युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘खेलो इंडिया संवाद’ 27 ऑगस्ट रोजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी माध्यमातून युवकांशी साधणार संवाद
देशभरातील 1,600 ठिकाणी 8 लाखांहून अधिक युवक होणार सहभागी
Posted On:
25 AUG 2026 6:15PM by PIB Mumbai
मुंबई, 25 ऑगस्ट 2026
महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम 27 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये युवा सहभाग, क्रीडा विकास आणि राष्ट्रनिर्माण यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या उत्सवाचा एक भाग म्हणून ‘माय भारत’, भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या सहकार्याने देशभरात ‘खेलो इंडिया संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांत भारताच्या क्रीडा परिसंस्थेत झालेला परिवर्तनाचा प्रवास अधोरेखित करणे आणि त्याचवेळी युवकांच्या आकांक्षा जाणून घेणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती ‘माय भारत’चे महाराष्ट्र राज्य संचालक अमित पुंडे आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण, मुंबईचे उपसंचालक माधव कांबळे यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘माय भारत’, मुंबईचे उपसंचालक अनुप इंगोले उपस्थित होते.
_20260825181129_20fd8e.jpeg)
या कार्यक्रमांतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमध्ये ‘युवा कनेक्ट’ आयोजित करण्यात येणार आहे. युवकांना खेळाडूंशी थेट संवाद साधण्याची, तसेच भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासाठी आपले विचार आणि आकांक्षा मांडण्याची संधी मिळणार आहे. आयआयटी मुंबई, सिम्बायोसिस आणि एम्स नागपूर यांसारख्या नामांकित संस्थांचाही या उपक्रमात सहभाग असेल.
या कार्यक्रमांतर्गत 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून युवकांशी संवाद साधणार आहेत. देशभरातील 1,600 ठिकाणी 8 लाखांहून अधिक युवक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या उपक्रमामुळे देशाच्या विविध भागांतील युवकांना एका समान राष्ट्रीय व्यासपीठावर एकत्र आणले जाणार आहे.
पंतप्रधानांच्या संबोधनानंतर स्थानिक युवा संवाद आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये ‘माय भारत’ स्वयंसेवक आणि स्थानिक खेळाडू यांच्यातील विशेष सत्राचाही समावेश असेल. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या युवकांना संकेत सरगर, स्वप्निल गोंड, ऋतुजा भोसले, प्रितम साळवे, फाल्गुनी पिल्लारे आणि ऐश्वर्या जाधव यांच्यासह इतर नामांकित खेळाडूंशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमानंतर युवा संवाद आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये युवक भारतीय क्रीडा क्षेत्राच्या आणि विकसित भारताच्या भविष्यासाठी आपले विचार, सूचना आणि आकांक्षा मांडतील. युवा संवादातील चर्चा पुढील चार प्रमुख विषयांवर केंद्रित असेल:
- क्रीडा परिसंस्था मजबूत करणे: तळागाळातील क्रीडा सुविधा, प्रशिक्षण आणि संधींमध्ये सुधारणा करणे.
- 2036 ऑलिम्पिकसाठी प्रतिभा विकास: वैज्ञानिक पद्धतीने प्रतिभा ओळखणे आणि खेळाडू विकासाला चालना देणे.
- युवा नेतृत्व आणि शासनातील सहभाग: शासन प्रक्रियेत युवकांच्या अर्थपूर्ण सहभागाला प्रोत्साहन देणे.
- विकसित भारतासाठी युवा सक्षमीकरण: युवकांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्ये, स्वयंसेवा आणि राष्ट्रनिर्माणाच्या संधींशी जोडणे.
युवकांकडून प्राप्त सूचना क्यूआर कोडद्वारे संकलित केल्या जाणार आहेत. यामुळे त्यांच्या कल्पना आणि विचारांची नोंद घेणे शक्य होणार आहे. सहभागींना कार्यक्रमस्थळी VBYLD Quiz मध्ये सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहित केले जाईल, असेही ‘माय भारत’चे महाराष्ट्र राज्य संचालक अमित पुंडे आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण, मुंबईचे उपसंचालक माधव कांबळे यांनी सांगितले.

‘खेलो इंडिया संवाद’ची संकल्पना भारतातील युवकांना खेळाडू, लोकप्रतिनिधी आणि संस्थांशी जोडणारे राष्ट्रव्यापी व्यासपीठ म्हणून करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे युवा भारतीयांना संवाद साधण्याची, आपल्या कल्पना मांडण्याची आणि भारताच्या क्रीडा परिवर्तनाच्या तसेच विकसित भारताच्या वाटचालीत सक्रिय भागीदार होण्याची संधी मिळणार आहे.
* * *
पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303205)
अभ्यागत कक्ष : 72