ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसीकडून अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांना ‘इलेक्ट्रॉन क्विझ 2026-27’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
Posted On:
01 SEP 2026 6:17PM by PIB Mumbai
मुंबई, 1 सप्टेंबर 2026
भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी असलेल्या एनटीपीसी लिमिटेडने अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 'एनटीपीसी इलेक्ट्रॉन क्विझ 2026-27' या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या मुंबई प्रादेशिक फेरीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. तरुण मनांमध्ये ज्ञान, विश्लेषणात्मक विचार, जिज्ञासा आणि निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे.
प्रश्नमंजुषेची मुंबई प्रादेशिक फेरी 17 सप्टेंबर 2026 रोजी, भारत रत्नम – मेगा सीएफसी, गेट क्र. 4 आणि 5, 6 वा मजला, सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400096 येथे आयोजित केली जाईल.
“व्यवसाय आणि व्यवस्थापनाच्या जगातील सर्वकाही” या संकल्पनेवर आधारित ही प्रश्नमंजुषा, विद्यार्थ्यांना व्यवसाय आणि व्यवस्थापनाच्या विविध क्षेत्रांतील त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्याची संधी देईल. प्रत्येक सहभागी संघात दोन सदस्य असतील.

मुंबई प्रादेशिक फेरीत एक लेखी फेरी आणि त्यानंतर अव्वल सहा संघांसाठी ऑन स्टेज मल्टीमीडिया प्रादेशिक अंतिम फेरी असेल. मुंबई प्रादेशिक फेरीतील अव्वल दोन संघ राष्ट्रीय स्तरासाठी पात्र ठरतील.
प्रादेशिक फेरीमध्ये आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, विजेत्या संघाला 60,000 रुपये, उपविजेत्या संघाला 40,000 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघाला 20,000 रुपये पारितोषिक रुपात दिले जातील. चौथे, पाचवे आणि सहावे स्थान मिळवणाऱ्या संघांना प्रत्येकी 8,000 रुपये पारितोषिक दिले जाईल. प्रश्नमंजुषेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेक्षक पारितोषिकेही दिली जातील.
राष्ट्रीय स्तरावरच्या विजेत्या संघाला 1,00,000 रुपये तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांना अनुक्रमे 60,000 रुपये आणि 40,000 रुपये पारितोषिक दिले जाईल. इतर पात्र संघांना उत्तेजनार्थ पारितोषिकेही दिली जातील.
मुंबई प्रादेशिक फेरीत सहभागी होण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी निर्धारित नोंदणी लिंकद्वारे नोंदणी करू शकतात. ते आपल्या संघातील दोन्ही सदस्यांची नावे, महाविद्यालय/संस्थेचे नाव, ईमेल आयडी आणि व्हॉट्सॲप क्रमांक नमूद करून, आपली प्रवेशिका electronquiz2025@ntpc.co.in वर पाठवू शकतात. नोंदणीची अंतिम तारीख 05 सप्टेंबर 2026 आहे.
या स्पर्धेसाठी कोणतेही नोंदणी किंवा सहभाग शुल्क नाही. सहभागी संस्था एकापेक्षा जास्त संघांना नामनिर्देशित करू शकतात. प्रादेशिक फेरीसाठी प्रवास खर्चाची परतफेड लागू नियमांनुसार केवळ एसी 3-टियर रेल्वेच्या भाड्यापुरती मर्यादित असेल.
2004 पासून आयोजित केली जाणारी एनटीपीसी इलेक्ट्रॉन क्विझ, ही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी तसेच तरुण विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान, विश्लेषणात्मक क्षमता आणि स्पर्धात्मक भावना वाढवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या एनटीपीसीच्या प्रमुख उपक्रमांपैकी एक आहे.
मुंबई आणि आसपासच्या परिसरातील अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन संस्थांनी ही माहिती पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी आणि त्यांना एनटीपीसी इलेक्ट्रॉन क्विझ 2026-27 च्या मुंबई प्रादेशिक फेरीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन एनटीपीसी’ने केले आहे.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2305631)
अभ्यागत कक्ष : 9