महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुणे येथे पश्चिम विभागीय सल्लागार कार्यशाळेत केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने विशेष गरजा असलेल्या मुलांच्या दत्तक प्रक्रियेसाठी प्रादेशिक सहकार्य केले अधिक बळकट

Posted On: 03 SEP 2026 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 सप्‍टेंबर 2026

 

केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने (कारा) आज (03 सप्टेंबर 2026) महाराष्ट्रातील पुणे येथे पश्चिम विभागासाठी आपली चौथी प्रादेशिक सल्लागार कार्यशाळा यशस्वीरित्या आयोजित केली. ही कार्यशाळा महाराष्ट्र सरकार आणि राज्य दत्तक संसाधन संस्था (सारा), महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आली होती.

“विशेष गरजा असलेल्या मुलांच्या (दिव्यांग मुलांच्या) संस्थाबाह्य पुनर्वसनास प्रोत्साहन देणे” या संकल्पनेवर आधारित दत्तक जागरूकता मोहीम 2025 अंतर्गत काराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागाची भौगोलिक आणि प्रशासकीय व्याप्ती मोठी आहे. या व्याप्तीचे प्रतिबिंब म्हणून या कार्यशाळेत 74 हून अधिक जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 150 हितधारकांनी सहभाग घेतला, ज्यामुळे दत्तकविधान आणि बाल पुनर्वसन या विषयांवर प्रादेशिक संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि समन्वयासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले.

महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे सहभागी हितधारकांना संबोधित केले. त्यांनी सर्व हितधारकांना दत्तक प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना कायमस्वरूपी, प्रेमळ व आधार देणारे कौटुंबिक वातावरण मिळण्याच्या अधिक संधी सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी कुटुंब-आधारित काळजी आणि दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण पुनर्वसनाचे कार्य पुढे नेण्यासाठी सर्व हितधारकांमध्ये सततचे सहकार्य, जागरूकता आणि समन्वित प्रयत्न यांच्या महत्त्वावर भर दिला.

उपस्थितांना संबोधित करताना काराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्य सचिव भावना सक्सेना यांनी विशेष गरजा असलेल्या मुलांच्या दत्तक प्रक्रियेत वाढ करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि सहयोगी प्रयत्नांच्या गरजेवर भर दिला. त्यांनी अधोरेखित केले की, काराच्या जनजागृती आणि सल्लामसलत उपक्रमांच्या मालिकेने दत्तक प्रक्रियेला बळकट करण्यास हातभार लावला आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांना कायमस्वरूपी कौटुंबिक संगोपन मिळण्याच्या संधींचा अधिक विस्तार करण्यासाठी कठोर आणि समन्वित प्रयत्न सुरू ठेवण्याच्या महत्त्वावर त्यांनी जोर दिला.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306590) अभ्यागत कक्ष : 10