संरक्षण मंत्रालय
गोवा मुक्ती संग्रामातील सत्याग्रहींना अभिवादन : पत्रादेवी इथल्या पुनर्विकास केलेल्या हुतात्मा स्मृती स्मारकाचे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
गोवा मुक्ती संग्रामापासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत, देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा संकल्प सदैव अढळ आहे : राजनाथ सिंह
भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपले संरक्षण दल पूर्णपणे सक्षम असल्याचे ऑपरेशन सिंदूरने केले सिद्ध
प्रगत शस्त्रास्त्रांनी सज्ज संरक्षण दलाची आता अधिक सहकार्याच्या भावनेने आणि एकात्मतेने पुढची वाटचाल सुरू
आपला इतिहास समजून घेणारी पिढीच भविष्याला योग्य दिशा देऊ शकते : युवा वर्गाने गोवा मुक्ती संग्रामाचा वारसा जपावा : संरक्षणमंत्र्यांचे आवाहन
Posted On:
26 AUG 2026 10:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2026
गोवा राज्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त करण्यासाठी झालेल्या ऐतिहासिक संघर्षाशी संबंधीत असलेल्या पत्रादेवी इथल्या पुनर्विकास केलेल्या हुतात्मा स्मृती स्मारकाचे आज दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय ऊर्जा तसेच नव आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक उपस्थित होते.
यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थितांना संबोधीत केले. यावेळी राजनाथ सिंह यांनी पंजाबचे कर्नाईल सिंग, मध्य प्रदेशच्या सहोद्रा देवी, महाराष्ट्राचे मधुकर दामोदर चौधरी यांच्यासह गोवा मुक्ती संग्रामातील सत्याग्रहींना भावपूर्ण आदरांजली वाहिली. हा लढा म्हणजे केवळ एक प्रादेशिक संघर्ष नव्हता, तर हा लढा भारताच्या राष्ट्रीय चेतना आणि एकात्मतेची अभिव्यक्ती होती असे ते म्हणाले.


प्रादेशिकवाद, धर्मवाद आणि जातीवाद यांसारख्या संकुचित विचारांपेक्षा राष्ट्रीय एकता सर्वोच्च स्थानी असल्याचे ते म्हणाले. भारतभरात विविध प्रादेशिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ओळखींचे अस्तित्व असले, तरी भारतीय असणे ही एक भावना आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवते, आणि हाच दृढ संदेश पत्रादेवी ची भूमी देत आहे असे ते म्हणाले. पत्रादेवी मध्ये सत्याग्रहींनी केलेल्या संघार्षात आपल्या अफाट धैर्यातून, भारत हा शांततापूर्ण मार्गाने आपल्या हक्कांसाठी खंबीरपणे उभा राहू शकतो हे दाखवून दिल्याचे ते म्हणाले. मात्र त्याचवेळी जर एखाद्या सार्वभौम राष्ट्राच्या प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण होतो, आणि शांततापूर्ण प्रयत्नांच्या मर्यादा संपतात, त्यावेळी त्या राष्ट्राला आपल्या संपूर्ण शक्तीचा वापर करण्याचाही पूर्ण अधिकार असतो, ही बाबही राजनाथ सिंह यांनी अधोरेखीत केली.
1961 मधील ऑपरेशन विजय दरम्यान भारतीय संरक्षण दलांनी आपली व्यावसायिक क्षमता दाखवत, शौर्याने आणि शिस्तबद्ध रितीने गोव्याची गुलामगीरीतून यशस्वीपणे मुक्ती केली असे ते म्हणाले. आपल्या सैनिकांनी त्यांच्या या पराक्रमातून जगभरातील सैन्यासमोर एक नवा मापदंड निर्माण केला असल्याचे ते म्हणाले. भारतीय संरक्षण दलांनी ज्या आत्मविश्वासाने आपले कर्तव्य बजावले, त्यातून एक परंपरा निर्माण झाली असून ती आजही कायम आहे असे ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूर हे याच परंपरेचे एक प्रमुख उदाहरण असल्याची बाब त्यांनी नमूद केली. जे भारतावर वाईट नजर टाकतील त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपले संरक्षण दल पूर्णपणे सक्षम आहे, ही बाब ऑपरेशन सिंदूरने सिद्ध करून दाखवली असेही त्यांनी अधोरेखीत केले.

