कोळसा मंत्रालय
'वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड' च्या सुरक्षा प्रशिक्षण केंद्राकडून दीक्षांत समारंभ आणि दीक्षांत संचलनाचे आयोजन
प्रशिक्षणामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होते शिस्त, व्यावसायिक कौशल्ये आणि तंत्रज्ञानावर आधारित पूर्वतयारीची सज्जता
Posted On:
01 SEP 2026 3:03PM by PIB Mumbai
नागपूर, 1 सप्टेंबर 2026
नागपूरच्या इंदोरास्थित वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (डब्लूसीएल)च्या सुरक्षा प्रशिक्षण केंद्रात 31 ऑगस्ट 2026 रोजी दीक्षांत समारंभ आणि दीक्षांत संचलन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे कोल इंडिया लिमिटेडच्या विविध उपकंपन्यांमधील अधिकारी आणि विभागीय सुरक्षा कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, आयपीएस, हे या समारंभास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात नव्याने प्रशिक्षित सुरक्षा कर्मचाऱ्यांची शिस्त, समर्पण आणि व्यावसायिक पूर्वतयारीचे दर्शन घडले.

मुख्य अतिथी विश्वास नांगरे पाटील यांनी संचलनाची पाहणी केली आणि प्रशिक्षणार्थींनी दाखवलेल्या शिस्तीच्या व व्यावसायिक क्षमतेच्या उच्च दर्जाचे कौतुक केले. औद्योगिक सुरक्षा ही देशाच्या आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे, असे नांगरे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत सतर्कतेने, निष्ठेने आणि शिस्तीने आपले कर्तव्य पार पाडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वेस्टर्न कोलफील्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत शरद पांडे म्हणाले की, औद्योगिक आस्थापनांचे रक्षण करण्यात प्रशिक्षित आणि कुशल सुरक्षा कर्मचारी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, दक्षता आणि निरंतर प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी डब्लूसीएल कडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांवर भर दिला, तसेच प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
प्रशिक्षणा दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवत्ता प्रमाणपत्रे आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या समारंभाला डब्लूसीएलचे संचालक (वित्त/एचआर) विक्रम घोष; मुख्य दक्षता अधिकारी अजय मधुकर म्हेत्रे; सुरक्षा विभागाचे प्रमुख लेफ्टनंट कमांडर (डॉ.) विक्रांत मल्हान; सुरक्षा प्रशिक्षण केंद्राचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

समारंभानंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सुरक्षा प्रशिक्षण केंद्रातील 'शस्त्र' (SHASTrA - Smart and Modern Arms Training/Firing Simulation Facility) या स्मार्ट आणि आधुनिक शस्त्र प्रशिक्षण व फायरिंग सिम्युलेशन सुविधा केंद्राला भेट दिली. त्यांना तंत्रज्ञानावर आधारित या प्रशिक्षण प्रणालीबद्दल आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची कौशल्ये व परिचालनात्मक सज्जता वाढवण्यातील तिच्या भूमिकेबद्दल माहिती देण्यात आली. हा उपक्रम व्यावसायिक प्रशिक्षण आणि सुरक्षा व्यवस्थेच्या आधुनिकीकरणावर डब्लूसीएल सातत्याने भर देत असल्याचे दर्शवतो.
* * *
पीआयबी मुंबई | आशिष सांगळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2305464)
अभ्यागत कक्ष : 13