिक आणि विशिष्ट संकल्पनेवर आधारित हिंदी प्रकाशनाचे मुखपृष्ठ आणि संकल्पना याचे अनावरण करण्यात आले.
आयआयएम नागपूर समुदायाच्या सर्जनशील, साहित्यिक आणि संस्थात्मक अभिव्यक्ती एका मध्यवर्ती संकल्पनेभोवती एकत्र आणणारे वार्षिक हिंदी मासिक, अशी ‘मेघदूत’ची संकल्पना आहे.
10 जानेवारी 2027 रोजी 'जागतिक हिंदी दिन' साजरा होत असून, त्या निमित्ताने 'मेघदूत'ची पहिली आवृत्ती प्रकाशित केली जाईल, अशी माहिती आयआयएम नागपूरचे संपर्क, माध्यम आणि राजभाषा अधिकारी चैतन्य देशपांडे यांनी दिली.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306855)
अभ्यागत कक्ष : 8