अर्थ मंत्रालय
करदाता सेवा महासंचालनालयाच्या मुंबई विभागीय कार्यालयातर्फे 'पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्र.1', कुलाबा, मुंबई येथे “जीएसटी जागरूकता - जीएसटीचे मूलभूत ज्ञान” विषयावर चर्चासत्राचे आयोजन
Posted On:
02 SEP 2026 7:04PM by PIB Mumbai
मुंबई, 2 सप्टेंबर 2026
कर साक्षरतेला प्रोत्साहन देणे तसेच अप्रत्यक्ष कर कायदे आणि प्रक्रियांबाबत जागरूकता वाढवणे या कार्याचा भाग म्हणून, करदाता सेवा महासंचालनालयाच्या (डीजीटीएस) मुंबई विभागीय कार्यालयाने (एमझेडयू) कुलाबा, मुंबई येथील ‘पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्र. 1’ येथे “जीएसटी जागरूकता – जीएसटीचे मूलभूत ज्ञान” या विषयावर कर साक्षरता विस्तार कार्यक्रमाचे आयोजन केले. शालेय विद्यार्थ्यांना वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) मूलभूत संकल्पनांची ओळख करून देणे, लहान वयातच कर साक्षरतेला प्रोत्साहन देणे आणि परस्परसंवादी तसेच विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनातून राष्ट्र उभारणी, आर्थिक विकास आणि जबाबदार नागरिकत्वामध्ये करांची भूमिका समजून घेणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाची सुरुवात ‘पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्र.1’, कुलाबा, मुंबई (देशातील सर्वात जुने केंद्रीय विद्यालय) यांच्यावतीने डीजीटीएस, एमझेडयू चे मुख्य अपर महासंचालक सुमित कुमार आणि इतर अधिकाऱ्यांचे स्वागताने झाली. यानंतर, विविध जीएसटी दिन स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या आणि सहभागी झालेल्या, ‘पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्र. 1’च्या विद्यार्थ्यांचा, डीजीटीएस, एमझेडयूतर्फे सत्कार करण्यात आला. करप्रणाली समजून घेणे तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक आणि कर साक्षरतेला प्रोत्साहन देणे, हा या स्पर्धांचा उद्देश होता. इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त भाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाची आणि सर्जनशीलतेची दखल घेत त्यांना प्रमाणपत्रे आणि जीएसटी जागरूकता पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना जीएसटीविषयीची आपली समज आणि जबाबदार नागरिकत्वाची मूल्ये प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) जारी केलेले ‘जीएसटी दिन जागरूकता व्हिडिओ’ आणि ‘आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन व्हिडिओ’या चित्रफिती देखील प्रदर्शित करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना सुमित कुमार यांनी, भारताच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीतील महत्त्वपूर्ण आणि दूरगामी सुधारणा म्हणून जीएसटीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, राष्ट्रउभारणी आणि लोककल्याणकारक उपक्रमांमध्ये करांची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. करप्रणाली तसेच सार्वजनिक प्रशासनाच्या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींचीही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
डीजीटीएस, मुंबई विभागीय कार्यालयाचे संयुक्त संचालक डॉ. चंद्रकांत व्ही. केदार यांनी, जीएसटीवरील तांत्रिक सत्र घेतले. या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना जीएसटीची व्यापक अनुपालन चौकट, करदाता सहाय्य यंत्रणा आणि जीएसटीच्या प्रशासकीय रचनेची माहिती दिली.

या कार्यक्रमांमधून एमएसएमई क्षेत्र, करदाता शिक्षण आणि तक्रारींचे प्रभावी निराकरण यावर भर देत करदात्यांशी संपर्क वाढवण्याच्या डीजीटीएसच्या प्रयत्नांना चालना मिळते. उद्योग आणि शैक्षणिक संस्थांसोबतच्या सहकार्याने राबवलेले असे उपक्रम प्रशासकीय प्रक्रियेबाबत जागरूकता वाढवतात, कर नियमांचे पालन सुधारतात आणि माहितीपूर्ण तसेच सक्षम करदाता घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
डीजीटीएस बद्दल:
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) हे भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील महसूल विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या मंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेले करदाता सेवा महासंचालनालय (डीजीटीएस) करदात्यांना चांगल्या सेवा देणे, कराबाबत माहिती आणि जागरूकता वाढवणे, त्यांच्या समस्या सोडवणे आणि जनतेशी अधिक चांगला संवाद साधणे यासाठी काम करते.
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306065)
अभ्यागत कक्ष : 17