संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक दर्जाचे उद्योग बनण्यासाठी भागीदारी करताना संशोधन व विकास आणि तंत्रज्ञान आधुनिकीकरणात गुंतवणूक करुन विकसित भारताचे उद्दीष्ट साध्य करा – संरक्षण मंत्र्यांचे एमएसएमइ क्षेत्राला आवाहन

Posted On: 01 SEP 2026 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2026

 

एमएसएमइ आस्थापनांनी आपल्या आर्थिक उलाढालीचा काही भाग संशोधन, विकास व तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणासाठी गुंतवावा, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. यासाठी विद्यापीठे, आयआयटी संस्था, संशोधन संस्था, डीआरडीओ प्रयोगशाळा, स्टार्ट अप्स आणि मोठ्या उद्योगांसोबत भागीदारी करावी, तसेच केवळ देशांतर्गत पुरवठादार म्हणून काम न करता जागतिक दर्जाचे उद्योग बनण्याचे प्रयत्न करावेत, आणि विकसित भारत 2047 हे ध्येय साध्य करावे, असे राजनाथ सिंह म्हणाले. 1 सप्टेंबर 2026 रोजी उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा इथे एका एमएसएमइ कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की विकसित भारत म्हणजे उत्पादन क्षेत्रात जागतिक दर्जा, तंत्रज्ञान व नवोन्मेषातील नेतृत्व आणि धोरणात्मक व आर्थिक क्षमतांमध्ये आत्मनिर्भर, युवा पिढीसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याची क्षमता असलेला देश आहे.

भारतीय एमएसएमइची जागतिक पातळीवरील स्पर्धात्मकता वाढवण्यावर भर देताना संरक्षण मंत्री म्हणाले की जागतिक पुरवठा साखळीत होत असलेले बदल आणि विश्वासार्ह उत्पादक भागीदारांची वाढती गरज ही भारतासाठी फार मोठी संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रमुख देशांसोबतची भारताची भागीदारी वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अमेरिका, युनायटेड किंग्डम, न्यूझीलंड, ओमान, स्वित्झर्लंड आणि युरोपियन संघासोबत केलेल्या मुक्त व्यापार करारांचा यामध्ये समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.   

केवळ तंत्रज्ञानामुळे विकासाला आणि एमएसएमइच्या जागतिक स्पर्धात्मकतेला चालना मिळणार नाही, असे अधोरेखित करुन दर्जा, कौशल्य विकास, तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण, बाजारपेठ उपलब्धता व वित्त पुरवठा यांनाही तेवढेच महत्त्व दिले पाहिजे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

डिजिटल उत्पादन, स्वयंचालन, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि आधुनिक उत्पादन प्रक्रिया एमएसएमइ साठी रास्त दरात व सुलभतेने उपलब्ध होतील, अशा पद्धतीचे आधुनिक तंत्रज्ञान निर्माण करण्याचे आवाहन संरक्षण मंत्र्यांनी केले.

भारताच्या औद्योगिक विकासात उत्तर भारतातील एमएसएमइ क्षेत्राला विशेष महत्त्व असल्याचे राजनाथ सिंग यांनी अधोरेखित केले. उत्पादन, अभियांत्रिकी, वाहननिर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया व सेवा अशा सर्वच क्षेत्रात उत्तर भारतातील एमएसएमइ क्षेत्राने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की संरक्षण औद्योगिक पट्ट्याने विशेषतः उत्तर प्रदेशामधे संरक्षण उत्पादन क्षेत्रात नवीन संधी संधी निर्माण केल्या आहेत. यामुळे उत्तर प्रदेश ही केवळ मोठी बाजारपेठ न राहता भारताच्या नवीन उत्पादन क्षेत्राचे व संरक्षण परिसंस्थेचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे असे सांगून उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली व हरियाणामधील एमएसएमइ आस्थापनांनी या संधींचा पुरेपूर लाभ घेत मोठ्या संरक्षण उत्पादन कंपन्याचे पुरवठादार ते तंत्रज्ञान विकासक, यंत्रणा पुरवठादार व निर्यातदार अशी प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

* * *

माधुरी पांगे/सुरेखा जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2305738) अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein: English , Urdu