राजनाथ सिंह यांनी गोवा मुक्तीला केवळ भूतकाळातील लष्करी शौर्याचे स्मरण करण्याचा प्रसंग न मानता, भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी भारतीय संरक्षण दलांनी सदैव सतर्क, सक्षम आणि सज्ज राहिले पाहिजे, याचे स्मरण करून देणारा दिवस, असे संबोधले.
1961 पासून भारतामध्ये झालेल्या उल्लेखनीय परिवर्तनावर भाष्य करताना संरक्षण मंत्री म्हणाले: “आपले संरक्षण दल आज युद्धनौका, लढाऊ विमाने, प्रगत रडार प्रणाली, नेटवर्क-केंद्रित युद्धक्षमता आणि दूर पल्ल्याची हवाई शक्ती यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने राष्ट्रीय हिताचे रक्षण करत आहे. तिन्ही सेना दले अधिकाधिक संयुक्तता आणि एकात्मतेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आपल्याकडे एक विशाल अर्थव्यवस्था, प्रतिभावान तरुण आणि वेगाने विस्तारणारी संरक्षण औद्योगिक परिसंस्था आहे. आपण अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या स्वदेशी क्षमता वाढवत आहोत. आपण एका प्रमुख संरक्षण आयातदार देशापासून अधिकाधिक महत्त्वपूर्ण जागतिक संरक्षण उत्पादन आणि निर्यातदार राष्ट्रामध्ये रूपांतरित होत आहोत. 2014 पूर्वी केवळ 600 कोटी रुपये मूल्य असलेली संरक्षण निर्यात आज 38,000 कोटी रुपयांच्या विक्रमी आकड्यावर पोहोचली आहे. एकेकाळी केवळ 40,000 कोटी रुपये मूल्य असलेले संरक्षण उत्पादन 1.81 लाख कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहे. पश्चिम आशियातील संकट आले नसते, तर आपण आतापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो असतो.”
देशातील वाढत्या नारी शक्तीवर बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, ज्या महिला एके काळी स्वातंत्र्य लढ्यात आघाडीवर होत्या, त्या आज लढाऊ विमाने चालवत आहेत, सैन्यात नेतृत्वाची भूमिका बजावत आहेत, अंतराळ मोहिमांमध्ये योगदान देत आहेत तसेच नवोन्मेष आणि उद्योजकतेला चालना देत आहेत.

राष्ट्राच्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानातून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा सन्मान करणे ही वर्तमान आणि भावी पिढ्यांची जबाबदारी आहे, यावर संरक्षण मंत्र्यांनी भर दिला. स्वातंत्र्य म्हणजे केवळ आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही; तर राष्ट्रीय ऐक्य टिकवणे, घटनात्मक मूल्यांचा आदर करणे, कायद्याचे पालन करणे आणि वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणे ही जबाबदारीसुद्धा त्यासोबत येते, हे त्यांनी अधोरेखित केले. हे स्वातंत्र्य, तसेच त्यामागील मूल्ये आणि भावना जतन करून भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, पत्रादेवीच्या हुतात्म्यांच्या कथा इतिहासाच्या पुस्तकांमध्ये केवळ नावे आणि तारखा म्हणून मर्यादित राहता कामा नयेत. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांच्या जीवनातून, संघर्षातून, शौर्यातून आणि बलिदानातून तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे. “आपला युवावर्ग गोव्याला जाईल तेव्हा त्याने या स्मारकाला भेट द्यावी आणि आपल्या राष्ट्राची अखंडता ज्या किंमतीवर सुरक्षित करण्यात आली, ती समजून घ्यावी. आपल्या इतिहासाची जाण असलेली पिढी आपल्या भविष्याला योग्य दिशेने वळवू शकते,” असे ते म्हणाले.
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे; पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर; गोवा, दमण आणि दीव स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई; राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच सत्याग्रहींचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
हुतात्मा स्मृती स्मारकाविषयी
गोवा सरकारने गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत या स्मारकाच्या पुनर्विकासाचे मोठे काम हाती घेतले. यासाठी अंदाजे 9.50 कोटी रुपये खर्च करण्यात आले. नूतनीकरणानंतर या स्मारकाचे रूपांतर आता एक अनुभवात्मक शैक्षणिक आणि स्मरणस्थळात झाले आहे. यामध्ये नव्याने रचना केलेले मध्यवर्ती स्मारक, शिल्प रचना, माहिती केंद्रे आणि गोवा मुक्तिसंग्रामाचा इतिहास दर्शविणारी भित्तीचित्रे यांचा समावेश आहे.
पत्रादेवी इथे स्वातंत्र्यलढ्याचा एक महत्त्वपूर्ण अध्याय घडला. त्यामुळे हे स्थळ धैर्य, त्याग आणि गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त करण्याच्या सामूहिक निर्धाराचे प्रभावी प्रतीक बनले आहे. 15 ऑगस्ट 1955 रोजी संपूर्ण भारतातून हजारो स्वयंसेवकांनी गोव्यात शांततापूर्ण सत्याग्रहात सहभाग घेतला. भारतीय ध्वज हातात घेऊन सत्याग्रहींचा पहिला गट पत्रादेवीमार्गे गोव्यात दाखल झाला. त्यावेळी पोर्तुगीज सैनिकांनी त्यांच्यावर मशीनगनमधून गोळीबार केला. पत्रादेवी इथे अनेक सत्याग्रहींनी आपले प्राण गमावले; तर या चळवळीदरम्यान इतर ठिकाणीही अनेक सत्याग्रही हुतात्मा झाले.
या पुनर्विकासाचा उद्देश विशेषतः युवा पिढीसह सर्व पर्यटकांना गोवा मुक्तीसाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिक आणि स्वयंसेवकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची आणि तो इतिहास समजून घेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/निलिमा चितळे/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303605)
अभ्यागत कक्ष : 13