युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया संवादाच्या माध्यमातून आयआयटी बॉम्बेमधील तरुणांशी साधला दृकश्राव्य पद्धतीने संवाद ; अंमली पदार्थमुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आपली वचनबद्धता


आयआयटी बॉम्बेमधील खेलो इंडिया संवादाने अधोरेखित केले क्रीडा, फिटनेस आणि तरुणांच्या सहभागाचे महत्त्व: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अंमली पदार्थमुक्त संकुलाच्या गरजेवर दिला भर

Posted On: 28 AUG 2026 4:51PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 ऑगस्ट 2026 रोजी खेलो इंडिया संवादाच्या माध्यमातून देशातील युवकांशी आभासी पद्धतीने संवाद साधला.

मुंबईमध्ये 'माय भारत मुंबई'च्या समन्वयाने आयआयटी बॉम्बेने आपल्या संकुलात 'खेलो इंडिया संवाद' आयोजित केला होता. विद्यार्थी आणि युवा सहभागींनी या थेट आभासी संवादात मोठ्या संख्येने भाग घेऊन कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, आंतरराष्ट्रीय हेप्टॅथलॉन खेळाडू नंदिनी आगासरा, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे, 'माय भारत महाराष्ट्र'चे राज्य संचालक अमित पुंडे आणि 'माय भारत मुंबई'चे उपसंचालक अनुप इंगोले उपस्थित होते.

दृकश्राव्य माध्यमाद्वारे 'खेलो इंडिया' संवादादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दैनंदिन जीवनातील खेळांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि युवावर्गाला खेळ व शारीरिक चलनवलनाला आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित केले. पंतप्रधान मोदी यांनी भारताची क्रीडा परिसंस्था अधिक मजबूत करण्याच्या आपल्या दृष्टीकोनाबद्दल तसेच 2036 च्या ऑलिम्पिक खेळांविषयक देशाच्या आकांक्षांबद्दलही सांगितले. त्यांनी देशभरात एक मजबूत क्रीडा संस्कृती विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला आणि तरुणांना खेळांमध्ये अधिक सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. या संवादामुळे युवावर्गाला पंतप्रधानांशी थेट संपर्क साधण्याची आणि भारताला एक अधिक मजबूत क्रीडा राष्ट्र बनवण्यामागील सरकारची दूरदृष्टी समजून घेण्याची संधी मिळाली.

उपस्थितांना संबोधित करताना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 'नशामुक्त आयआयटी बॉम्बे' राखण्याच्या महत्त्वावर भर दिला आणि तरुणांना अंमली पदार्थ व व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. त्यांनी तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी निरोगी, शिस्तबद्ध आणि फलदायी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना अंमली पदार्थमुक्त समाजाचे राजदूत बनण्याचे आवाहन केले.

आंतरराष्ट्रीय हेप्टॅथलॉन खेळाडू  नंदिनी आगासरा यांच्यासोबत एक रंजक प्रश्नोत्तर सत्र देखील आयोजित करण्यात आले होते. आगासरा यांनी विद्यार्थ्यांसोबत आपल्या प्रेरणादायी क्रीडा प्रवासाचे अनुभव सामायिक केला. सुरुवातीला एका निरागस स्पर्धात्मक भावनेने प्रेरित होऊन, शालेय दिवसांतच आपण विविध खेळांमध्ये कसा सहभाग घेण्यास सुरुवात केली याची आठवण त्यांनी सांगितली. 2018 मध्ये खेलो इंडिया मंचामधून त्यांच्या प्रवासाला मोठी गती मिळाली, ज्या मंचाने त्यांना उच्च स्तरावरील ऍथलेटिक्स मध्ये सहभागी होण्याची आणि भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली.  त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. 2022 मध्ये, त्या 100 मीटर अडथळा शर्यतीत भारतीय 20 वर्षांखालील गटात राष्ट्रीय विक्रमवीर बनल्या आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही त्यांनी कांस्यपदकही जिंकले. 2025 च्या आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून त्यांनी देशाचा गौरव वाढवला.  आगासरा यांनी तरुण खेळाडूंना त्यांच्यातील क्रीडा गुणवत्ता ओळखण्यासाठी, जोपासण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल 'खेलो इंडिया'सारख्या उपक्रमांना त्याचे श्रेय दिले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांदरम्यान भारतीय खेळाडूंना भारत सरकारकडून मिळालेल्या सर्वसमावेशक पाठिंब्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

खेलो इंडिया संवादाने आयआयटी बॉम्बेच्या तरुणांना भारतातील क्रीडा परिसंस्था अधिक मजबूत करण्याबाबत आपल्या कल्पना, सूचना आणि दृष्टिकोन मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांनी क्रीडा पायाभूत सुविधा, तरुण खेळाडूंसाठी संधी, तळागाळातील सहभाग, क्रीडा सुविधांची उपलब्धता आणि विद्यार्थी व तरुणांमध्ये क्रीडा संस्कृती अधिक मजबूत करण्याशी संबंधित सूचना मांडल्या. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री  रामदास आठवले आणि आयआयटी बॉम्बेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि आयआयटी बॉम्बेमध्ये क्रीडा परिसंस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिचा विकास करण्यासाठी आणि विद्यार्थी व तरुणांचा खेळ तसेच शारीरिक उपक्रमांमध्ये सहभाग वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थी आणि तरुणांना नशामुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली. उपस्थितांनी अमली पदार्थ आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याची तसेच एक निरोगी, मजबूत आणि नशा-मुक्त भारत घडवण्यासाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा घेतली. हा कार्यक्रम 'माय भारत मुंबई'चे उपसंचालक अनुप इंगोले यांच्या समन्वयाखाली, आयआयटी बॉम्बेने 'माय भारत मुंबई'च्या सहकार्याने आयोजित केला होता. आयआयटी बॉम्बेमधील 'खेलो इंडिया संवादाने मुंबईच्या तरुणांना अधिक बळकट क्रीडा परिसंस्था, खेळांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग आणि अधिक निरोगी व चैतन्यशील भारतासाठीच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी जोडणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून कार्य केले. 

***

निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304365) अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein: English