कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. जितेंद्र सिंह यांनी सशस्त्र दल मुख्यालय संघटनेच्या शिष्टमंडळाशी साधला संवाद; पदोन्नती आणि सेवाविषयक प्रलंबित मुद्यांवर केली चर्चा

Posted On: 30 AUG 2026 4:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्‍ट 2026

 

विज्ञान व तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सशस्त्र दल मुख्यालय संघटनेच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आणि सेवेशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यात आली.

शिष्टमंडळाने मंत्र्यांकडे एक निवेदन सादर केले. तसेच सेवेत प्रगती, पदोन्नती आणि प्रलंबित सेवाविषयक बाबींशी संबंधित विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. या संवादामुळे संघटनेच्या प्रतिनिधींना कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि मागण्या मंत्र्यांसमोर मांडण्याची तसेच त्या मुद्यांवर रचनात्मक आणि सकारात्मक वातावरणात चर्चा करण्याची संधी मिळाली.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या संघटित पद्धतीने मांडण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिष्टमंडळाचे कौतुक केले. कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी सातत्यपूर्ण आणि रचनात्मक संवाद साधणे हे सेवेशी संबंधित योग्य आणि वास्तविक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्या आणि निवेदनांचा संबंधित विभागांशी सल्लामसलत करून सखोल विचार केला जाईल, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली. तसेच कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. मात्र, मांडण्यात आलेल्या समस्यांचा योग्य प्रशासकीय प्रक्रियेनुसार विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी संरचित आणि सातत्यपूर्ण संवादामुळे सेवेशी संबंधित समस्या प्रशासनाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात आणि त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करता येतात, यावर डॉ. जितेंद्र सिंह यांनी भर दिला. कर्मचाऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या निवेदनांबाबत खुलेपणाने आणि प्रतिसादात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. तसेच संघटनेने मांडलेल्या समस्यांचा योग्य विचार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सशस्त्र दल मुख्यालय संघटनेच्या प्रतिनिधींनी डॉ. जितेंद्र सिंह तसेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे कर्मचारी प्रतिनिधींशी सातत्यपूर्ण संवाद साधल्याबद्दल आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित समस्यांचा योग्य विचार केल्याबद्दल आभार मानले. गेल्या काही वर्षांत दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या कर्मचारीविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच पदोन्नतीच्या संधींअभावी निर्माण होणारी स्थिरता कमी करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी डीओपीटीने केलेल्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

शिष्टमंडळाने कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींना त्यांच्या समस्या थेट मंत्र्यांसमोर मांडण्याची संधी देण्याच्या मंत्र्यांच्या दृष्टिकोनाचेही कौतुक केले. या माध्यमातून सेवेशी संबंधित समस्यांचा योग्य प्रकारे विचार करून त्यावर आवश्यक ती कार्यवाही करता येत असल्याने या संवादातून प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात सातत्यपूर्ण संवाद राखण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.

 

* * *

शैलेश पाटील/नितीन गायकवाड/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304705) अभ्यागत कक्ष : 11