युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
‘खेलो इंडिया संवाद’ मध्ये, पंतप्रधानांनी खेळाडूंसोबत केलेल्या संवादात गोव्याचाही सहभाग
युवा पिढीला खेळ, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गोव्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यक्रम
Posted On:
27 AUG 2026 6:55PM by PIB Mumbai
गोवा, 27 ऑगस्ट 2026
केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज आयोजित केलेल्या, ‘खेलो इंडिया संवाद- खेल की बात, पीएम मोदी के साथ’ अंतर्गत, झालेल्या संवाद सत्रात देशभरातील खेळाडू सहभागी झाले होते. या कार्यक्रमात, युवा, खेळाडू, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि 1500 पेक्षा अधिक ठिकाणांमधील शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युवा सहभागींशी दूरदृश्यप्रणाली द्वारे संवाद साधला.
गोव्यात युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीतील, ‘माय भारत गोवा’ने राष्ट्रीय सेवा योजना, गोवाच्या सहकार्याने, सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसा; विद्या प्रबोधिनी कॉलेज, पर्वरी; शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, साखळी; रोझरी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, नावेली आणि गोपाळ गावकर मेमोरियल गोवा मल्टी-फॅकल्टी कॉलेज, दक्षिण गोवा अशा ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सांकेलिम इथल्या शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी युवा विद्यार्थी, खेळाडू आणि स्वयंसेवकांशी संवाद साधला.
केंद्रीय ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे यांनी म्हापसा इथल्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला.
युवकांचे आयुष्य घडवण्यात खेळ अत्यंत महत्वाचा असल्याचे नाईक यांनी यावेळी अधोरेखित केले. नियमितपणे क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर राहण्यास मदत होते. तसेच शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन मिळते, असेही त्यांनी सांगितले.
नाईक यांनी राष्ट्र उभारणीत तरुणांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला आणि सांगितले की, देशातील युवा पिढीच्या सक्रिय सहभागातून आणि योगदानातूनच 'विकसित भारत'चे स्वप्न साकार होऊ शकते.

राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानवडे यांनी मुलांचे योग्य पालनपोषण करणे आणि त्यांच्यातील पूर्ण क्षमतेला वाव देण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. 2047 पर्यंत 'विकसित भारत'चे उद्दिष्ट गाठण्यासाठी आजच्या मुलांची प्रगती आणि त्यांचा विकास अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशातील वाढत्या क्रीडा संस्कृतीवर आपली मते मांडली आणि खेळात प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारांनी सुरू केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तसेच, क्रीडा क्षेत्राला चालना देणाऱ्या आणि ॲथलीट्सना उत्तम संधी उपलब्ध करून देणाऱ्या धोरणांबद्दल व उपक्रमांबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, उपस्थित सर्वांनी निरोगी आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करत 'नशा मुक्त भारत अभियान'ची शपथ घेतली.
_20260827163640_1ac5ff.jpeg)
भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी साजरा केल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा दिना'च्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश तरुणांचा खेळांमधील सहभाग वाढवणे आणि शारीरिक सुदृढता, शिस्त, निरोगी जीवनशैली व सक्रिय जीवनपद्धतीला प्रोत्साहन देणे हा आहे. या कार्यक्रमाला सहभागी संस्थांमधील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, खेळाडू आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_20260827163620_df261a.jpeg)
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2303897)
अभ्यागत कक्ष : 32