अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या सदस्यांनी (माहिती तंत्रज्ञान, करदाते सेवा आणि तंत्रज्ञान) जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊसचा 'टाइम रिलीज स्टडी 2026' केला जारी 

Posted On: 28 AUG 2026 8:21PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे (सीबीआयसी) सदस्य (माहिती तंत्रज्ञान, करदाता सेवा आणि तंत्रज्ञान)  मोहन कुमार सिंह यांनी आज मुंबई सीमाशुल्क विभाग-2 च्या दौऱ्यादरम्यान जवाहरलाल नेहरू सीमाशुल्क गृहाच्या (जेएनसीएच) टाइम रिलीज स्टडी (टीआर एस) 2026 म्हणजेच वेळापत्रक अभ्यास अहवालाचे प्रकाशन केले. याप्रसंगी मुंबई विभाग-2 चे मुख्य सीमाशुल्क आयुक्त विमल कुमार श्रीवास्तव, विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे प्रतिनिधी , पोर्ट टर्मिनल ऑपरेटर्स, सीमाशुल्क दलाल, व्यापारी संघटना व इतर हितधारकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सीबीआयसीच्या सदस्यांनी मालवाहतूक मंजुरीच्या वेळेत सातत्यपूर्ण सुधारणा केल्याबद्दल जेएनसीएचच्या अधिकाऱ्यांचे आणि सर्व सहभागी भागधारकांचे कौतुक केले, तसेच व्यापार सुलभता आणि व्यवसाय सुलभता अधिक वाढवण्यासाठी टीआरएस सारख्या डेटा-आधारित अभ्यासांचा वापर करण्याच्या सीबीआयसीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.  'विकसित भारत @2047' च्या दिशेने भारताची वाटचाल होत असताना  जागतिक मूल्य साखळ्यांशी देश अधिक सखोलतेने सुसंगत होण्यासाठी एक कार्यक्षम, तंत्रज्ञान-आधारित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक अशी सीमापार व्यापार व्यवस्था महत्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी अधोरेखित केले. 

टीआरएस  हे जागतिक सीमाशुल्क संघटनेने (डब्ल्यूसीओ) शिफारस केलेले एक कार्यप्रदर्शनाचे मापन साधन आहे, जे मालाची सुटका आणि मंजुरीसाठी लागणाऱ्या वेळेचे मूल्यांकन करते, ज्यामुळे अडथळे आणि लक्ष्यित व्यापार सुलभतेची उपाययोजना ओळखणे शक्य होते. जेएनसीएचतर्फे दरवर्षी टीआरएसचे आयोजन केले जाते.

टीआरएस 2026 अहवालानुसार, हाताळल्या गेलेल्या बिल ऑफ एंट्रीच्या संख्येत 16% वाढ होऊनही आयात मालासाठीचा सुटका होण्याचा सरासरी वेळ (एआरटी) टीआरएस 2025 मधील 72 तास 52 मिनिटांवरून सुधारून 65 तास 53 मिनिटे झाला आहे, जी सुमारे 9.6% ची घट आहे. एईओ मालाच्या खेपांसाठी 40 तास 40 मिनिटांचा एआरटी नोंदवला गेला, जो 48 तासांच्या NTFAP मानकाच्या कक्षेत आहे, तर नॉन-एईओ मालाच्या खेपांसाठी हा वेळ 76 तास 59 मिनिटे होता.

   

निर्यातीच्या बाबतीत शिपिंग बिलांसाठी लागणारा एकूण मंजुरीचा वेळ, मागील टीआरएस दरम्यान नोंदवलेल्या 208 तास 15 मिनिटांवरून कमी होऊन 195 तास 49 मिनिटे झाला. याव्यतिरिक्त, निर्यातीच्या सीमाशुल्क मंजुरीसाठी सरासरी फक्त 2 तास 12 मिनिटे लागली, तर उर्वरित वेळ लॉजिस्टिक्स संबंधित कामकाजासाठी खर्च झाला.

***

राधिका अघोर/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304448) अभ्यागत कक्ष : 8
Read this releasein: English