खाण मंत्रालय
एमईएआय आणि आयबीएमच्यावतीने 'एआय-सक्षम मायनिंग टेनमेंट सिस्टम' या विषयावरील प्रादेशिक कार्यशाळेचे संयुक्तरीत्या आयोजन
Posted On:
04 SEP 2026 8:25PM by PIB Mumbai
नागपूर, 4 सप्टेंबर 2026
'मायनिंग इंजिनिअर्स असोसिएशन ऑफ इंडिया' (एमईएआय) ची नागपूर शाखा आणि भारत सरकारच्या 'खाण मंत्रालया'च्या अंतर्गत कार्यरत असलेल्या 'इंडियन ब्युरो ऑफ माइन्स' (आयबीएम) यांच्या वतीने 5 सप्टेंबर 2026 रोजी नागपूर येथे हॉटेल तुली इंटरनॅशनल, सदर मध्ये "एआय-सक्षम मायनिंग टेनमेंट सिस्टम (एमटीएस) द्वारे डेटा 'इंटेलिजंट गव्हर्नन्स'मध्ये रूपांतरित करण्याबाबतचा दृष्टिकोन" या विषयावर एक दिवसीय प्रादेशिक कार्यशाळेचे संयुक्तरीत्या आयोजन करण्यात आले आहे.
मान्यता दिलेल्या खनिजांच्या संपूर्ण जीवनचक्रातील नियामक डेटावर प्रक्रिया करण्यासाठी वेब-आधारित इकोसिस्टमचा वापर करून घेऊन आयबीएमने रचना केलेल्या एमटीएसचे पूर्णतः डिजिटल प्रणाली म्हणून स्थान निर्माण झाले आहे. या डिजिटल परिवर्तनामुळे पूर्णपणे कागदविरहित कार्यप्रवाहाद्वारे उत्तरदायित्व सुलभ झाले असून त्याची 'नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन – 2025' सारख्या उपक्रमांनाही मदत होत आहे.
या प्रणालीमुळे भाडेपट्टाधारक, राज्य सरकारे, आयबीएम आणि इतर संबंधित घटकांमध्ये परस्पर संवाद सुकर झाला असून, त्याद्वारे वैधानिक माहिती ऑनलाइन सादर करणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि तिचे निरीक्षण करणे ही कामे सुरळितपणे पार पाडणे शक्य झाले आहे.
एमटीएस इंटिलिजंट निर्णय-सहाय्यक प्लॅटफॉर्म या रुपात विकसित होण्यासाठी एआय, मशीन लर्निंग, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस), क्लाउड कंप्युटिंग, रिमोट सेन्सिंग आणि प्रगत डेटा ॲनालिटिक्स यांचा अधिकाधिक अवलंब करण्याबाबत या कार्यशाळेत विचारमंथन केले जाईल. अनुपालन पडताळणी स्वयंचलित करणे, वैधानिक सादरीकरणांमधील विसंगती ओळखणे, खनिज संवर्धन सक्षम करणे, देखरेख सुधारणे, तपासणी अधिक कार्यक्षम करणे आणि धोरण-निर्मितीसाठी भविष्यसूचक अंतर्दृष्टी प्रदान करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
आयबीएमचे अधिकारी, राज्य सरकारांच्या खाणकाम आणि भूविज्ञान विभागांचे अधिकारी, खाणकाम व्यावसायिक, उद्योग प्रतिनिधी, शिक्षणतज्ञ आणि तंत्रज्ञान तज्ञ या कार्यशाळेत सहभागी होऊन एमटीएस सुधारणांवर चर्चा करतील, तसेच एक बुद्धिमान आणि एकात्मिक खाणकाम प्रशासन परिसंस्था उभारण्यासाठी एआयचा अवलंब आणि परस्पर सहकार्याच्या दिशेने संधी, आव्हाने आणि भविष्यातील वाटचाल या मुद्द्यांवरही विचारविनिमय करतील.
* * *
पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306822)
अभ्यागत कक्ष : 13