भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

तरुणांना सत्याचे जतन करण्यासाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणूक साक्षरता क्लब सक्षम बनवतील: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार


इएलसी 2.0 शाळा आणि महाविद्यालयांना बनवणार निवडणूक साक्षरतेची केंद्र

Posted On: 03 SEP 2026 8:30PM by PIB Mumbai

गोवा, 3 सप्‍टेंबर 2026

 

निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी, सत्याचे जतन करण्यासाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी तरुण नागरिकांना सक्षम बनवण्यात निवडणूक साक्षरता क्लबची (ELCs) महत्त्वाची भूमिका आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त  ज्ञानेश कुमार यांनी गुरुवारी सांगितले. मडगाव, दक्षिण गोवा येथील रवींद्र भवन येथे 'भारतीय निवडणूक आयोगाने' "निवडणूक साक्षरता क्लब आणि ECINet" या विषयावर आयोजित केलेल्या चौथ्या प्रादेशिक परिषदेत ते बोलत होते.

संपूर्ण गोव्यातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना संबोधित करताना ज्ञानेश कुमार म्हणाले की, विद्यार्थी हे भारताचे भविष्य आहेत आणि देशभरातील इएलसी  जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला बळकट करण्यास मदत करतील. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही मूल्ये समजावून देणारे व्यासपीठ अशा शब्दात त्यांनी  इएलसीचे वर्णन केले.

भारतातील निवडणुका पूर्णपणे संविधान, कायदे आणि भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्देशांनुसारच घेतल्या जातात, असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. सर्व टप्प्यांवर मान्यताप्राप्त राजकीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या समवर्ती परीक्षणाखाली  पारदर्शकपणे निवडणुका घेतल्या जातात, असे त्यांनी सांगितले.

कुमार यांनी 'ECINet' चा उल्लेख देशभरातील मतदारांसाठी पारदर्शकतेचे एक माध्यम म्हणून केला. हे एकत्रित डिजिटल व्यासपीठ निवडणुकीशी संबंधित सेवा आणि माहिती प्रदान करते, ज्यामुळे नागरिकांसाठी निवडणूक सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ होते, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात प्रश्नोत्तराच्या सत्राचाही समावेश होता, ज्यात विद्यार्थ्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांशी संवाद साधला.

"लोकशाही शिका, लोकशाहीचे नेतृत्व करा" (Learn Democracy, Lead Democracy) या ब्रीदवाक्यासह 'ईएलसी 2.0' अंतर्गत, निवडणूक साक्षरता क्लबची शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सुरचित, दृश्यमान आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम व्यासपीठ म्हणून पुनर्रचना केली जात आहे. तरुण आणि नवमतदारांना लोकशाही समजून घेण्यास आणि निवडणूक प्रक्रियेत अर्थपूर्ण सहभाग घेण्यास प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

ECINet डिजिटल व्यासपीठाचा उपयोग करून, मतदार नोंदणीपासून मतदानापर्यंतच्या निवडणूक-संबंधित सेवा पुरवणारा, ELC 2.0 उपक्रम एका समर्पित ईएलसी पोर्टलद्वारे वर्षभर सातत्यपूर्ण निवडणूक साक्षरता उपक्रमांना चालना देईल आणि निवडणूक साक्षरता क्लबचे (ELC) एक सुव्यवस्थित देशव्यापी जाळे तयार करेल.

भारताच्या शैक्षणिक परिसंस्थेची व्याप्ती पाहता या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. देशात सुमारे 15 लाख शाळा असून, त्यात सुमारे 25 कोटी विद्यार्थी आणि एक कोटींहून अधिक शिक्षक आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रात सुमारे 1,500 विद्यापीठे आणि सुमारे 70,000 शैक्षणिक संस्था असून त्यात अंदाजे 4.33 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

या व्यापक संस्थात्मक जाळ्याद्वारे, वस्तुनिष्ठ आणि अनुभवात्मक निवडणूक शिक्षणाला प्रोत्साहन देणे, सोबतच भारताच्या निवडणूक प्रणालीबद्दल जागरूकता वाढवणे आणि तरुण नागरिकांना माहितीपूर्ण लोकशाही सहभागाचे दूत बनण्यास प्रोत्साहित करण्याचा ELC 2.0 चा प्रयत्न आहे. ईएलसी’च्या माध्यमातून मतदार नोंदणी, मतदान, मतमोजणी, ECINet ॲप तसेच निवडणूक आयोगाच्या इतर प्रमुख उपक्रमांविषयी माहितीचा प्रसार देखील केला जाईल.

ज्ञानेश कुमार दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी गोव्यातील बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) आणि ईएलसी सदस्यांशी संवाद साधला. बुधवारी 1,000 हून अधिक बीएलओंसोबत झालेल्या एका संवाद सत्रादरम्यान, ज्ञानेश कुमार यांनी राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे (एसआयआर) सुरळीत आयोजन करण्यात बीएलओ’नी दिलेल्या समर्पित सेवेचे आणि योगदानाचे कौतुक केले.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306564) अभ्यागत कक्ष : 22
Read this releasein: English